Friday, January 22, 2021

लेख

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. त्यांच्या भविष्याची जबाबदारी असणारा विभाग म्हणजे शालेय शिक्षण विभाग. या विभागाची मंत्री म्हणुन मी वर्षभरापुर्वी कार्यभार स्विकारल्यानंतर एक पालक आणि एक शिक्षक म्हणुन या विभागामार्फत करता येणाऱ्या कामांचा आवाका लक्षात घेऊन काम करायला सुरुवात केली. पालक म्हणुन आपल्या पाल्याला उत्कृष्ट शिक्षण मिळावेही प्रत्येक पालकांप्रमाणे माझीही अपेक्षा आहे. यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावता येईल का? याचा आढावा घेण्यास सुरुवात केली. केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. त्याची अंमलबजावणी करतांना राज्याची तयारी उत्तम असावी यासाठी थिंकटॅंक तयार केले. मी स्वतःव्यवसायाने शिक्षणक्षेत्रातील असल्याने शिक्षकांच्या तसेच शाळांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला.  शालेय शिक्षण विभागाच्या इतर कामकाजाबरोबरच जागतिक संकटाचा सामना विभागाला करावा लागला.

            मार्चमध्ये खरं तर शाळांमध्ये मुलांच्या परीक्षा असतात, वर्षभर मुलांनी त्यासाठी तयारी केलेली असते. अशा नेमक्या वेळी कोरोनाचे संकट पुढे येऊन ठेपले. अशाप्रकारच्या आव्हानासाठी आपली तयारी नव्हती. मात्र या संकटाचे संधीत रुपांतर करुन याचा धाडसाने सामना विभागाने केला असे मला अभिमानाने सांगावे वाटते.

 

अनलॉककडे जाताना शिक्षण क्षेत्रातील आव्हाने

            आज राज्यासमोर अभूतपूर्व संकट असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्य बंद होते आणि शाळा देखील त्याला अपवाद नव्हत्याच परंतु ज्याप्रमाणे मिशन बिगेन अगेन याअंतर्गत टप्प्याटप्प्याने आपण सर्व गोष्टी अनलॉक करत चाललो आहोत, याचपद्धतीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळा देखील आपल्याला सुरु करावयाच्या आहेत. अशा वेळी शाळा सुरु करत असताना अनेक आव्हांनांचा डोंगर  आपल्यासमोर आहे.राज्यातजवळपाससर्वत्रकोरोनाचीलागणझालीअसली, तरीप्रत्येक ठिकाणी कोरोनाची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांची सुरक्षितता याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि यादृष्टीने शालेय शिक्षण विभाग हे SOP (Standdard Operating Procedure)च्या सहाय्याने शाळांना, शिक्षकांना मदत करणार आहे. याचबरोबर येत्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेबरोबर बरेच दिवस झाले संपर्क तुटलेला आहे. जरी त्यांचे शिक्षण हे विविध माध्यमातून सुरु असले तरी देखील विद्यार्थ्यांना परत शिक्षणाकडे आणणे आणि प्रत्यक्ष वर्गात बसवून या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये त्यांच्या मानसशास्त्राचा विचार करुन त्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणणे हे एक मोठ आव्हान असणार आहे.

        बालदिवस सप्ताह

        भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि. 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित केले. बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यात आला.

        नविन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणीसाठी तयारी

        नवीन शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झालेले आहे आणि या संदर्भात राज्यामध्ये याची अंमलबजावणी कशी करायची यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाचे काम सुरु आहे. ज्यावेळेला शिक्षणमंत्री म्हणून मी कार्यभार स्वीकारला त्याचवेळेला मी थिंक टँक गटाची स्थापना केलेली होती. यामध्ये राज्यातील अनके नामवंत शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी वर्ग यांचा समावेश आहे. याचबरोबर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या असलेल्या डॉ.वसुधा कामत यांच्या समवेत याबाबतचे चर्चासत्राचे आयोजन केले होते. तसेच SCERT मार्फत अनेक याबाबतची चर्चा सत्रांचे आयोजन करुन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज सुरु केले आहे. राज्यामध्ये याची अंमलबजावणी करत असताना साधक बाधक चर्चा करणे याचबरोबर पुढच्या पिढीला दिशा देणारे असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने अमलात येईल यादृष्टीने विविधांगी यामध्ये बदल करणे व स्थानिक पातळीवरील गरजांना सामावून घेता येईल याचा देखील आम्ही विचार करत आहोत. याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये व पाठ्यपुस्तकातील आवश्यक बदल यावर देखील विचारमंथन सुरु आहे.

