Friday, May 22, 2020


शिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींना   
तांदूळ वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना
नांदेड, दि. 22 (जिमाका) :-  अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय 19 मे 2020 अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी लावण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍या आर्थिक उपाययोजना अंतर्गत आत्‍मनिर्भर भारत वित्‍तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्‍या निर्दशानुसार राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेतर्गत किंवा कोणत्‍याही राज्‍य योजनेत समाविष्‍ट नसलेल्‍या विना शिधापत्रिकाधारक व्‍यक्‍तींना मे व जुन 2020 या दोन महिन्‍याच्‍या कालावधीसाठी प्रतिव्‍यक्‍ती प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत देण्‍याबाबत निर्देशीत केले आहे.
लाभार्थ्‍यांचे निकष : राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप पर्यंत शिधापत्रिका प्राप्‍त न झालेले व्‍यक्ती. अन्‍न धान्‍याची गरज असलेल्‍या सामाजिक व आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल विस्‍थापित मजूर, रोजंदारी  मजूर. संदर्भ क्र. 5 च्‍या पत्रान्‍वये प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक. परंतू राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजना तसेच इतर राज्‍य योजनेतील शिधापत्रिकाधारक यातून पूर्णपणे वगळण्‍यात येतील.
मोफत तांदूळ वितरणाची कार्यपध्‍दती
विना शिधापत्रिकाधारकांची यादी निश्चित करणे :  नॅशनल डिजस्‍टर मॅनेजमेंट (NDMA) अॅथोरिटी यांचे संकेतस्‍थळावरील यादी, तहसिलदार, जिल्‍हा परिषद, महानगरपालिका यांचेकडे प्राप्‍त झालेल्‍या याद्या लॉकडाऊन काळात एनजीओ यांनी मदत केलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांची यादी या सर्व याद्या विचारात घेण्‍यात याव्‍या.
यापुर्वी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडन विनाशिधापत्रिकाधारकांची यादी तयार करण्याबाबत कळविण्‍यात आले आहे. त्‍यानुसार आपण आपल्‍या कार्यक्षेत्रातर्गत विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्‍यांची यादी तयार केली असेलच सदर यादी संबंधीत क्षेत्रातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील नगरपालिका कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी करण्‍यात यावी व पात्र लाभार्थी निश्चित करण्‍यात यावेत. त्यानंतर केंद्रनिहाय पात्र लाभार्थ्‍यांची यादी संबंधीत तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांच्‍या नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करुन व्‍यापक प्रसिध्‍दीच्‍या दृष्‍टीने आवश्‍यकतेनुसार इतरत्र  प्रसिद्ध करण्‍यात यावे.
अशा प्रकारच्‍या याद्या स्‍वस्‍तधान्‍य दुकाननिहाय तयार कराव्‍या व दुकाननिहाय लाभार्थ्‍याची संख्‍या निश्चित करावी. आवश्‍यकतेनुसार प्रभाग निहाय याद्या करुन सदर प्रभागातील सर्व लाभार्थी एका दुकानास जोडण्‍यास हरकत नाही. त्‍याअनुषंगाने धान्‍याचे नियतन निश्चित करावे. या कामकाजासाठी पोलिस, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कामगार विभाग, उद्योग विभाग यांचे प्रतिनिधींची मदत घेण्‍यात यावी.
अन्‍नधान्‍य वितरण केंद्र केंद्र प्रमुख निश्चित करणेः संबंधित क्षेत्रामध्‍ये स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार हा केंद्रप्रमुख असेल व त्‍या क्षेत्रासाठी स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारामार्फत धान्‍याचे वाटप करण्‍यात येईल. या रास्‍तभाव दुकानावर एका शासकीय कर्मचारी यांचे नेमणूक करण्‍यात यावी. सदर शासकीय कर्मचारी हे रास्‍तभाव दुकानातुन होणारे अन्‍नधान्‍य वाटप याबाबत नियंत्रण ठेवतील व तसा अहवाल तहसिल कार्यालयास करणे बंधनकारक असेल आणि प्रत्‍येक 10 स्‍वस्‍तधान्‍य दुकानांसाठी एका नोडल ऑफीसर म्‍हणून मंडळ अधिकारी/ विस्‍तार अधिकारी किंवा तत्‍सम दर्जाचे अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी. सदर नोडल ऑफीसर हे त्‍यांना नेमुण देण्‍यात आलेल्‍या 10 रास्‍तभाव दुकाना पैकी कोणत्‍याही दुकानास अचानक भेट देवुन अभिालेखाची तपासणी करतील व तसा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील. सदर कामासाठी ज्‍या अधिकारी /कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत करताना सदर कर्मचारीकडे कोरोना विषयक सोपविलेल्‍या कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. एका विहीत केलेल्‍या केंद्रावरील लाभार्थी दुसऱ्या केंद्रावर जाऊन तांदळाचा लाभ घेणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी.
