Tuesday, June 25, 2024

 वृत्त क्र. 525

सिकलसेल तपासणी करा आणि सिकल आजाराची साखळी खंडीत करा

·  19 जून ते 3 जुलै 2024 या कालावधीत सिकलसेल पंधरवड्याचे आयोजन

·  1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने सिकलसेल तपासणी करुन घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 :- “सिकल आजाराची साखळी खंडित करणे अत्यंत आवश्यक आहे. “ सिकलसेल आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राज्याने निवडक जिल्ह्यामध्ये 19 जून रोजी सिकलसेल नियंत्रण दिन साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सिकलसेल रोग हा लाल रक्तपेशीसी संबंधित विकार आहे. हा विकार सामान्यतः लाल रक्तपेशींच्या आकारावर आणि कार्यावर परिणाम करतो. ही एक गंभीर समस्या आहे. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 19 जून रोजी जागतिक सिकलसेल जागरुकता दिवस साजरा केला जातो. त्यानुषंगाने जन-जाती कार्य मंत्रालय भारत सरकार आणि जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने 19 जून ते 3 जुलै 2024 सिकलसेल पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी प्रत्येक 1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने जबाबदारीने स्वताहून पुढे येऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

हा आनुवंशिक आजार असून एका पिढीतून पुढच्या पिढीत बालकांना संक्रमित होत असतो. त्यामुळे विवाहापूर्वी रक्त तपासणी करूनच विवाह करा असा सल्ला देण्यात येत असतो.

काय आहे सिकल सेल आजार ?

सिकल सेल रोग हा एक आनुवंशिक विकार आहे. ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशी विकृत होतात. यामुळे शरीरातील या पेशी लवकर नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरात निरोगी लाल रक्तपेशीची कमतरता निर्माण होते. यामुळे, रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह देखील थांबू शकतो. लाल पेशी सामान्यतः गोल आकाराच्या असतात, परंतु सिकलसेल रोग असलेल्या लोकांमध्ये त्यांचा आकार सामान्य विळाच्या (सिकल) आकाराच्या असतात. सिकलसेलची लक्षणे सामान्यत: लाल रक्तपेशी या गोलाकार व लवचीक असतात तर सिकलसेल लाल रक्तपेशी विळाच्या आकाराच्या असतात तसेच कडक असतात. शरीरातील रक्त कमी होणे किंवा अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, हात आणि पाय सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतु संसर्ग होणे, अवयवांचे नुकसान, संसर्ग, शरीराच्या वेगवेगळ्या भागात तीव्र वेदना, दृष्टी समस्या, थकवा जाणवणे इत्यादी प्रमुख लक्षणे आढळून येतात.

सिकल सेल तपासणी कोणी, कशी आणि कुठे करावी ?

जिल्ह्यात 1 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्त्तींची मोफत सिकलसेल तपासणी करून त्यांना सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम विषयी मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार बाधित रुग्णांना मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराचे संपूर्ण उपचार नाही, पण नियंत्रण मात्र शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सिकलसेलचे गांभीर्य ओळखून सर्व 1 ते 40 वयोगटातील व्यक्तींची सिकलसेल तपासणी अवश्य करून घेणे आवश्यक आहे. 1 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या बोटातून एक थेंब रक्त घेऊन सोल्युबिलिटी चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली जाते. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हारुग्णालये, स्त्री रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, मोबाईल मेडिकल युनिट यांच्या मार्फत सिकलसेल सोल्यूबिलिटी चाचणी मोफत केली जाते.

सिकल आजाराची साखळी खंडित करण्यासाठी असे विवाह टाळा

सिकलसेल बाधित रुग्णांना लाल रंगाचे कार्ड, सिकलसेल आजार वाहक असलेल्या रुग्णांना पिवळे कार्ड आणि निरोगी असल्यास पांढरे कार्ड उपलब्ध करून देण्यात येते. करीता लाल आणि लाल कार्ड धारक किंवा लाल आणि पिवळे कार्ड धारक तसेच पिवळे आणि पिवळे कार्ड धारक बाधितांचे (दोन रंगीत कार्ड धारकांचे) लग्न टाळणे आवश्यक आहे जेणेकरून सिकल आजाराची साखळी खंडित करणे शक्य होईल आणि हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

जन-जागृती

सिकलसेल आजार नियंत्रणात ठेवणे हा राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याने जन-जाती कार्य मंत्रालय, आरोग्य विभाग भारत सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. विशेषतः आदिवासी भागातील व्यक्तींचे वयोगटातील जेवढ्या लवकर तपासणी होईल तेवढ्या तत्परतने बाधित रुग्णांना औषधोपचार आरोग्य आणि विवाह बाबतीचे समुपदेशन करण्यात येत आहे. अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये , तांडे – वाडी आणि समूह यांच्यात आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन समुपदेशन करतात. याकामी आशा कार्यकर्ती आणि आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या सहायाने जन-जागृती करण्यात येत आहे. शासनाद्वारे विविध वृत्त-पत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आकाशवाणी यावर सिकल संबधित माहिती उपलब्ध करून देत आहेत.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 24 दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान  नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम  नांदेड दि. 5 जानेवारी : ...