Thursday, December 8, 2016

दैनंदिन कॅशलेस व्यवहारासाठी बँकांनी
अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे
-         जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड, दि. 8 :- दैनंदिन कॅशलेस व्यवहार करताना शेतकरी व सामान्य नागरिकांना अधिकाधिक सुविधा सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी प्रयत्नशील रहावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आज कॅशलेस व्यवहारांविषयी सादरीकरणातून माहिती देण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच आयुक्त समीर उन्हाळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदी विविध विभागांचे अधिकारी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून, नागरिकांपर्यंत दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहार करताना कॅशलेस व्यवहाराचा वापर करण्यासाठी बँकांनी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  बँक खाते आधार कार्डाशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घेतल्यास कॅसलेस व्यवहाराच्या सुविधेस मदत होईल. खात्यात होणाऱ्या व्यवहाराची अद्यावत माहिती ग्राहकांना मिळू शकेल. त्यामुळे आर्थिक व्यवहारात अधिक पारदर्शकता आणणे सहज शक्य आहे. यासाठी बँकांनी कॅशलेस व्यवहारासंबंधी अधिकाधिक जागृती निर्माण करुन सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
 शासकीय योजनांचा लाभ वस्तु व रोख स्वरुपात न देता रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर संबंधित विभागाने जमा करावेत. अधिकारी व बँकांनी यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी. कॅशलेस व्यवहारासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही बँकांनी स्पाईप (पीओएस) मशीन अधिकाधिक उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रफुल्ल जोगी यांनी सादरीकरणातून कॅशलेस व्यवहारासंबंधी असणारे पर्यायांची माहिती दिली.

– डिजिटल बँकिंगचे विविध मार्ग –
यूपीआय : या पद्धतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम मध्ये नोंदवा. संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा. आपला आयडी तयार करा. आपला पिन नंबर सेट करा. यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात. यूएसएसडी : आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा. आपल्या फोन वरुन * 99 # डायल करा. आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे, फंड ट्रान्स्फर- MMID हा ऑप्शन निवडा. ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि MMID टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा. यानंतर आपण आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात. ई वॅलेट : एसबीआय बडी paytm, freecharge यापैकी कोणतेही वॅलेट डाऊन लोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी लिंक करा, आता तुमचा फोन हेच तुमचे वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे. स्वाईप (पीओएस) : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा. आपले कार्ड स्वाईप करा, आपला पिन नंबर टाका, पावती घ्या. आधार संलग्न पेमेंट पद्धती : आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा. आपण आपली देवाण-घेवाण, खात्यावरील शिलकेची चौकशी, पैसे जमा करणे, काढणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता.
0000000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 52 बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल ति...