अभिलेख ठेवणेः समवेत दिलेल्‍या नमुन्‍यात सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी अभिलेख ठेवणे आवश्‍यक राहील व संपर्क अधिकारी यांनी सदर अभिलेखाची दैनंदिन तपासणी करावी. तहसिलदार यांनी सदर अभिलेख आपल्‍या स्‍तरावर जतन करुन ठेवावेत व त्‍यानुसार महिना निहाय अखेर विहीत नमुन्‍यात अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावा.
जबाबदारी, दक्षता : प्रत्‍येक स्‍वस्‍तधान्‍य दुकानावर तांदुळ वितरणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्‍ध करुन द्यावा. तसेच त्‍याकरीता संबंधित क्षेत्रातील दक्षता समिती सदस्‍य, संबंधित नगरसेवक, ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घ्‍यावी.  
प्रत्‍येक वितरण केंद्रावर गर्दी टाळण्‍यासाठी सामाजिक अंतराचे Social Distance नियमांचे पालन करणे आवश्‍यक राहील. पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वितरण करण्‍यापुर्वी विहित हमीपत्र भरुन घ्‍यावे.  
विनाशिधापत्रिका लाभार्थ्‍यांना ऑफलाईन धान्‍य वितरण करावयाचे आहे. त्‍यासाठी लाभार्थ्‍यांचा प्रमाणित आधारकार्ड क्रमांक आवश्‍यक असेल किंवा शासनाकडुन देण्‍यात आलेली कोणतेही ओळखपत्र पाहुन तपासणी करावी. सदर लाभार्थ्‍यांचे नाव, आधारकार्ड क्रमांक, धान्‍य वाटप दिनांक, मोबाईल क्रमांक (असल्‍यास) इत्‍यादी गोष्‍टींची आवश्‍यक तपशिल नमुद करावा, तसेच ezee अॅप प्रणालीद्वारे  एपीएल केशरीचे धान्‍य वाटप केले आहे, ezee अॅप वापरणेबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सविस्‍तर सुचना दिलेल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे विनाशिाधापत्रिकधारक यांनाही  ezee अॅप प्रणालीद्वारे धान्‍य वितरीत करण्‍यात यावे.आपल्‍या गावातील केंद्र निहाय पात्र लाभार्थ्‍यांची यादी गावातील सर्व केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.
दिलेल्या सुचनांप्रमाणे तात्‍काळ कार्यवाही करुन स्‍वस्‍त धान्‍य दुकान निहाय पात्र लाभार्थ्‍यांच्‍या याद्या निश्चित करण्‍याची कार्यवाही कोणत्‍याही परिस्थितीत आजच तात्काळ पुर्ण करण्‍यात यावी व आपल्‍या तालुक्‍यासाठी तांदळाची मागणी तात्काळ पुर्ण जिल्हा पुरवठा कार्यालयाचे ई-मेलवर सादर करावी.  शासन निर्णयातील सर्व सुचना व ezee अॅपद्वारे अन्‍नधान्‍य वाटप करावयाच्‍या सुचना  बंधनकारक असुन इतर सुचना या मार्गदर्शक स्‍वरुपाच्‍या आहेत. पात्र लाभार्थी निवड करणे व पारदर्शक धान्‍य वितरण यासाठी आवश्‍यकतेनुसार अतिरिक्‍त उपाययोजना कराव्‍यात, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना सुचित केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...