Friday, July 11, 2025

 वृत्त क्र. 720 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात

हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकाअर्पण सोहळा   

 

नांदेड दि. 11 जुलै :- महिला सक्षमिकरण अंतर्गत स्तनपान करणाऱ्या महिलांना हक्काची जागा आणि समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिमालय कंपनीच्या सी.एस.आर निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दोन हिमालया वेबी फीडिंग पॉड नुकतेच बसवण्यात आले आहे. यासाठी हिमालया बेबी फिडिंग प्रकल्प समन्वयक असिफ भट यांनी मोलाची मदत केली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबईच्या अधिनस्त राज्यस्तरावर सी.एस.आर कक्ष स्थापन करण्यात आलेला असुन या कक्षाचे सचिव विजय गायकवाड समाजसेवा अधीक्षक यांच्यामार्फत समाजसेवा अधीक्षक विभागाच्या समन्वयाने नांदेड येथे वेबी फीडिंग पॉड उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागातील ओ.पी.डी. क्र. 118 स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग आणि ओ.पी.डी.क्र. 127 बालरोग विभाग येथे हिमालया बेबी फीडिंग सेंटर बसविण्यात आले. या बेबी पॅडमध्ये एकाच वेळेस चार स्तनदा माता यांना बाळांना दूध पाजन्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करण्यासाठी एक खासगी आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. तसेच मातांना बाळासोबत थोडा वेळ विश्रांती घेता यावी यासाठी आरामदायी जागा ही बेबी पॉड येथे उपलब्ध असणार आहे.

 

सदर हिमालया बेबी फीडिंग सेंटरचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते नुकतेच 9 जुलै  रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. एस. आर. वाकोडे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, डॉ. इस्माईल इनामदार, विभाग प्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग व डॉ. शिवानंद देवसरकर, उप वैद्यकीय अधीक्षक, सर्व समाजसेवा अधीक्षक तसेच परिचर्या संवर्गातील कर्मचारी व रुग्ण व रुग्णनातेवाईक हे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवा अधीक्षक राजरत्न केळकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अनिल नागमवाड, संतोष मुंगल, विजय खरात, संजय रत्नपारखी व दिपाली पेटकर या समाजसेवा अधीक्षक यांनी परिश्रम घेतले.

00000




 

 

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...