Friday, November 29, 2024

वृत्त क्र. 1151

​महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांना सूचना

· रविवार 1 डिसेंबर रोजी परीक्षेचे आयोजन

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत आयोजित महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा-2024 परीक्षा रविवार 1 डिसेंबर 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 33 उपकेंद्रावर होणार असून उमेदवारांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

या परीक्षेसाठी उमेदवाराने अद्यावत प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन ) त्‍याची प्रत आणणे सक्‍तीचे आहे. परीक्षेस येतेवेळी उमदेवाराने ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्‍वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्‍मार्ट कार्ड प्रकारचे ड्राईव्हिंग लायसन्‍स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच सकाळ सत्रासाठी आणि दुपार सत्रासाठी मुळ ओळखपत्राची स्‍वतंत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. मुळ ओळखपत्राच्‍या पुराव्‍याऐवजी त्‍यांच्‍या छायांकित प्रत अथवा कलर झेरॉक्‍स अथवा अन्‍य कोणत्‍याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्‍यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमदेवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल.

आयोगाने मनाई केलेल्‍या स्‍मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्‍याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्‍लूटूथ, दुरसंचार साधने म्‍हणून वापरण्‍यायोग्‍य कोणतीही वस्‍तू, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोटस , परवानगी नसलेली पुस्‍तके, बॅग्‍ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्‍यादी प्रकारची साधने, साहित्‍य परीक्षा केंद्राच्‍या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्‍यास स्‍वतः जवळ बाळगण्‍यास त्‍याचा वापर करण्‍यास अथवा त्‍याच्‍या वापरासाठी इतरांची मदत घेण्‍यात सक्‍त मनाई आहे. उमदेवारांना आयोगाने या परीक्षेच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या सुचनाचे पालन करावे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000

 वृत्त क्र. 1150

शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :-  भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. 

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा URL www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करावयाच्या कार्यवाहीचे सादरीकरण दिले आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने  दिले आहेत. 

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. 

शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेतकरी माहिती संच निर्माण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र राज्याचा शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी स्वयं नोंदणी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल व शेतकरी माहिती संचात समाविष्ट करता येणार आहे. 

00000

वृत्त क्र. 1149

चिकुनगुन्या प्रभावित क्षेत्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट

प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनाबाबत केले मार्गदर्शन

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :-  देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात 23 नोव्हेंबर 2024 रोजी चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच पेडपल्ली या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक व उपचारात्मक प्रभावी काम कसे करायचे, या बाबतीत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांना आवश्यक त्या सूचना केल्या. 

तसेच प्रतिबंधासाठी मरखेलचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. योगिता चामले, आरोग्य सहाय्यक डी. एल. कुलकर्णी, आरोग्य सेवक ए.एस. खांडरे, आरोग्य सेविका श्रीमती येदगिवार या वैद्यकीय पथकाद्वारे गावात रुग्णांवर उपचार केला जात आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस प्रजातींद्वारे पसरतो.  हे डास जेव्हा विषाणूने आधीच संक्रमित व्यक्तीला चावतात तेव्हा ते संक्रमित होतात. विषाणू प्राप्त केल्यानंतर, डास त्यांच्या चाव्याव्दारे इतर मानवांमध्ये पसरवू शकतात. 

चिकुनगुनियाची लक्षणे साधारणपणे संक्रमित डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसांनी सुरू होतात. सामान्य लक्षणांमध्ये अनेकदा अचानक आणि 102°F (39°C) पर्यंत पोहोचू शकते. सांध्यामध्ये तीव्र वेदना, विशेषत: हात आणि पाय जे अनेक दिवस टिकू शकतात. सामान्यत: स्नायूत  वेदना होतात. सौम्य ते गंभीर डोकेदुखी अत्यंत थकवा आढळून येतो. 

चिकनगुनियासाठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या जात असून, चिकुनगुनियाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घर परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. दर आठवड्यास शनिवारी कोरडा दिवस पाळावा. घर परिसरात फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. पाण्याचे साठे झाकणाने घट्ट झाकून ठेवावेत. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा बांधावा. तसेच ग्रामपंचायतीने गावातील पाणी साचणारे खड्डे बुजवून घ्यावेत. तुंबलेली नाली व गटारी वाहत्या कराव्यात. चिकुनगुनियाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांनी केले.

00000







 


वृत्त क्र. 1149

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर

30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन 

                                                                                                                                                                      नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठिंबक व तुषार सिंचनाबाबत तालुकास्तरावर, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व  अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे. 

00000

Thursday, November 28, 2024

वृत्त क्र. 1148

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील

लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी

नांदेड दि. 28 नोव्हेंबर :- राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 लाभार्थ्यापेकी 746 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु अद्यापपर्यत 651 लाभार्थ्यानी आधार पडताळणी पूर्ण करणे बाकी आहे. आधार पडताळणी बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश आहे.  त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत शासनाचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे. त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिण्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही. लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मिळाल्यानंतर मोबाइलवर संदेशाच्या रुपाने वेळोवेळी देता येईल. मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही, मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.

प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तीक लाभार्थ्याचीच जबाबदारी आहे. कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करु शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईलवरुन किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आधारला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारक्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. परंतु या लाभार्थ्यांना हे करण्यास अडचण व माहितीचा अभाव असल्याने त्यांना  शक्य होणार नाही. तेव्हा सर्व गट विकास अधिकारी यांना आधार पडताळणी करण्यासाठी व वारसा नोंद करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1147

जिल्ह्यात पशुगणना सुरु ; नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

नांदेड दि. २८ नोव्हेंबर : केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गाव व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत सहभागी होऊन योग्य माहिती प्रगणकास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 

ग्रामीण भागात प्रमुख कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनास संबोधले जाते. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, लोकर आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीवीकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे पशुपालन वाढविण्यावर शासनाचा भर आहे. 

या पशुधनाच्या माहितीमध्ये कुटूंबामध्ये असलेल्या गाय, म्हैस, शेळी व मेंढी, वराह, घोडे व गाढव, कुक्कुट पक्षी इत्यादीच्या संख्येची नोंद मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे.  पशुसंवर्धन विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या पशूंची नोंद होणे आवश्यक आहे. पशुगणनेमध्ये पशुधन संख्येसोबतच पशुधनाच्या प्रजाती, लिंग, वय इत्यादी बाबीची नोंद करण्यात येणार आहे. यापूर्वीची पशुगणना टॅब द्वारे करण्यात आली होती. आताची मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ॲपची निर्मिती केलेली आहे. 

पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या पशुगणनेमुळे पशुपालकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे, दुधाचे अनुदान, पशुरोग प्रतिबंधक लसीकरण, वैरण बियाणे, पशुखाद्य, पशू औषधी, मुरघास, खनिज मिश्रण, पशुधन विमा इत्यादी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. पशुगणनेत प्रगणकांना स्वत:च्या मोबाईल ॲप वापरुन माहिती संकलित करावी लागणार आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, मिथून अशा 15 प्रजातींची माहिती जमा केली जाणार आहे. तसेच 219 स्वदेशी जातींची नोंद केली जाणार आहे.

00000

 वृत्त क्र. 1146

ई - पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करा

शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक

नांदेड दि. २८ नोव्हेंबर :  शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई - पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे भवीष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरुन मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने रब्बी हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी दि.१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

त्‍याकरिता ई-पीक पाहणी  (DCS) V 3.0.3 डाऊनलोड करावे. तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही.

तरी जिल्‍हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी रब्‍बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.

00000

Wednesday, November 27, 2024

 वृत्त क्र. 1145 

सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्तीची कार्यपद्धत

 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम-2024 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCSमोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. गाव नमुना बारामध्ये जाहिर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्जहरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरूस्त करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे य सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील गाव नमूना 12 बाबत सूचना क्र. 2 नुसार करण्यात आली आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (DCSमध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे.

 

यानुसार पुढील सुधारीत तरतुदी तयार करण्यात आली आहे. गाव नमुना बारामध्ये पिके जाहिर केल्यानंतर जर पीकक्षेत्रजलसिंचनाचे साधनपड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (गा. न. 12, स्तंभ 2 आणि 4 ते 11) चुकीची जाहिर झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा संबंधित खातेदाराने अशी चूक दुरूस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशा चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास ग्राम महसूल अधिकारी हे अर्ज आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील. मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील व मोबाईल अॅपमध्ये सत्यापनकर्ता (verifierलॉगिनने पीक दुरुस्ती करतील. सोबतच जमिनीत दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पडक्षेत्र असल्यासडिजिटल क्रॉप सर्वे पव्दारे सत्यापनकर्ता (verifierलॉगिन मधून फोटो काढून अपलोड करतील आणि शेरा स्तंभात  ... या कारणास्तव दिनांक../../..रोजी पीक नोंदीत दुरुस्ती केली असे नमूद करतील.

 

याप्रमाणे जाहिर केलेल्या चुकीचा संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाल्यासमंडळ अधिकारी या दुरुस्तीची नावसंबंधित राहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतीलअसे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्राद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1144 

2 डिसेंबरला लोकशाही दिन 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर :  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 2 डिसेंबरला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 1143 

नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.    

सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये सर्व निर्बंध लादण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0000

 वृत्त क्र. 1142 

4 डिसेंबरपासून होणाऱ्या जंतनाशक अभियानात सहभागी व्हा 

जंतनाशक गोळी घेण्यासाठी घाबरू नका 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही गोळी चावून खाणे गरजेचे आहे किंवा पाण्यात घेता येईल. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील अर्धापूर, धर्माबाद, लोहा, मुदखेड, नांदेड व उमरी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सर्व शाळांमधून अल्बेडॅझोलची गोळी देण्यात येणार असून लहान मुलांना पाण्यातून तर 6 ते 19 वयोगटातील मुलांना चावून खाण्यासाठी सांगण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला जे वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

000

वृत्त क्र. 1141 

राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा 

·  प्रधानमंत्र्यांसोबत भेटण्याची संधी   

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : तुमच्यामध्ये नेतृत्व गुण असेल उद्याचे नेतृत्व करण्याची इच्छा असेल तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपक्रमामध्ये अर्थात विकसित भारत युवा नेते संवाद म्हणजेच राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

भारत सरकारने हा उपक्रम जाहीर केला असून देशभरातील 2 हजार तरुण तरुणींनी 12 ते 13 जानेवारीला भारत मंडपम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत विकसित भारताचे व्हिजन मांडणार आहेत. ही सुवर्ण संधी असून त्यासाठी वेगवेगळ्या पात्रता फेरीला 15 ते 29 वयोगटातील तरुणांना तोंड द्यावे लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील युवापिढीने यामध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी व्किज2डॉटमायजिओव्हीडॉटइन (quiz2.mygov.in) या लिंकवरून सहभाग नोंदवता येतो. ही ऑनलाईन नोंदणी करून नोंदणी प्रक्रिया समजून घ्यावी किंवा नांदेड जिल्ह्याच्या नेहरू युवा केंद्र राज निवास शिवरायनगर मालेगाव रोड नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

0000


 वृत्त क्र. 1140 

उर्ध्व पैनगंगा कालव्यातून 1 डिसेंबर पासून सिंचनाखाली 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा तसेच त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनतेनी / लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

दरवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 ची आचारसंहिता लागू झाल्याने प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली 25 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अधीन राहून 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या धरणातील (964.10 दलघमी) शंभर टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात तीन (3) पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार (4) पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळालेली आहे. 

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी सेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर  करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या पुढीलप्रमाणे सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. 

