Friday, May 15, 2020


आदेशातील अटींच्या अधीन राहून
कंटनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रात मद्य विक्री सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- शासनाने लॉकडाऊन कालावधीमध्ये अनुज्ञप्त्या शनिवार 16 मे 2020 पासून सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत आणि घाऊक / ठोक मद्यविक्री अनुज्ञप्त्या (नमुना एफएल-1 व सीएल-2) सायं. 5 वाजेपर्यंत सुरु करुन देण्यास नमुद पुढील अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. याबाबत किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक (नमूना एफएल-2 / एफएलबिआर-2) यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
घाऊक / ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्यांबाबत : ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार  चालू करण्यात येतील. शहरी भागातील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. परंतू सायं. 5 वाजल्यानंतर सुरु ठेवता येणार नाहीत. नमूद आदेशानुसार कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे घाऊक विक्रेत्यांवर बंधनकारक राहतील. संबंधीत अनुज्ञप्तीमधील सर्व नोकरांची / कामगारांची थर्मल  स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास किंवा कामगारास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, त्यास अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देऊ नये. घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डिस्टन्सिगचे पालन करावे.
किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्यांबाबत : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांचे निर्देश व शासनाने पारित केलेले आदेशानुसार राज्यातील नमूना एलएल-2 अनुज्ञप्ती प्रकारात स्पिरीट, सौम्य मद्य, बिअर व वाईन तर नमुना एफएल / बिआर-2 अनुज्ञप्ती प्रकारात बिअर व वाईन व नमुना एफएल / डब्लू-2 अनुज्ञप्ती प्रकारात वाईन सीलबंद घरपोच परवानाधारकास विक्री करण्यास परवानगी दिली आहे. ही कार्यवाही शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले लॉकडाऊनचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत लागू राहिल. याबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे राहतील.
राज्यात घरपोच मद्यसेवा ही ज्या जिल्ह्यात अनुज्ञप्त्या कार्यरत ठेवण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने परवानगी दिली आहे, तेथे कंटेनमेंट झोन वगळून देता येईल. घरपोच मद्यसेवा ही किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती प्रकार म्हणजेच एफएल 2, एफएल / बिआर-2 व एफएल / डब्लू 2 मधून विक्रीसाठी असलेल्या नमूद मद्य प्रकारासाठी राहिल. तथापि देशी मद्याची घरपोच मद्य सेवा देता येणार नाही. केवळ घरपोच मद्यसेवा पुरविणे बंधनकारक असून गर्दी टाळण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत अनुज्ञप्तीमधून थेट ग्राहकास मद्य विक्री करता येणार नाही. घरपोच मद्यविक्री सेवा ही केवळ अधिकृत वैध नमुना एफएलएक्ससी परवानाधारकास करण्यात येईल. ग्राहकाकडे परवाना नसल्यास त्यास नमूना एफएल-एफ परवाना अनुज्ञपतीधारक देतील. याशिवाय हा परवाना  https://exciseservices.mahaonline.gov.in / https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ उपलब्ध आहे.
मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवानाधारक-ग्राहक व्हॉट्सअप, लघुसंदेश, भ्रमणध्वनी, दूरध्वनीचा वापर करु शकेल. किरकोळ मद्य विक्री करणारा अनुज्ञप्तीधारक असा क्रमांक ठळकपणे दुकानाबाहेर प्रदर्शित करतील तसेच अनुज्ञप्तीधारक पर्याप्त उपलब्ध माध्यमांचा वापर करुन घरपोच सुविधा देण्याची कार्यवाही करतील.
मागणीप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी अनुज्ञप्तीधारकास त्यांच्या स्वत:ची वितरण व्यवस्था करावी लागेल. शासन आदेशाप्रमाणे विहित कालावधीसाठी मर्यादीत सेवा असल्याने वितरण व्यवस्था करणाऱ्या इसमांसाठी मद्याची ने-आण करताना वाहतूक परवान्याऐवजी सामान्य निरीक्षक किंवा दुय्यम-निरीक्षक दर्जाच्या कमी नसलेल्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने मंजूर केलेले ओळखपत्र देण्यात येतील.
अनुज्ञप्तीधारकाने वितरीत व्यवस्थेसाठी आवश्यकतेनुसार मुनष्यबळ ठेवावे. तथापि त्यांची संख्या 10 पेक्षा अधिक नसावी. ओळखपत्र असलेला व्यक्ती एकावेळी ग्राहक / ग्राहकाच्या मागणीपेक्षा अधिक मद्य वाहतूक करणार नाहीत. तथापि अशा व्यक्ती डिलीव्हरी बॉय कोणत्याही परिस्थितीत 24 युनिट पेक्षा जास्त मद्याची वाहतूक करणार नाहीत.
