Tuesday, June 25, 2024

 वृत्त क्र. 526 

अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 
नांदेड दि. 25 :- जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे, मार्च-एप्रिल 2023 मध्‍ये झालेल्‍या गारपिठ  व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै  2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्‍हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत  5 लाख 14 हजार 183  शेतक-यांना 415 कोटी रुपयांचे  अनुदान बॅंक खात्‍यावर  वितरण  करण्‍याची  मान्‍यता  देण्‍यात आली आहे.  त्‍यापैकी जिल्ह्यातील 66 हजार 339 शेतकरी यांनी ई-केवायसी न केल्‍यामुळे रक्‍कम  रुपये 42 कोटी नुकसान  भरपाईचा निधी प्रलंबित आहे. तरी शेतक-यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तहसीलदारांना दिले आहेत.


त्याअनुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी  (e-Kyc)करणे बंधनकारक आहे.


त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. अशा शेतक-यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ती  करून घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 वृत्त क्र. 525

सिकलसेल तपासणी करा आणि सिकल आजाराची साखळी खंडीत करा

·  19 जून ते 3 जुलै 2024 या कालावधीत सिकलसेल पंधरवड्याचे आयोजन

·  1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने सिकलसेल तपासणी करुन घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 :- “सिकल आजाराची साखळी खंडित करणे अत्यंत आवश्यक आहे. “ सिकलसेल आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राज्याने निवडक जिल्ह्यामध्ये 19 जून रोजी सिकलसेल नियंत्रण दिन साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सिकलसेल रोग हा लाल रक्तपेशीसी संबंधित विकार आहे. हा विकार सामान्यतः लाल रक्तपेशींच्या आकारावर आणि कार्यावर परिणाम करतो. ही एक गंभीर समस्या आहे. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 19 जून रोजी जागतिक सिकलसेल जागरुकता दिवस साजरा केला जातो. त्यानुषंगाने जन-जाती कार्य मंत्रालय भारत सरकार आणि जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने 19 जून ते 3 जुलै 2024 सिकलसेल पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी प्रत्येक 1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने जबाबदारीने स्वताहून पुढे येऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

हा आनुवंशिक आजार असून एका पिढीतून पुढच्या पिढीत बालकांना संक्रमित होत असतो. त्यामुळे विवाहापूर्वी रक्त तपासणी करूनच विवाह करा असा सल्ला देण्यात येत असतो.

काय आहे सिकल सेल आजार ?

सिकल सेल रोग हा एक आनुवंशिक विकार आहे. ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशी विकृत होतात. यामुळे शरीरातील या पेशी लवकर नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरात निरोगी लाल रक्तपेशीची कमतरता निर्माण होते. यामुळे, रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह देखील थांबू शकतो. लाल पेशी सामान्यतः गोल आकाराच्या असतात, परंतु सिकलसेल रोग असलेल्या लोकांमध्ये त्यांचा आकार सामान्य विळाच्या (सिकल) आकाराच्या असतात. सिकलसेलची लक्षणे सामान्यत: लाल रक्तपेशी या गोलाकार व लवचीक असतात तर सिकलसेल लाल रक्तपेशी विळाच्या आकाराच्या असतात तसेच कडक असतात. शरीरातील रक्त कमी होणे किंवा अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, हात आणि पाय सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतु संसर्ग होणे, अवयवांचे नुकसान, संसर्ग, शरीराच्या वेगवेगळ्या भागात तीव्र वेदना, दृष्टी समस्या, थकवा जाणवणे इत्यादी प्रमुख लक्षणे आढळून येतात.

सिकल सेल तपासणी कोणी, कशी आणि कुठे करावी ?

जिल्ह्यात 1 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्त्तींची मोफत सिकलसेल तपासणी करून त्यांना सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम विषयी मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार बाधित रुग्णांना मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराचे संपूर्ण उपचार नाही, पण नियंत्रण मात्र शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सिकलसेलचे गांभीर्य ओळखून सर्व 1 ते 40 वयोगटातील व्यक्तींची सिकलसेल तपासणी अवश्य करून घेणे आवश्यक आहे. 1 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या बोटातून एक थेंब रक्त घेऊन सोल्युबिलिटी चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली जाते. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हारुग्णालये, स्त्री रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, मोबाईल मेडिकल युनिट यांच्या मार्फत सिकलसेल सोल्यूबिलिटी चाचणी मोफत केली जाते.

