शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेच्या कर्जाची
माहिती ऑनलाईन अर्जात अपडेट करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 19 :-
शेतकऱ्यांनी
एकापेक्षा जास्त बँकेकडून कर्ज घेतले असेल व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाईन अर्जात उल्लेख
केला असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमाफी अर्जामध्ये दुरुस्ती करुन जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांच्या कर्जाची आणि बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर
जाऊन ऑनलाईन अर्जामध्ये अपडेट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
केले आहे.
छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 30 जुन 2016 अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार पर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना सन 2015-16 मध्ये घेतलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत प्रोत्साहनपर
अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत एका शेतकरी कुटुंबास महत्तम 1 लाख 50
हजार रुपये मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन
अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेबर 2017 पर्यंत आहे.
शेतीसाठी कर्ज घेत
असताना काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बँकेकडून व सेवा सहकारी
संस्थेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु ऑनलाईन अर्ज
भरताना केवळ एकाच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. अशा सभासदांनी
दोन्ही बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख त्यांच्या अर्जात करणे आवश्यक आहे.
अशा सभासदांनी सर्व बॅकांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीचे एकत्रीकरण
वरिष्ठ पातळीवर संगणकाद्वारे होणार आहे. त्यामुळे अशा सभासदांनी अपुर्ण माहिती दिली
असल्यामुळे त्यांचे कर्जमाफीचे किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचे अर्ज तात्पुरते अपात्र
ठरविले जाणार आहेत. सर्व शेतकरी बांधवानी त्यांनी सर्व बँकांकडून
घेतलेल्या कर्जाची माहिती ऑनलाईन अर्जात नमूद करावी. तसेच त्यांचे
कर्जखाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधीत बँक शाखेस व गटसचिवास आधार
कार्डची प्रत दयावी जेणे करून या योजनेतील लाभापासून ते अपात्र ठरणार नाहीत.
तांत्रिक किंवा इतर कोणत्याही
कारणामुळे एकही शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी
व आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार
यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव संबंधित
तालुक्याचे उप/ सहायक निबंधक, सहकारी संस्था
हे आहेत. समन्वय समितीच्यावतीने योजनेची अमंलबजावणी आपल्या तालुक्यात
करणे व त्यासाठी आवश्यक असल्यास तालुकास्तरीय विविध यंत्रणांचे सहकार्य मिळविणे,
योजनेतील अर्जदारांची पोर्टलवरील यादी प्रिंट करुन यादीचे चावडी वाचन
करुन प्राथमिक पडताळणी करणे, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त
आहेत किंवा कसे ? याची शहानिशा गावपातळीवर करणे. यादीतील संबंधित अर्जदारांच्या नावासमोर त्यांच्या पात्र / अपात्रतेसंबंधी संक्षिप्त शेरे अथवा सुस्पष्ट अभिप्राय नोंदविणे आदी कामे तालुका
स्तरीय समितीकडून केली जाणार आहेत.
कर्जमाफीस पात्र होण्यासाठी बँकेकडे आधार कार्ड
व केवायसी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी
बँकेकडे आधार कार्ड दिलेले नाही त्यांनी त्वरित आधार कार्डची प्रत बँकेकडे जमा करावी.
शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेशिवाय इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी,
त्यांना एकूण 1 लाख 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार
आहे, असेही जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment