Thursday, January 2, 2020


सुधारित                                                                      जयंती विशेष लेख..

समाजसुधारक सावित्रीबाई फुले
--यशवंत भंडारे,औरंगाबाद

सावित्रीबाई जोतीराव फुले म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, भारतातील पहिल्या शिक्षिका, समाज सुधारक आणि कवयित्री अशी त्यांची ओळख दिली जाऊ शकते. त्यांचे कार्य आणि कृर्तृत्व शब्दातीत आहे. 3जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे आणि सत्यवती नेवसे हे त्यांचे वडील-आई .थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या खाद्याला खांदा लावून त्यांनी स्त्री शिक्षण तसेच एकूणच शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतीकारक कामं केलं. समाजसुधारणेच्या कामात जोतीराव फुले यांना मोलाची साथ दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यात त्या सक्रीय सहभागी झाल्या होत्या. पत्नी ही केवळ अर्धअंगिणी म्हणून ओळखली जाते पण  सावित्रीबाई फुले या पहिल्या खऱ्या सर्वार्थानं अर्धांगिणी होत्या. त्या अधुनिक मराठी काव्य लेखनाच्या अग्रदूतही होत्या.
महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडयात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. त्या शाळेत त्यांनी पहिली शिक्षिका म्हणून कामास सुरुवात केली. कर्मट सामाजिक परंपरांनी ग्रस्त असलेल्या आणि बदलास सहसा राजी नसलेल्या समाजात फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी शाळा सुरु करुन तसं क्रांतीसाठी पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यामुळं धर्म- परंपरांमध्ये जखडलेल्या समाजातील अनेकांना ही बाब पचणी पडणारी नव्हती. अनेकांना आपल्या धर्मात, रुढी परंपरांवरील घाला आहे, असंही वाटू लागलं होतं. त्यांचा या शाळेस तीव्र विरोध होता. परंतु कोणताही समाज बदलास, परिवर्तनास सहकार्य करणारे, प्रसंगी सहभाग देणारी  माणसंही काही प्रमाणात असतात. या शाळेच्या उभारणीत जोतीराव फुले यांना अशा मंडळींनी पाठींबा दिला. भिडे या ब्राम्हण ग्रहस्थानं आपली इमारत ( वाडा ) शाळा सुरु करण्यासाठी उपलब्ध करुन दिली. या शाळेस मी स्वत: 2014 मध्ये भेट देवून पाहणी केली आहे. इमारत आता मोडकळीस आलेली आहे. या इमारतीचे जतन व्हावे म्हणून काही मंडळी  प्रयत्न करीत आहेत.
सावित्रीबाई यांचा  जोतीराव फुले यांच्याशी 1840 मध्ये विवाह झाला. महात्मा जोतीराव फुले यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांचा प्रवेश झाला. सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेत एक मिशन म्हणून खर्चि घातलं. महात्मा जोतीराव फुले यांनी 1 मे, 1849 रोजी पुण्यातील उस्मान शेख यांच्या वाडयात प्रोढांसाठी शाळा सुरु केली. त्या शाळेतही सावित्रीबाईंनी अध्यापनाचं कार्य केलं. त्यानंतर 1849 ते 50 या काळात महात्मा जोतीराव फुले यांच्या बरोबर पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्हयातही शाळांची सुरुवात करण्यात सावित्रीबाईंचा सिहांचा वाटा होता. तिथे काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणून कामही केलं होतं. स्त्रिंया, अस्पृश्य यांच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्यानं धर्म मार्तंडांनी महात्मा फुले यांच्या विरोधात राणं पेटवले होते. त्यामुळं परंपरागत विचारांनी बांधलेल्या जोतीराव फुले यांचे वडील गोविंदराव यांनाही या विरोधाचा त्रास सहन करावा लागत होता. जोतीरावांनी अशा भानगडीत पडू नये, आपले पारंपरिक शेतीची कामं करावीत असेच त्यांना वाटे परंतु महात्मा जोतीराव फुले यांचे मन त्यांना सामाजिक बदलाच्या कामापासून स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी त्यांना जे करावयाचे आहे ते कोणत्याही परिस्थितीत करण्याचा चंगच बांधला होता.अंतिमत: जोतीराव ऐकत नाहीत हे पाहून वडिल गोविंदराव यांनी त्यांना घर सोडण्याचा आदेश दिला. त्यानुसार महात्मा फुल्यांसोबत 1849  मध्ये सावित्रीबाई फुले यांनी वंचितांच्या हितासाठी गृहत्याग केला.