सिकल आजाराची साखळी खंडित करण्यासाठी असे विवाह टाळा

सिकलसेल बाधित रुग्णांना लाल रंगाचे कार्ड, सिकलसेल आजार वाहक असलेल्या रुग्णांना पिवळे कार्ड आणि निरोगी असल्यास पांढरे कार्ड उपलब्ध करून देण्यात येते. करीता लाल आणि लाल कार्ड धारक किंवा लाल आणि पिवळे कार्ड धारक तसेच पिवळे आणि पिवळे कार्ड धारक बाधितांचे (दोन रंगीत कार्ड धारकांचे) लग्न टाळणे आवश्यक आहे जेणेकरून सिकल आजाराची साखळी खंडित करणे शक्य होईल आणि हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

जन-जागृती

सिकलसेल आजार नियंत्रणात ठेवणे हा राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याने जन-जाती कार्य मंत्रालय, आरोग्य विभाग भारत सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. विशेषतः आदिवासी भागातील व्यक्तींचे वयोगटातील जेवढ्या लवकर तपासणी होईल तेवढ्या तत्परतने बाधित रुग्णांना औषधोपचार आरोग्य आणि विवाह बाबतीचे समुपदेशन करण्यात येत आहे. अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये , तांडे – वाडी आणि समूह यांच्यात आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन समुपदेशन करतात. याकामी आशा कार्यकर्ती आणि आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या सहायाने जन-जागृती करण्यात येत आहे. शासनाद्वारे विविध वृत्त-पत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आकाशवाणी यावर सिकल संबधित माहिती उपलब्ध करून देत आहेत.

00000



वृत्त क्र. 524

सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश 

नांदेड दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत.  

 

सामाजिक न्यायसांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 28 एप्रिल 2006 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्तपोलीस अधीक्षकजि.प. समाज कल्याण अधिकारीउच्च शिक्षण संचालकशिक्षणाधिकारी निरंतर जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिकजिल्हा क्रीडाधिकारीप्राचार्य तंत्रशिक्षणप्राचार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणसहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअसे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

000000

 

 वृत्त क्र. 523

कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

नांदेड दि. 25 :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत कृषिदिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत साजरा करण्यात येणार आहे.

कृषिदिनाच्या दिवशी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा वृक्ष देवून गौरव करण्यात येणार आहे. या कायर्क्रमात शेतकऱ्यांना किटनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, गुलाबी बोंडअळी नियंत्रण, नॅनो फर्टीलायझरचा वापर, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन विविध पिके लागवड तंत्रज्ञान, एकात्मीक खत व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी किटकनाशक फवारणी करताना वापरावयाची सेफ्टीकिटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. तालुकास्तरावरु पंचायत समिती व कृषि विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्यत्वाने शेतकऱ्यांच्या शेतावर वृक्ष लागवड, विहिरीचे जलपुजन, विहीर पुर्नभरण, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे कृषि विकास अधिकारी विजय बेत्तीवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000 

सारथी अंतर्गत अभिनव उपक्रमाची चित्रफीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी





मुलांची पाहिली कमाई आणि भावनिक झालेले पालक !
मराठा समाजासाठीच्या योजनेचे 'सारथी'चे प्रशिक्षणानंतरचे दमदार सादरीकरण

•“सारथी व एमकेसीएल” यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात दोन हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे मोफत प्रशिक्षण.

नांदेड, दि. 25 : सरसेनापती वीर बाजी पासलकर “शिकता शिकता कमवा” या योजने अंतर्गत आज एका अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पहिल्या कमाईतून आपल्या आई-वडिलांना मुलांनी भेटवस्तू दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या उपस्थितीत हा भावनिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी आज या उपक्रमात आपल्या पालकांसह सहभाग नोंदवला होता. मुला मुलींच्या पहिल्या कमाईतील पैशातून आपल्याच आई-वडिलांना भेटवस्तू देण्याचा हा कार्यक्रम एक भावनिक सोहळा झाला.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे मार्फत एमकेसीएलच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण केंद्रद्वारे दिनांक 1 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य कार्यक्रम सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्स नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यात राबविला जात आहे.

यामाध्यमातून आतापर्यंत 2100 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आधुनिक जगात रोजगारक्षम करण्यासाठी सारथी संस्था प्रयत्नशील आहे. नांदेड शहरातील सारथी संस्थेमार्फत छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी वीर बाजी पासलकर “शिकता शिकता कमवा” या योजने अंतर्गत आत्मसात केलेल्या संगणक कौशल्याचा वापर करून स्थानिक स्तरावर पदवीधर विद्यार्थ्यांचा बायोडाटा तयार केला. एक्सलचा वापर करून लेखा माहिती तयार केली ,डीटीपीचा वापर करून काही बॅनर तयार केले.इत्यादी संगणकीय कामकाज करून त्यांना जो मोबदला मिळाला आहे,या पैशातून सदर कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना भेटवस्तू घेतली होती.

त्यांना सदर विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या कमाईतून घेतलेली भेट वस्तू निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर, एमकेसीएलचे नांदेड जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव तसेच संबंधित प्रशिक्षण केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत भेट वस्तू देण्यात आल्या. सारथी संस्थेच्या प्रशिक्षणाबाबत उपजिल्हाधिकारी श्री.वडदकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदन केले. यावेळी प्रशिक्षण देणारे जिल्ह्यातील बहुतांश संस्थाचालक ही उपस्थित होते. त्यांचाही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
तत्पूर्वी, विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे क्षेत्र व त्यातील करियर यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री मिरजकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते अनेकांनी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊल ठेवले होते. आपल्या पाल्याकडून आयुष्यात पहिल्यांदाच भेट वस्तू घेणारे पालक या कार्यक्रमाच्या आयोजनाने व आपल्या मुलांच्या उपलब्धीने भारावून गेले होते.
गरीबी श्रीमंती यापेक्षा
सिद्ध करणे महत्त्वाचे
अपयशासाठी आपण गरीब आहोत. श्रीमंत आहोत. अमूक आहोत. तमूक आहोत, ही सर्व कारणे देता येतात. मात्र सिद्ध करण्यासाठी त्याची गरज नसते. सिद्ध करणारा सर्व अडथळे पार करतो. त्यामुळे स्वतःला सिद्ध करा कोणताही अडथळा तुम्हाला यशापासून परावृत्त करू शकत नाही.त्यामुळे आता बेस बनला आहे. उंच भरारी घ्या, असा संदेश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आपल्या संक्षिप्त संबोधनात यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

000000 





 वृत्त क्र. 522 

 वृत्त क्र. 521 

मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी

पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·  25 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात यादी तपासण्याची तसेच नावे चढविणे व कमी करण्याची संधी

 

नांदेड दि. 25 : मतदार यादी मध्ये आपले नाव नाही, आपले नाव व्यवस्थित नाही, छायाचित्र नाही, आपल्या नगरातील मृत व्यक्तींची नावे आहे, चुकीची नावे आहे अशा अनेक तक्रारी मतदानाच्या दिवशी केल्या जातात. मात्र या सर्व बाबींवर मात करण्याची संधी आता येणाऱ्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगांनी मतदारांना दिली आहे. २५ जून पासून मतदान पुनरिक्षण कार्य नांदेड जिल्ह्यात सुरू झाला आहे. आपले नाव आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्याची संधी आयोगाने दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर  आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. 25 जुलै रोजी जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे. 25 जुलैला ही यादी तपासून आपली नावे घालता येणार आहे. कमी करता येणार आहे. किंवा नावांमध्ये सुधारणा करता येणार आहे. 9 ऑगस्टपर्यंत यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला आहे. या कालावधीतच नागरिकांनी जागरूकतेने हे काम पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये ही यादी दर्शनी भागात लावलेली असणार आहे.

 

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25 जून 2024 ते २४ जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8 चे अर्ज उपलब्धध होतील. दिनांक 2 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करुन शकतील.  दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्येक अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्याा तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्येच अर्ज करता येईल.  Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी ,वगळणी, स्थलांतरण, दुरुस्ती‍ इत्यादी करु शकतात.

 

नांदेड जिल्ह्यात सर्व तहसिल  कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केला जाऊ शकतो. अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्याचा कालावधी  मंगळवार 25 जून 2024 ते  बुधवार 24 जुलै 2024 असा आहे.

 

पुनरिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे- गुरुवार, 25 जुलै 2024,  दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- गुरुवार, 25 जुलै 2024 ते शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024,  विशेष मोहिमांचा कालावधी-  दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार,  दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे, पुरवणी याद्यांची छपाई करणे- सोमवार, 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा  दिनांक  मंगळवार 20 ऑगस्ट 2024 असा आहे.

 

मतदानाच्या दिवशी आपल्या नावाबद्दल तक्रार अनेक जण करतात. तथापि, लोकशाहीमध्ये आवश्यक असणाऱ्या या अभियानात मतदार तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.या सर्व तारखांवर लक्ष ठेवून योग्य नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

 वृत्त क्र. 520 

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी

30 जून अखेरची तारीख : अभिजीत राऊत

 

·  राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश   

·   मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा

 

नांदेड दि. 25 : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे 30 जून पर्यंत निकालात निघाले पाहिजे, असे सक्त आदेश आज संपूर्ण जिल्हा यंत्रणेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. राज्यस्तरीय आढावा बैठकीला उपस्थित महसूल व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेला त्यांनी याबाबतीत स्पष्ट निर्देश आज दिले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व वरिष्ठ अधिकारी मुंबईतून खरीप आढावा बैठकीत सहभागी झाले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथून आदेश देत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या,बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील संपूर्ण यंत्रणेला 30 तारखेपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याची तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे, औषध विक्री याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे जिल्ह्यातील यंत्रणेला निर्देश दिले.


खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हाट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

000000









Monday, June 24, 2024

वृत्त क्र. 519   

26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन

·         विद्यार्थी व नागरिकांनी मोठया संख्येने समता दिंडीत सहभागी व्हावे

नांदेड दि. 24 :- सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत असून सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या समता दिंडीत मोठया संख्येने सहभाग घ्यावाअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल. या समता दिंडीमध्ये नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत सहभाग घ्यावाअसे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.   

00000 

   वृत्त क्र. 518

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

नांदेड दि. 24 :-जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत 17 जून 2024 होती.  आता आवेदन पत्र सादर करण्याची विलंब शुल्काची निर्धारित मुदत संपल्यानंतर अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारून आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रु. 50 प्रतिदिन प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आहे. सोमवार 24 जून ते 1 जुलै 2024 असा आहे. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत प्रतिदिन 100 रुपये प्रतिविद्यार्थी असून मंगळवार 2 जुलै ते 8 जुलै 2024 पर्यत आहे. अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी याप्रमाणे असून मंगळवार 9 जुलै ते सोमवार 15 जुलै 2024 पर्यत आहे. आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची  प्रिंट आऊट व आवेदनपत्र जमा करण्याच्या दिवसांपर्यतचे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अति विशेष अतिविलंब शुल्क घेण्यात यावे. हे शुल्क मंडळाकडे प्राप्त झाल्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

प्रचलि‍त पध्दतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहित प्रपत्रासह पाठविण्यात यावे. तसेच अतिविलंब/विशेष अतिविलंब/अति विशेष अति विलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारावी.

अशा विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ निश्चित करेल त्याच परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल. तसेच त्याचा निकाल इतर विद्यार्थ्यांबरोबर जाहीर होवू शकला नाही तरी विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकनार नाही असे विद्यार्थ्याकडून हमीपत्र घेण्यात यावे. ही बाब माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना सूचित करावी .

राज्य मंडळ कार्यालयाकडून अतिविलंब /विशेष अतिविलंब /अति विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची मंजुरी 15 जुलै 2024 पर्यत घेण्यात यावी. तसेच राज्यमंडळ कार्यालयाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मान्यता देणे शक्य होईल अशा बेताने आवेनदन पत्रांचे तक्ते राज्यमंडळाकडे सादर करावेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000 

  वृत्त क्र. 517

बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

नांदेड दि. 24 :- श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी नांदेड यांच्या तर्फे बारावी उर्त्तीण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) 2024 कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 26 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी, नांदेड यांच्या मार्फत केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरीचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत 12 वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे हे या एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध संधीची कल्पना आणि वेगाने होत असलेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना फायदा होवून त्यांचे भविष्य कसे उज्वल होईल या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरील सविस्तर माहिती तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त असलेले विविध पदवी अभ्यासक्रम, त्यांना प्रवेश घेतांना लागणारी पात्रता, प्रवेश नियमावली, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया, अर्ज भरण्याची प्रक्रीया, प्रक्रीयेला साधारण कालावधी, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. याला अनुसरून प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्ज निश्चिती करणे, गुणवत्ता यादीमधील त्रुटी दुरुस्त करणे, अंतिम गुणवत्ता यादी तपासणी, विकल्प सादर करणे, कॅप जागा वाटप, जागास्वीकृती करणे, जागावाटप केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष जावून प्रवेश घेणे इत्यादी प्रवेश प्रक्रीयेशी संबंधीत बाबींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.  तसेच यासोबतच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या विषयी माहिती देवून अभियांत्रिकीय शिक्षण कमी खर्चात पूर्ण करुन रोजगारक्षम तसेच उद्यमशिल उद्योजक कसे बनता येईल आणि प्लेसमेंट संबंधी विस्तृत माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.

00000 

Friday, June 21, 2024

  वृत्त क्र. 516

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन

नांदेड दि. 21 :- सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत असून सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या समता दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल. या समता दिंडीमध्ये नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.   

00000 

  वृत्त क्र. 515

आरोग्‍य विभागात 10 वा आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 

नांदेड दि. 21 :- योग शास्‍त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, स्‍थुलपणा, थॉयराईड वृध्‍दी, मनोविकार, सांध्‍याचे विकार तसेच सध्‍याच्‍या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्‍यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्‍या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्‍यास व रोग मुक्‍त होण्‍यामध्‍ये मदत मिळते, यासोबतच सकारात्‍मक उर्जा मिळते असे प्रतिपादन   जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. 

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्‍या निर्देशानुसार जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्‍या मार्गदर्शनात जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, आयुर्वेदीक दवाखाने, युनानी दवाखाने, नागरी दवाखाने व उपकेंद्र येथे आज योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. 

आयुष मंत्रालयाने Yoga for Self and Society योग स्‍वयंम और समाज के लिए ही संकल्‍पना आयुष मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी ठेवली आहे. आरोग्‍य विषयक समस्‍या समुदाय स्‍तरावर वाढताना दिसत आहेत. या समस्‍यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी व निरामय आरोग्‍यासाठी आहार-विहारात बदल करण्‍याची गरज आहे. यासाठी योगाचा अंगीकार करणे व तो समुदायस्‍तरावर नेऊन समाजाला आरोग्‍यदायी करणे हे या संकल्‍पनेच्‍या केंद्रस्‍थानी आहे. तरी नागरीकांनी आपल्‍या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले. 

जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालये, ग्रामीण रुग्‍णालये येथेही रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम साजरा करण्‍यात आला व योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळा घेण्‍यात आली होती .जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्‍या मार्गदर्शनात आज 21 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम व प्रात्‍यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी अति.जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.सलमा हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाभाऊ बुट्टे यांनी धन्‍वंतरी पूजन व दिपप्रज्‍वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. जिल्‍हा आयुष अधिकारी डॉ. सत्‍यनारायण मुरमुरे, आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ. जवादुल्‍लाह खान, आयुष कार्यक्रम व्‍यवस्‍थापक डॉ. सुनिल भंडारे व सुभाष खाकरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षक मधूकर भारती  यांनी योग प्रात्‍यक्षिके करुन योग व प्राणायाम बाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन योगासने केली.

00000

  वृत्त क्र. 526   अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   नांदेड दि. 25 :- जिल्ह्यात गत ...