मद्य वितरीत करणारे डिलीव्हरी बॉय यांनी पिवळ्या रंगाचा लिकर डिलीव्हरी बॉय असा उल्लेख असलेला टी-शर्ट घालूनच मद्य वितरीत करणे बंधनकारक आहे. आपणास सकाळी 10 ते सायं. 6 यावेळेतच मद्याची घरपोच विक्री करता येईल.
अनुज्ञप्तीधारक घरपोच मद्यसेवा किंवा त्याचे वितरण व्यवस्था चोख करण्यास जबाबदार असेल. मद्य घरपोच पुरविल्यानंतर अनुज्ञप्तीधारक मद्य पोच झाल्याचा पुरावा प्राप्त करतील. परवानाधारकाकडून मद्याची किंमत ही रोख स्वरुपात अथवा क्रेडिट / डेबिट कार्ड स्वॅप मशिनच्या माध्यमातून डिलीव्हीर बॉयने स्वीकारावी. अनुज्ञप्तीधारकास मद्याची घरपोच सेवा देताना मद्य छापील किरकोळ विक्री किंमतीने (एमआरपी) विक्री करणे बंधनकारक आहे. घरपोच मद्यसेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क, सेवा शुल्क आकारण्यात येऊ नये.
वितरण व्यवस्थेत वापरण्यात येणाऱ्या व्यक्ती, डिलीव्हरी बॉय यांच्या बाबतीत पुढील बाबती पाळणे बंधनकारक आहे.
डिलीव्हीर बॉय याची नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी (आरएमपी) यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करावी व वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असावा, तसे प्रमाणपत्र प्राप्त करुन त्यांनी सदर प्रमाणपत्र सोबत बाळगावे. अशा प्रमाणपत्राधारकास ओळखपत्र देण्यात येईल. या व्यक्तींना मास्क, हेडकॅप व हॅण्डग्लोज वापरणे बंधनकारक राहिले. सदर व्यक्तीने निर्जुतुकीकरणासाठी हॅण्ड सॅनिटयझरचा वापर वेळोवेळी करणे बंधनकारक राहिल. अनुज्ञप्तीधारकास या कामगारांचे वेळोवेळी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक राहिल. जर कामगाराचे शारिरीक तापमान विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले तर त्याचे ओळखपत्र तात्काळ काढून घ्यावे व त्याची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्यास मदत करावी. जे डिलीव्हरी बॉय नोकरी सोडून जातील अथवा त्यांना कामावरुन कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात येईल. तेंव्हा त्याचे ओळखपत्र न चूकता संबंधीत कार्यक्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे जमा करण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारकाची राहिले. केंद्र शासन व राज्य शासनाच्या लॉकडाऊन संदर्भाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घरपोच मद्य वितरण सेवेमध्ये कार्यरत व्यक्तींना आपत्ती निवारण, चोख स्वच्छता राखणे व कोव्हिड संदर्भात इतर बाबतीत जसे सेतू ॲपचा वापर याबाबत सखोल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारकांची राहिल.  
घरपोच मद्य सेवा देणे हा एक अलिखीत करार असून सदरचा करार अनुज्ञप्तीधारक, वाहतूक करणारा व परवानाधारक-ग्राहक यांच्यातील असून यातील कोणत्याही बाबींच्या वादासंबंधामध्ये शासन अथवा राज्य उत्पादन शुल्क विभाग जबाबदार राहणार नाही. संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी नमूना एफएलआर-3 व एफएलआर-3 ऐ नोंदवहीमध्ये घरपोच मद्यविक्री होत असलेल्या मद्याच्या विशेष नोंदी करावयाच्या आहेत. त्याशिवाय घरपोच मद्यविक्री केलेल्या परिमाणाची एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
प्रचलीत नियमान्वये असलेल्या मद्य बाळगणे, वाहतूक करणे इत्यादी मद्य सेवन परवान्यातील तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधीत अनुज्ञप्तीधारकाने घ्यावयाची आहे. सदर शासन आदेश व कोव्हिड 19 मुळे घरपोच मद्य सेवेच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीधारक व दोषींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथीचे रोग कायदा 1897 भारतीय दंड संहितेच्या कलम 188 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये फौजदारी कारवाईस पात्र राहतील. याबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणारे आदेश अनुज्ञप्तीधारकास बंधनकारक राहतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशातील तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन ही कार्यवाही शनिवार 16 मे 2020 पासून लागु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सर्व अनुज्ञप्तीधारकांना आवश्यकता भासल्यास जिल्हा प्रशासनास आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती करावी. तसेच मार्गदर्शक तत्वाचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 व त्याअंतर्गत नियमान्वये संबंधीत अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी 15 मे रोजी निर्गमीत केले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...