सावित्रीबाई यांची स्वत: शिकवणी घेऊन महात्मा फुले यांनी त्यांना साक्षर केलं होतं. हळूहळू त्यांनी स्वत:च्या सततच्या प्रयत्नांनी शिक्षणात प्रचंड गती मिळविली होती. त्या आता शिक्षणात चांगल्याच निपूण झाल्या होत्या. दररोजच्या अध्यापनातून त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्यांचे दृष्य स्वरुप दिसू लागले होते. 1852 मध्ये जेव्हां त्यांच्या शाळांची तपासणी  झाली तेव्हां अधिकारी भारावून गेले होते. त्यांचे काम कौतूकास पात्र ठरले होते. त्यामुळे तपासणी अधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांना आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय दिला होता. त्यामुळे 12 फेब्रुवारी 1853 रोजी मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्यांचा विश्रामबाग वाडयात गौरव करण्यात आला. या समारंभात सर्व शाळांचा बक्षिस समारंभ एकत्रितपणे घेण्यात आला.
विधवा स्त्रियांना विवाह करण्याची त्या काळी परवानगी नव्हती. त्यामुळे अतिशय तरुण वयात स्त्रियांना वैधव्याचं , हालाखिचं, कोंडमाऱ्याचं जीवन जगावे लागत असे. त्यांच्या आशा परिस्थितीचा फायदा घरातील पुरुष मंडळींकडून किंवा इतरांकडून घेतला जात असे. त्यातून त्यांनां मुलं होत असतं, त्यांच्या मुलांचा कोणी सांभाळ करण्यास तयार नसे. यातून अशा बालकांची हत्या करण्याचे प्रकार मोठया प्रमाणात घडत असतं. ही अमानुष्य प्रथा बंद व्हावी म्हणून समाजमन तयार करण्याची गरज होती. परंतु धर्म आणि रुढीग्रस्तेने जखडलेल्या समाजात या बाबत बोलणेही पाप समजले जात होते. आशा काळात 1853 मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या बालहत्या प्रतिबंधक गृहात दाखल होणऱ्या मुलांची सावित्रीबाई फुले अतिशय प्रेमाणे काळजी घेत असतं. सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची आणि त्यांच्या मुलांची आई प्रमाणे काळजी  घेण्याचं मोठ कामं सावित्रीबाईनं मोठया धाडसानं सुरु ठेवलं आणि ते शेवट पर्यंत  पूर्णत्वास नेलं. विधवा झालेल्या महिलांचे केस कापले जात असत कारण त्यांना विद्रुप केले तर कोणाचे त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही, असा एक भ्रामक कयास यामागे होता. पण अशा विधवा महिला अनेक वेळा इच्छा नसतांना  ‘केशवपण ’ करत असतं. तेव्हा ही महिलांना विद्रुप करणारी प्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्यात केश कापणाऱ्या  ‘ कारागीरांचा ’ संपही घडवून आणला होता. यात सावित्रीबाईंचाही मोठा सहभाग होता.
