वृत्त क्र. 486
जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध,
शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खरेदी करावी
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यास माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात युरिया खताची मागणी वाढत असल्यामुळे जिल्ह्यात 21 हजार 779 मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सध्या विविध कंपनीचे 23 हजार 503 मे. टन युरिया खताच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासणार नाही यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे व पुढे सुध्दा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी तेलवर्गीय सोयाबीन पिकास युरिया खताचा वापर टाळावा. सोयाबीन हे तेलवर्गीय पिक असल्यामुळे पिकांच्या मुळावर उपलब्ध असलेल्या गाठी हवेतील नत्र शोषण करुन पिकास नत्र उपलब्ध करुन देतात. त्यामुळे सोयाबीन पिकास युरिया खताचा वापर टाळून पिकाची अनावश्यक वाढ थांबवता येईल. त्यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल व पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमिनीची पोत टाळता येईल व पिकाना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल. तरी शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच पिकास युरिया खताचा वापर करावा, असे कृषि विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment