Monday, April 30, 2018


स्काऊट गाईड चळवळीतून देशसेवेची प्रेरणा
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- स्काऊट गाईड चळवळ ही जागतिक स्वरुपाची असून यातून देशसेवेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन राज्याचे  पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातील नांदेड भारत स्काऊटस्‍ आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. कदम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, स्काऊट गाईडेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, माजी आमदार गंगाधर पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
श्री कदम म्हणाले, स्काऊट गाईडमुळे मनात देशभक्ती बरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारिरीक, मानसिक विकासाचा प्रयत्न केला जातो. येथील स्काऊट गाईडचे भवन उत्कृष्ट बांधण्यात आले आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असेही सांगितले.   
प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी स्काऊट गाईड चळवळीचे स्वरुप सांगितले. यावेळी  भारत स्काऊट गाईडचे राज्य उपाध्यक्ष एल. एन. कोंडावार, जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती बी. एम. बच्चेवार, सचिव बी. पी. कुदाळे, कोषाध्यक्ष एन. एम. तिप्पलवाड, जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट पी. एम. कुलकर्णी, जिल्हा संघटन आयुक्त गाईड रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट दिगंबर करंडे, पदाधिकारी, अधिकारी व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.
000000


कर्करोग रुग्णांची संख्या कमी करण्यात
जिल्ह्याचे काम कौतुकास्पद  - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- कर्करुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व जिल्हा कर्करोग नियंत्रण समारंभ कार्यक्रम डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोग निदानावर आरोग्य विभागामार्फत चांगले काम होत आहे. या आजारावरील निदानासाठी आरोग्य विभागाला आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांनी मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भ कॅन्सर या आजारावर योग्य वेळीच तपासणी करुन उपचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यानंतर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय वजिराबाद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री श्री कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आदींची  उपस्थित होते.
000000

खरीप हंगाम जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
खते-बियाणे खरेदीतून
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी  
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- खते-बियाणे खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. यासाठी कृषि खात्याने विशेष लक्ष देऊन बोगस कंपन्याच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. खरीप हंगाम 2018 जिल्हास्तरीय आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
पालकमंत्री श्री कदम म्हणाले, शेतकऱ्यांना संकटातून दूर करण्याची जबाबदारी आता सर्वांची असून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होईल. औषधी फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. याबाबत किटकनाशके औषधांची तपासणी करुन फवारणी करतांना काळजी घेण्याबाबत त्यांना माहिती दयावी. कर्जमुक्ती पासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यास संबंधीत विभागाने सहकार्य करावे. स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करवीत. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी खरीप हंगाम 2017 अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच नांदेड जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती, मागील पाच वर्षाचे पर्जन्यमान, खरीप हंगाम 2017 पेरणी व 2018 प्रस्तावीत क्षेत्र, खरीप 2018 निविष्ठा उपलब्धता, खते व बियाणे मागणी, गुण नियंत्रण अंतर्गत नमुणे काढण्याचे लक्ष व साध्य करण्यात आलेली कारवाई, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी प्रकल्प), कृषि निविष्ठा व्यवस्थापन सन 2018, सर्व समावेशक पीक कर्ज वितरणाचे शासनाचे धोरण, पिक कर्ज माफी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन व हरभरा खरेदी सन 2017-18, कृषि पंपाकरीता महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून विज कनेक्शनबाबत कार्यक्रम सन 2017-18 ची प्रगती व 2018-19 चे नियोजन व आवश्यक निधी, सिंचन व्यवस्थापन, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारीत फळपिक विमा योजना, महावेध स्वयंचलीत हवामान केंद्र उभारणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2016-17 व 2017-18, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना (फलोत्पादन) मार्च 2017 खर्च व 2018-19 आराखडा, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, प्रकल्प आधारीत विस्तार कार्यक्रम, उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण अभियान, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा कृषि महोत्सव योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सन 2017-18, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प, ई-गर्व्हनस विकसीत केलेल्या आज्ञावली आदी विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सुचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018 चे भित्तीपत्रक, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, कपाशीवरील गुलाबी बोंडआळीचे एकात्मिक व्यवस्थापन घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, संबंधित विभागाचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी केले.
प्लॅस्टिक मुक्तीसाठी
कापडी पिशव्यांचा वापर करावा
- पालकमंत्री रामदास कदम  
       
प्लॅस्टिकचे विघटन लवकर होत नाही, यातून प्लॉस्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. कापडी पिशव्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप श्री कदम यांचे हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या सहभागाने बचत गटातील महिलांकडून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कापडी पिशव्याचे काम सामाजिक बांधिलकी मधून उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत 190 महिला काम करीत असून या कार्यक्रमासाठी उद्योजक अजयकुमार बाहेती यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. यातून स्थानीक स्तरावर रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे प्रबोधन होण्यासाठी यावेळी भाजीपाला, फळ विक्रेते, पत्रकार, अधिकाऱ्यांना प्राथमिक स्वरुपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गरीब परिस्थितीवर मात करुन बचत गटाच्या सहाय्याचे झाडू व्यवसाय, बाबू वस्तु तयार करुन विक्री करणे, अगरबत्ती उद्योग, खनावळ, शिलाई काम करणाऱ्या महिलांचा पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
0000000




Sunday, April 29, 2018



महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ
नांदेड, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 1 मे 2018 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


Saturday, April 28, 2018


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत
करण्यास सहाय्य करण्याचे जिल्हाधिऱ्यांचे आवाहन 
नांदेड, दि. 28 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 28 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्याच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आला आहे. त्यांनी असे खराब झालेले , माती लागलेले जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
000000


जि.प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या
समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 28 :- जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार  सार्वत्रिक बदल्या 2018 साठी जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची जिल्हा परिषदे नांदेड अंतर्गत गट क व ड कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2018 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. शनिवार 5 मे 2018 रोजी सकाळी 9 ते दुपारी 11 वाजेपर्यंत- बांधकाम विभाग. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत- लघुपाटबंधारे विभाग. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत- कृषि विभाग. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत- पशुसंवर्धन विभाग. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत- महिला व बाल कल्याण विभाग. दुपारी 4 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- सामान्य प्रशासन विभाग. रविवार 6 मे 2018 रोजी सकाळी 9 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. बुधवार 9 मे 2018 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत- अर्थ विभाग. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत- शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. दुपारी 2 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- ग्रामपंचायत विभाग. या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.  या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


हवामान आधारीत फळपिक विमा योजना
मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी
विमा हप्ता बँकेत भरण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 28 :- मृग बहारामधील मोसंबी फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची मुदत गुरुवार 14 जून 2018 अशी असून इच्छूक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा हप्ता बँकेत भरावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
प्राधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुर्नरचीत हवामानावर योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यासाठी शासनाने 25 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील मृग बहारामधील मोसंबी या फळपिकाचा यामध्ये समावेश केला आहे. पुर्नरचीत हवामान आधारीत पिक विमा योजना सन 2018-19 च्या मृग बहाराकरीता मोसंबी या पिकासाठी एकुण विमा संरक्षीत रक्कम प्रती हेक्टर 77 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता प्रती हेक्टर 3 हजार 850 रुपये एवढा आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिसुचीत केलेल्या महसूल मंडळात इफको टोकीओ विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. मोसंबी फळपिकाखालील पुढील तालुक्यातील महसुल मंडळाचा समावेश आहे. नांदेड तालुक्यात - लिंबगाव व विष्णुपुरी. मुदखेड- मुदखेड व बारड. मुखेड- मुखेड व जाहूर. धर्माबाद- करखेली. हदगाव- हदगाव व पिंपरखेड. कंधार तालुक्यात बारुळ या महसूल मंडळांचा समावेश आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000


 पालकमंत्री रामदास कदम यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 28 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 3 ते 3.30 वा. नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप. स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व जिल्हा कर्करोग नियंत्रण समारंभ कार्यक्रम. स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 4.15 ते 4.30 वाजेपर्यंत जिल्हा कर्करोग नियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यक्रम. स्थळ : श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय वजिराबाद नांदेड. सायं 4.45 वा. जिल्हा स्काउट गाईड भवनचे उद्घाटन कार्यक्रम. स्थळ : मल्टीपरपज हास्कुलच्या मागे वजिराबाद नांदेड. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
00000

Friday, April 27, 2018


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 27 एप्रिल 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शुक्रवार 27 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 26 मे 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
लाभासाठी ग्रामसभेत उपस्थित राहून
माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा 
नांदेड, दि. 27 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.  रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
00000

Thursday, April 26, 2018


मन करा रे शांत !
तुमचा दिवस त्रासात जातआहे?.  तर मग येथे मन शांत आणि लक्ष केंद्रित करण्याची १५ मिनिटाची पध्दत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतय का.
काही दिवस सगळ्या गोष्टी हाताबाहेर जात असतात. कामाचा ताण वाढत राहतो आणि काय करावे हे सुचत नाही. सततची येणारी कामे, अडचणी आणि लोक यांनी तुम्ही त्रासून जाता. शरीर काम करीत असत पण मनात एक वेगळे वादळ उठत असत. काहीच नीट नाही, हि भावना सर्व शक्ती शीण करीत असते.
दिवस अखेरीस, आपल्याला जड आणि तणाव पूर्ण वाटते. त्याहून वाईट म्हणजे, आपण काही तरी महत्वाचे विसरत नाहीना असे वारंवार वाटत राहते. आपण आपला मेंदू बंद करू शकत नाही, विचारांना आवर घालता येत नाही.
याचाच परिणाम म्हणून आपण घरी आल्यावर मुलांवर किंवा इतर लोकांवर चिडचिड करतो. आपला संपूर्ण तणाव मग घरच्यांवर निघतो, जे योग्य नाही. खाली नमूद असलेले साधे आणि सोपे उपाय १५ मिनिटात तुम्हाला प्रफुलीत करु शकतात.
मिनिटांची शारीरिक हालचाल
आधीच कार्यालयात कामे करताना आपले रक्त चांगलेच खवळले आहे तरी इमारतीच्या भवती जलद चालणे फायदेशीर ठरेल. हा एक ब्रेक आपल्या मनात उर्जा निर्माण करेल आणि मूड लिफ्ट करुन ताण खंडित होईल. लक्ष वेगळीकडे वळवल्याने मन शांत होईल आणि तुम्हाला हलके वाटेल. शरीराला आणि मनाला बदल मिळेल.
  मिनिटांची कृतज्ञता
आता आपल्या शरीरात हरलेल्या प्राण परत आले आहे. आपण आपले विचार साफ करण्याची सुरुवात करु शकता. आपण हे सर्व का करीत आहोत हे लक्षात घ्या. आपले जीवन मूल्यवान आहे आणि आपल्याला सुमारे किती लोकांचे समर्थन लाभले आहे ह्याचा विचार करा. त्या सर्व लोकांचे आपण भारी आहोत हि जाणीव कायम लक्षात ठेवा. चांगले आरोग्य, चांगली संधी आणि सुंदर वास्तव्य याच्याबदल कृतज्ञ राहा. आपण एक व्यापक दृष्टिकोन बाळगा. निवडक गोष्टींची टीप लिहून ठेवा. सध्या दुसऱ्या कामाची गरज नाही, महत्वाचे काम संपवा.
मिनिटाचे ध्यान
आता आपले शरीर आणि मन एका सकारात्मक स्थितीत आहेत. साफ मनाने आपले काम करु शकता. ध्यान हे स्वछ विचार आणि आपले केंद्र शोधण्याचे उत्तम साधन आहे. तुम्ही भरपूर गोष्टी ध्यान करण्यासाठी वापरु शकता. कोणी प्रार्थना म्हणत तर कोणी पाय हलवत एखाद गानं गुणगुणत. तुम्ही इंटरनेटवर छान सचित्र किंवा बातम्या वाचू शकता. ह्या सर्व गोष्टींचे तात्पर्य हे कि आपले मन शांत आणि सुखद झाले पाहिजे.
मिनिटाची शांतता
आता आपल्या मनात स्पष्ट करुन टाका की शांतता हवी.  तुम्ही बस एक शांत जागा शोधा आणि तिथे थोडा वेळ शांत बसा. आपल्या डेस्क येथील आपले फोन, दिवे, संगणक आणि सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दोन मिनिटे बंद ठेवा.सर्व प्रेरणा बाहेर अवरोधित करा. स्वत: बरोबर एकटे राहा आणि आपले लक्ष शांततेकडे केंद्रित करा. फोनमध्ये दोन मिनिटाचा टाइमर सेट करा आणि शांत बसा. आता तुम्ही थंड आणि शांत आहात हे स्पष्ट होईल.
मिनिटाचा खोल श्वास
आता शांतपणे शेवटी एक मिनिट उभे रहा. अर्थात, तुम्हाला माहीत आहे की परत कामाला जुंपायचे आहे म्हणून ६० सेकंद दीर्घ श्वास घ्या. आपले पूर्ण लक्ष्य मंद श्वासाकडे केंद्रित करा. एका मिनिटाचा श्वास व्यायाम तुम्हाला ताजं आणि उत्साही बनवेल.आता जागेवर जाऊन परत काम सुरु करायचे आहे. हे काम त्रास घेता करायचे आहे असा चंग बांधा आणि कामावर नवीन जोमाने रुजू व्हा.
हे सर्व उपाय तुम्हाला शरीर आणि मन शांत करण्यास मदकरतील.चला तर मग सुरुवात करूया.!
सुजाता चंद्रकांत
******************

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...