सावित्रीबाई फुले यांची स्वत:ची अशी ग्रंथसंपदाही होती. त्यात त्यांचा पहिला काव्य संग्रह ‘काव्यफुले ’ हा 1854 मध्ये प्रसिध्द झाला. तर दुसरा काव्यसंग्रह ‘बावनकशी सुबोध रत्नकार’ हा जोतीराव फुले यांच्या महानिर्वाणानंतर म्हणजे 1891 मध्ये प्रसिध्द झाला. याशिवाय सावित्रीबाईंनी मोठया प्रमाणात स्फुट लेखनही केले होते.  ‘ काव्यफुले ’ या कविता संग्राहाचे त्या काळी मोठया प्रमाणत स्वागत झाले. अधुनिक काव्याचे जनक म्हणून समीक्षकांनी त्यांचा गौरव केला होता,असे म्हणता येईल. केशवसुताच्या जन्माआगोदर सावित्रीबाईंचा कव्यसंग्रह प्रसिध्द झाला. केशवसुताचा जन्म 1866 मध्ये झाला होता. मराठी वाङमय इतिहासकारांनी सावित्रीबाईंच्या  ‘काव्यफुले ’ या काव्यसंग्राहाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही, अशी खंत व्यक्त केली जाते. या दोन्ही काव्यसंग्रहातील कवितांचा आशय खुप उत्तम प्रतिचा आहे. या काव्य संग्रहातून त्यांची निसर्ग, समाज यांच्याकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी स्पष्ट होते. या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंची सामाजिक, निसर्ग विषयक , आत्मपर, बोधपर, कवि-काव्य विषयक , प्रार्थनापर, ऐतिहासिक किंवा इतिहासातील पराक्रमी महापुरुषांच्या कार्यावर, सामाजिक गुलामगिरीवर, धार्मिक रुढीवर हल्ला चढवत सामाजिक वैगुण्यांवर नेमकेपणानं बोट ठेवणाऱ्या आहेत.
माहात्मा जोतीराव फुले यांनी 1855 मध्ये पुण्यात रात्र शाळा सुरु केली. दिवसभर काम करणाऱ्या हातांना शिक्षण कसे मिळेल, असा त्यामागे हेतू होता. आणि जगण्यासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच महात्मा फुले यांनी रात्र शाळा सुरु केली. शाळा तर सुरु केली पण तेथे कोण शिकवणार असा प्रसंग निर्माण झाला. तेव्हा सावित्रीबाईच पुढे सरसावल्या त्यांनी याही शाळेत शिकवण्याचे काम केले. 25 डिसेंबर 1856 मध्ये जोतीराव फुले यांच्या भाषणावरचे पुस्तकही  सावित्रीबाईंच्या  प्रयत्नातून प्रसिध्द झाले, असे म्हटले तर वावगे ठरु नये. केवळ बालसुधार गृह सुरु करुन म्हात्मा फुले शांत बसले नाहीत. त्यांना विधवांचे पुनर्विवाह करुन द्यावयाचे होते. त्यासठी मदत करावयाची होती. हा विचार त्यांनी सावित्रीबाई यांच्याकडे व्यक्त केला तेव्हा सावित्रीबाई यांनी त्यांना स्फुर्त पाठींबा दिला. मात्र त्यामागे हटणाऱ्यांपैकी नव्हत्या . सावित्रीबाईंनी याही कामी महात्मा जोतीराव फुले यांना सक्रीय पाठींबा दिला. त्यातून 1860 मध्ये या दाम्पत्यांनी विधवा पुनर्विवाहास सहाय्य करण्याच्या कामास प्रारंभ केला. ज्यांना कोणी सहाय्य करण्यास तयार नाही. ज्यांच्यासाठी कोणी पुढे येत नसे अशावेळी महात्मा फुले त्यांचे आश्रयदाते होतं असतं. वंचितांचे  आश्रु पुसण्याचे केवळ नाटक करुन समाजात बदल होत नाहीत. त्यासाठी  ‘कृती ’ ची जोड असावी लागते. हे ओळखूण या दांपत्यानं पुण्यात 1864 मध्ये अनाथ ‘बालक आश्रमा ’ ची स्थापना केली आणि ते तातडीने कार्यान्वितही केले.
