वृत्त क्रमांक 9
माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत
सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका
यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध : आ.प्रताप पाटील चिखलीकर
बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील,
लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे,
आ. बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
नांदेड दि. 2 जानेवारी : राष्ट्रीय दुखवट्यामुळे लांबणीवर गेलेल्या माळेगाव यात्रेच्या शासकीय कार्यक्रमाला आज थाटात सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांचे नीटनेटके आयोजन करून यात्रेला आलेल्या लाखोंच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचे कार्य आज नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायतीने पार पाडले.
प्रशासनामार्फत 5 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आजही हजारो पर्यटकांनी श्रद्धाळूंनी आणि यात्रेकरूंनी श्री. क्षेत्र खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी करमणुकीची साधने उपलब्ध आहेत. तसेच खरेदी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंपासून तर बाळ गोपाळांच्या खेळण्याच्या साहित्याची रेलचेल आहे. थंडीपासून बचाव करणारे बिछान्याचे साहित्य कपडे याची प्रचंड मोठी दुकाने यात्रेत आली असून पशूंचा बाजार लक्षवेधी आहे. शेकडो वर्षाच्या आयोजनाची परंपरा असलेल्या या यात्रेला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
5 जानेवारीला पशुस्पर्धांचा निकाल
आज पशुप्रदर्शन व स्पर्धेला तर कधी न बघितले असतील अशा पद्धतीच्या विविध प्रजातीचे अश्व, श्वान, वळू, कुक्कुट यांची देशातील विविध भागातून आलेली विविधता हजारोची नजर वेधून घेत होती. पशुप्रदर्शन व स्पर्धा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या पशुप्रदर्शनीचा निकाल ५ जानेवारीला वृत्तपत्रातून घोषित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यात्रेच्या सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, लातूर विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ नाना सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले,उदगीरचे पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नंदकुमार गायकवाड, नांदेडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पडीले, यातिन पुजारी, हिंगोलीचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एस. बी. खुणे, लातूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्रीधर शिंदे यांची उपस्थिती होती.
कृषी प्रदर्शन थाटात
नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आयोजित प्रदर्शन व सत्कार समारंभाचे थाटात आयोजन करण्यात आले. फळे,भाजीपाला, मसाला प्रदर्शनातील दर्जेदार व जिल्ह्यातील शेतकऱ्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सत्कार सोहळा स्मरणीय ठरला आजच्या कार्यक्रमामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथील भगवानराव हंबर्डे, मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (म.) रामराव मगरे, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील प्रभाकर हारकरी, भोकर तालुक्यातील रेणापूर येथील व्यंकट हामंद, हदगाव तालुक्यातील रुई (धा.) प्रकाश भालके, हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम येथील सुभाष राठोड, किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील ज्योतिबा गौणारकर, माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील राजू बाळस्कर, उमरी तालुक्यातील पळसगाव येथील गणेश पवळे, धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील अविनाश जैरमोड, बिलोली तालुक्यातील किनाळा येथील माधव भोसले, देगलूर तालुक्यातील भोकसखेडा येथील गोपाळ जाधव, मुखेड तालुक्यातील एकलारा येथील प्रभावती नरहरे, कंधार तालुक्यातील सुजानवाडी येथील कृष्णा भालेराव, लोहा तालुक्यातील पेनुर येथील बालाजी लोखंडे, नायगाव खै. तालुक्यातील वजिरगाव येथील माधवराव ढगे तर उत्तेजनार्थ अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील श्रीमती महानंदा कल्याणकर, हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील सचिन देवसरकर व कंजारा येथील ओम इंदेवार या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सीईओ संदीप माळोदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, राजकुमार मुक्कावार , समाज कल्याण अधिकारी सत्येंद आवूलवार,यात्रेच्या सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, कृषी विभागाचे विविध मान्यवर अधिकारी व माजी पदाधिकारी तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात्रेच्या निमित्याने जिल्हा परिषद प्रशासनामार्फत हा एक मोठा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
लावणी महोत्सवाला हजारोंची उपस्थिती
सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत नऊ संचांकडून सादर झालेल्या लावणी नृत्याने माळेगावात यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना वेड लावले.महोत्सवात संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाने सादरीकरण केले. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांनीही आपली दमदार उपस्थिती नोंदविली.
माळेगावसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
आजच्या सर्व शासकीय कार्यक्रमाचे उद्घाटन लोहाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. माळेगावच्या यात्रेची श्रीमंती वाढविण्यासाठी व परंपरा जोपासण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना प्रसंगी साकळे घालू असे आश्वासन यावेळी त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाला दिले. जिल्हा परिषदेचे सभापती असतानाच्या काळापासून या यात्रेच्या परंपरेची व इथल्या लोककलेची आपण जोडल्या गेलो आहोत त्यामुळे लागणारा खर्च व या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये बदल तसेच नव्याने काही आयोजन करण्याबाबत आपण जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तसेच सर्व लोकप्रतिनिधी मिळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध असल्याचा त्यांनी तीनही कार्यक्रमात पुनरुच्चार केला.
लोकप्रतिनिधींची उपस्थिती
लावणी महोत्सवाला सायंकाळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ.हेमंत पाटील,लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे,आ. बाबूराव कदम कोहळीकर,माजी आ. गंगाधर पटणे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
3 जानेवारीला लोककला महोत्सव
3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.
4 जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.
5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.
00000