सन 2024-25 चा रब्बी सिंचन कार्यक्रम आवर्तन कार्यक्रम क्र. 1 इसापूर उजवा कालवा इसापूर डावा कालव्यातून 1 ते 22 डिसेंबर पर्यंत 22 दिवस, आवर्तन कार्यक्रम क्र. 2 साठी कालावधी 1 ते 22 जानेवारी तर आवर्तन कार्यक्रम क्र. 3 साठी 1 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत 22 दिवसांसाठी राहील. पाऊस किंवा आकस्मि घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांका बदल होऊ शकतो. 

नमुना नं.7,7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे.रब्बी हंगामी, दुहंगामी  व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदि/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प अत्यल्प भुधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. 

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल. सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. 

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे  बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी  मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 1139 

मुबलक पाणीपुरवठा, योग्य वातावरणाचा

शेतकऱ्यांना रब्बीमध्ये फायदा व्हावा  

जिल्हाधिकाऱ्यांचा थेट बांधावर दौरा 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : यावर्षी झालेला मुबलक पाऊस, जलसाठ्यांमधील विपूल प्रमाणातील सिंचनाचे पाणी व पाऊसासोबतच योग्य प्रमाणातील थंडीचे वातावरण यामुळे रब्बीसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक वातावरण आहे. त्यामुळे हा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल यासाठी सर्व पूरक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील विविध गावांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दौरा करून रब्बी हंगामाच्या पीक परिस्थितीची पाहणी गेली दोन दिवस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्तमपूरक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एलेचपूर येथील प्रशांत दुर्गादास तीर्थे यांच्या शेतावर दौऱ्या दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी हरभरा, ज्वारी व हळद पिकांची पाहणी केली. हरभरा पिकांमध्ये जास्तीत जास्त जैविक कीड नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि पर्यवेक्षक चिंचूवाड, कृषि सहायक श्रीमती शिंदे उपस्थित होत्या. नांदेड तालुक्यामध्ये यावेळी हरभरा, ज्वारी व गहू पिकाखाली शेकडो हेक्टर जमीन आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सूचना वरचेवर करण्याचे त्यांनी सांगितले.  

00000




Tuesday, November 26, 2024

वृत्त क्र. 1137

समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त संविधान रॅली 

 शेकडो नागरिकांचे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन 

नांदेड,दि २६ नोव्हेंबर :महाराष्ट्र शासनाचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घर-घर संविधान रॅली आयोजित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे केलेले सामूहिक वाचन लक्षवेधी ठरले.

यानिमित्ताने  गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, मनपा नांदेड व  संजय जाधव उपायुक्त, मनपा, श्रीमती सुप्रीया टवलारे, उपायुक्त मनपा,शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, सतेंद्र आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डी.वाय पतंगे ,सहय्यक लेखाधिकारी तसेच अशोक गोडबोले, माधव जमदाडे व भिमराव हटकर,सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तद्नंतर गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवून  संविधान रॅलीची सुरुवात केली.  

 सदर संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर. मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्र गीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली. 

यावेळी मा.श्री शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्य त्यांचे पालन करावे असे मनोगत व्यक्त्‍ केले.

सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ,जात पडताळणी कार्यालय अधिकारी कर्मचारी , जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडचे अधिकारी कर्मचारी तसेच इतर मगासव बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, नांदेड जिल्हयतील विविध्‍ महमंडळचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच  शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांची उपस्थिती होती.

सदर संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक ,कर्मचारी बँड पथक संच यांनी  देशभक्ती गिते सादर केले तसेच  सदर संविधान रॅली मध्ये, नांदेड जिल्हयातील एन.एस.बी महाविद्यालय नांदेड , सायन्स कॉलेज नांदेड ,नेहरु युवा केंद्र , विद्यार्थी सहभागी झाले होते व वसंतरावनाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान रॅलीत सहभागी झाले होते. तसेच नांदेड जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. सदर रॅलीची सांगता सविंधानाचे प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली.

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...