अस्पृश्यांच्या समस्यांची यादी त्याकाळी फारमोठी होती. जगण्याच्या साधनांपासून वंचित असलेली किंवा ठेवल्या गेलेल्या या समाजाला जीवनाच्या प्रत्येक टप्यावर ‘याचनाच’करावी  लागेल. इतरांच्या दयेवर आवलंबून असलेल्या अस्पृश्यांना खाण्यापासून- पाण्यापर्यंत इतरांच्या म्हणजेच स्पृश्यांच्या दयेवर अवलंबून राहवे लागे. स्पृश्यांना दया कधी होईल नि कधी कोप होईल हे सांगता येत नसे. त्यामुळे जीवनावश्यक असलेले पाणीही मिळण्यासाठी अस्पृश्यांच्या जीवनाची लाहीलाही होत असे. पुण्यातील अस्पृश्यांच्या पाण्यांची समस्या ध्यानात आल्यावर महात्मा फुले यांनी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्याला सावित्रीबाईंनी पाठींबाच दिला नाही तर या कामी त्यापुढे राहिल्या. पाण्यासाठी महिलांनांच अधिक त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव त्यांना होती.
महात्मा फुले यांनी 1868 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांच्या हयातीत आणि नंतरही सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे काम हिरहिरीने केले. स्वत:चा दत्तक घेतलेला मुलगा ‘यशवंत ’ याला उच्च शिक्षित केले. वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षण घेऊन तो डॉक्टर झाला. त्याचा विवाहही फुले दाम्पत्यांने सत्यशोधक पध्दतीने केला. त्यातही सावित्रीबाई अग्रणी आणि अग्रही होत्या. 1875 ते 1877 या कालखंडात पुणे परिसरात पडलेला दुष्काळ असहाय्य झाला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी जनतेला मदत करण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाई  फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुणे परिसरात 52 ठिकाणी  अन्नछत्रे सुरु करुन ती त्यांनी चालवली. या कार्याचे संपूर्ण नेतृत्वच सावित्रीबाईंनी केले होते.          28 नोव्हेंबर 1890 रोजी पती महात्मा जोतीराव फुले यांचं निधन झालं. सावित्रीबाईंचा आधारवड, गुरु, मार्गदाता आणि मित्र असे सर्व काही असणारा आधार महात्मा फुले यांच्या निधनाने नाहीसा झाला. पण्‍ त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी जोतीराव यांचे कार्य पुढेही सुरुच ठेवले. त्यात खंड पडू दिला नाही. शिक्षण , महिलांना उभं करण्याचं काम , आनाथंचं काम, शेतकरी,अस्पृश्यांच्या अडचणीत त्यांना सहाय्य करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या कामाचा उरक बघून सत्यशोधक समाजाच्या कार्यकत्यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. त्यातून महाराष्ट्रात प्रबोधनाची नवी वाट रुळण्यास मदत झाली.
पुण्यात 1897 मध्ये मोठया प्रमाणत नागरिकांचे प्लेग या साथीच्या रोगाने मृत्यू होत होते. ज्यांना प्लेगची लागन झाली आहे. त्यांना आलीप्त ठिकाणी ठेवण्याची मोहीम ब्रिटीश प्रशासन राबवत होते. पण यातही सामाजिक रुढी परंपराचा आडथळा येत होता. त्यातून समस्या गंभीर बनत चालली होती . लोकांना अलिप्त ठिकाणी पाठवण्याच्या कामात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते काम करीत होते. सावित्रीबाई स्वत: प्रशासनास मदत करत होत्या. त्यातही छोटी मुलं-मुलींना स्वत:च्या हातावर घेऊन त्यांना उपचार मिळावेत म्हणून कशोशिने प्रयत्न करत होत्या. त्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली. त्या आजारी पडल्या. अन् त्यात त्यांचा 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. समाज शिक्षण, सामाजिक परिवर्तन, समाजक्रांतीची जी ज्योत माहात्मा फुल्यांनी पेटवलेली होती. ती ज्योत प्लेगच्या झंझावतात निमली पण सावित्रीबाईनं शिक्षणाची जी ज्ञानज्योत लावली होती त्या ज्योतीचं  आज दीपस्तंभात रुपांतर झालयं. देशातील सर्व समाजातील मुलं-मुली शिक्षण घेऊन सन्मानानं जगण्याचा मार्ग चोखाळत आहेत. हीच त्यांना मिळालेली खरी आदरांजली आहे, असं वाटतं.
---  यशवंत भंडारे,औरंगाबाद
                                                    9860612328

*****


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...