Monday, July 19, 2021

 

जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी लसीकरणासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून योगदान द्यावे

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) 19 :- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. तथापि सद्यस्थितीत कोरोनावरील प्रभावी उपचार म्हणून अवघे जग लसीकरणावर भर देत आहे. जिल्ह्यातील 102 शासकिय लसीकरण केंद्रामार्फत आजवर आपण लसीकरण करीत आलो आहोत. याची व्याप्ती अधिकाधिक प्रमाणात वाढविण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. याचबरोबर आजच्या घडीला ज्या शासकिय यंत्रणा आहेत त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील खाजगी दवाखाण्यांनी लसीकरणासाठी स्वत:ची केंद्रे सुरु करुन जितक्या लवकर लसीकरण करता येईल ते सर्वांच्या आरोग्याच्यादृष्टिने अधिक महत्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आज जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य सुरक्षितता, संभाव्य तिसरी लाट, मुलांच्या आरोग्याचे व्यवस्थापन आणि लसीकरणासाठी खाजगी दवाखाण्यांचा सहभाग या विषयावर व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय कदम, डॉ. देवेंदसिंघ पालीवाल, इंडियन पेडियाट्रीक असोशिएसनचे डॉ. श्रीरामे, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. शितल लव्हेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, मनपा उपायुक्त अजितपाल संधू, औद्योगिक असोशिएसनचे प्रतिनिधी, गिरीष देशपांडे, आदी उपस्थित होते.

 ज्या वर्गाला लसीकरणासाठी लागणारा जो काही खर्च असेल तो उचलण्याची तयारी ठेऊन हे लसीकरण खाजगी दवाखाण्यातील केंद्रामार्फत घेतल्यास ती एक प्रकारची देशसेवाच आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. यासाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. त्यानुसार कोविडशील्डसाठी 780 रुपये तर कोव्हॅक्सीनसाठी 1 हजार 410 रुपये निर्धारीत केले आहेत. खाजगी दवाखाण्यांना आपली मागणी cowin.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदवावी लागेल. हे योगदान ज्या नागरिकांना देणे शक्य आहे त्यांनी आवर्जून दिल्यास शासनाला दुर्लक्षीत वर्गावर अधिक लक्ष केंद्रित करुन त्यांना लसीकरण करता येईल. लसीकरणासाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था यांनी पुढे येऊन आपल्या फॅक्ट्रीतील सहकाऱ्यांचे लसीकरण करुन घेतल्यास त्यांना त्यांचे उद्योग भविष्यात सुरळीत चालू ठेवता येऊ शकतील. याचबरोबर नांदेड महानगरातील जेवढे दुकानदार आहेत त्यांनीही आवर्जून या लसीकरणात सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेत नेमकी काय स्थिती असू शकेल हे जर अस्पष्ट असले तरी लसीकरण ज्या व्यावसायिकांचे झाले आहे त्यांच्यासाठी ही अधिकची सुरक्षा असेल हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे, असे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेतील संभाव्य धोका लहान मुलांवर असून त्याबाबत योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  



*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...