Friday, May 28, 2021

 

बीज प्रक्रीयेत जैविक जिवाणू खताचा वापर करावा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे           

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जैविक जिवाणू संघ-रायझोबियम सोयाबिन, तुर, मुग, उडीद, अझॅटोबॅक्टर-ज्वारी, बाजरी, कापुस इत्यादी जैविक जिवाणू खते जैविक किडनियंत्रण प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी शेतकरी बांधवानी बिजप्रक्रियेसाठी जिवाणू संवर्धन खताचा वापर करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगाशाळेचे तंत्र अधिकारी एस.एस.स्वामी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे. 

जैविक जिवाणू खते सेंद्रीय व सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक, टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही. हवेतील नत्र, स्पुरद, पालाश शोषुन व साठवून नंतर पिकाला उपलब्ध करुन देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करुन त्यापासून तयार केलेल्या खताला जैविक जिवाणू खते म्हणतात. यामध्ये एकदल व तृणधान्य उदा. ज्वारी, बाजरी, भात, कपाशी या खरीप हंगामातील पिकास उपयोगी असलेले ॲझॅटोबॅक्टर जिवाणू खत तसेच शेगवर्णीय व द्विदल पिकासाठी उपयोगी असलेले रायझोबियम खत हे तुर, उडीद, मुग, मटकी, चवळी व सोयाबिन पिकासाठी वापरता येते. ॲझॅटोबॅक्टर व रायझोबियम या दोन खतापासून वातावरणातील नत्र स्थीर करुन पिकांना उपलब्ध होते. रासायनिक खताच्या मात्रा कमी होऊन खर्च कमी होऊ शकतो. तसेच सर्व पिकांना उपयुक्त व आवश्यक असलेले स्फुरद व पालाश हे पी.एस.बी. व के.एम.बी. या जिवाणूद्वारे पिकांना उपलब्ध होते. 

बीज प्रक्रियेसाठी दहा किलो बियाणे स्वच्छ फरशीवर, प्लास्टीक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर 100 मि.ली. जैविक जिवाणू खताचे मिश्रण असलेले द्रावण शिंपडून हलक्या हाताने बियाण्यास चोळावे, प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. वाळलेले बियाणे त्वरीत पेरावे. जैविक जिवाणू खत वापरण्यापुर्वी जर बियाण्यास किटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इत्यादी लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात दिडपट लावणे चांगले राहील. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जिवाणूसंवर्धन मिसळू नये. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे जिवाणू संवर्धन असते. जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात 7 ते 10 टक्के वाढ आढळून आली आहे. तसेच वापराने जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते. जिवाणूखताचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो. जिवाणू संवर्धन खते वापरण्यास अत्यंत सोपे व कमी खर्चाचे आहे, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...