Thursday, December 8, 2016

विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने
कृषिनिविष्ठा उपलब्ध करुन दयाव्यात
-         जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
नांदेड, दि. 8 :- कॅशलेस व्यवहारामुळे कृषि निविष्ठांची खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी स्वाईप ( पीओएस ) मशीनची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने आदा करण्याबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते. यावेळी नांदेड मनपाचे आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि अधिकारी पी. एस. मोरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कृषि विभागाचे, बॅकेचे अधिकारी व कृषिनिष्ठा विक्रेते उपस्थित होते.
शेतकऱ्यांमध्ये कॅशलेश व्यवहारासंबंधी बँकानी जागृती करुन या डिजिटल पद्धतीच्या वापरासाठी त्यांना प्रेरीत करावेत. जनधन योजनेमुळे प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. बँक खाते उघडताना कार्ड दिलेले आहे. परंतू त्याच्या वापराअभावी कार्ड बंद असले तरी ते पुन्हा बँकेशी संपर्क साधून सुरु करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी या कार्डच्या सहाय्याने करता येईल. विक्रेत्यांनी बँकेकडून स्वाईप (पीओएस) मशीन घेवून ही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावी असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहाराचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. बँकांनी डिजीटल बँकिंग पद्धतीची माहिती देण्यासाठी गावोगावी प्रात्यक्षिकांचे उपक्रम हाती घ्यावेत. पोस्टर, माहितीपत्रके, दृकृश्राव्य आदींचा वापर करण्यावर भर दयावा. बँकांना जोडलेल्या गावात प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करावेत. शेतकऱ्यांची शंकांचे निरासरन करण्यासाठी मास्टर टेनर नियुक्त्या कराव्यात, प्रत्येक बँकांनी किमान एका गावाची निवड करुन गाव कॅशलेस करण्याचे प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांचे बँक खाते नसेल तर त्यांना प्रिपेडकार्ड घेता येणार आहे. त्यामुळे कृषि निविष्ठा खरेदीस अडचण येणार नाही. त्यासाठी बँकांनी त्यांना मदत करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कृषि अधिकारी पी. एस. मोरे यांनी कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची पद्धतीची माहिती सादरीकरणाने दिली तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रफुल्ल जोगी यांनी कॅशलेस व्यवहारासाठी पर्यायी माध्यमाची माहिती सादरीकरणातून दिली.
या बैठकीच्या चर्चेत मनपा आयुक्त श्री. उन्हाळे , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. वाघमारे यांनी भाग घेवून विधायक सूचना केल्या.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 52 बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल ति...