डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला मेळावा आणि निबंध स्पर्धा संपन्न
महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणावर विशेष भर
नांदेड, दि. ९ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कविता गंगाधर सोनकांबळे, डॉ. सुचिता संजय पेकमवार (स्त्रीरोगतज्ज्ञ), सुचित्रा भगत (समुपदेशक, महिला व बाल सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), शकीला शब्बीर शेख (सदस्य, जिल्हा महिला सल्लागार समिती) यांनी महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता, सामाजिक भान आणि सशक्तीकरणाच्या विविध पैलूंवर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती लक्ष्मी गायके (वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक) यांनी केले. यानंतर डॉ. सुचिता पेकमवार यांनी महिलांच्या दैनंदिन आरोग्यविषयक सवयी, आरोग्य तपासण्या व आजारांबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. डॉ. कविता सोनकांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला.
सुचित्रा भगत यांनी कौटुंबिक हिंसाचार, सोशल मीडियाचा दुरुपयोग, सायबर सुरक्षेचे मुद्दे यावर महिलांना सजग राहण्याचे मार्ग सांगितले. शकीला शेख यांनी महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावहारिक माहितीने सज्ज होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात स्वाधार योजनेचे धनादेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नांदेड जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीमती गंगातीर ममता यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या उपक्रमात समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळांचे व्यवस्थापक, शासकीय वसतीगृहांच्या महिला गृहपाल व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
०००००