 मातृभाषेतून शिक्षण

        मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हे उत्तम शिक्षण असते. हे शास्त्रीय दृष्ट्या आता सिद्ध झाले आहे. परंतु एक आव्हान आपल्यासमोर आहे की, जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित होत असतात. तसेच मुंबई, पुणे व ग्रामीण भागामध्ये देखील देशातील इतर भागातून अनेक स्थलांतरित होत आहेत. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून कशाप्रकारे शिक्षण देता येईल याचा देखील आम्ही विचार करत आहोत.  सद्यस्थितीमध्ये सुरु असणाऱ्या शाळा यामध्ये देखील वेगवेगळ्या भाषांचे धोरण कसे आणता येईल यावर देखील विचार सुरु आहे.

मराठीभाषासक्तीची

राज्य शासनाने मराठी सक्तीची करण्यासाठी कायदा केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व परिक्षामंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे इयत्ता 10 वी पर्यंत अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले.

 दहावी व बारावीचे ऑनलाईन वर्ग

        दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टीव्हीच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या तासिका प्रक्षेपित करत आहोत याचबरोबर डी.डी.सह्याद्री वाहिनीवर देखील ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या तासिकांचे प्रक्षेपण केले जात आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून देखील लाइव्ह प्रक्षेपण केले जात आहे ज्याचा फायदा राज्यातील या विद्यार्थ्यांना होत आहे.

 दीक्षा ॲप

        दीक्षा ॲप हे आपल्या केंद्रशासनाने विकसित केलेले ॲप आहे. महाराष्ट्र राज्य हे यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. याचबरोबर लॉकडाऊन कालावधीमध्ये आम्ही सुरु केलेली अभ्यासमालेचे एकूण 220 दिवस अविरतपणे या दीक्षा ॲपच्या माध्यमातून अभ्यास विद्यार्थ्यांसाठी पाठवत आहोत. याचबरोबर दीक्षा ॲपवरील ई-साहित्याच्या माध्यमातून शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याचा वापर जास्तीत जास्त शिक्षकांना होत आहे.

            गुगल क्लासरुप

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण विविध नवीन गोष्टी करत आहोत त्यातील गुगल क्लासरुम हा एक उपक्रम आहे. राज्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म गुगल मार्फत मोफत स्वरुपामध्ये उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर कदाचित विश्वातील पहिले राज्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे सोपे जात आहे. याकाळामध्ये देखील शिक्षक व विद्यार्थी परस्परसंवादी राहण्यास मदत झालेली आहे. याचा लाभ राज्यातील सर्व शिक्षकांना करुन देण्यात आलेला आहे.

 अभ्यासक्रम कमी    

सद्यस्थितीमध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांवर कसल्याही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून सर्वसमावेशकपणे सर्व विषयांचा 25 टक्के अभ्यासक्रम हा कमी करण्यात आलेला आहे.हा  कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम हा SCERT च्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे.  सर्व शिक्षक व शाळा यांच्यापर्यंत पोहचविण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा व वयोगटाचा विचार करुन शासनाने हा  निर्णय घेतला आहे.

परीक्षानघेतावर्गोन्नती

. 9 वी. 11 वी. च्या द्वितीय सत्राच्या परीक्षा न घेता प्रथमसत्र परिक्षेमधील तसेच चाचण्या, प्रात्याक्षिके व अंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांचा विचार करुन त्याआधारे विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. . 9वी व 11 वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलवून किंवा व्हिडीओकॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सुरु होणाऱ्या 10 वी व 12 च्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व शाळांमधील मुलांना समान आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारती/ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अभ्यासक्रमात सुधारणाकरण्यासाठी राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुमारे  300 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            केंद्रशासनातर्फे देण्यात येणारे PGI (performance Grading Index) पिजीआयमध्ये महाराष्ट्राच्या कामगिरीचे मानांकनात सुधारणा झाली असून आता राज्याचा श्रेणी 4 मधून श्रेणी 1 मध्ये समावेश झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिक्षकांची कामगिरी चांगली

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात देखील अनेक शिक्षक वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत. आमचे अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या गृह भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. स्वध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाउडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवीत आहेत. अशा सर्व शिक्षकांचे मी कौतुक नेहमीच करत आहे. त्यांच्याशी ई बैठकीच्या माध्यमातून स्वत: संवाद साधून त्यांचे कौतुक केले आहे. खऱ्या अर्थान अशा शिक्षकांमुळेच या काळामध्ये शिक्षण सुरु राहिले आहे. तसेच अशा शिक्षकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी SCERT मार्फत ऑनलाईन शिक्षक विकास मंच हा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आम्ही करत आहोत.

            वर्षभरातील घडामोडींमुळे शालेय शिक्षण विभागाला आत्मपरिक्षण करण्याची पण गरज लक्षात आली आहे. शिक्षण घेण्याच्या पद्धतीत बदल करणे अपरिहार्य होत जाणार आहे. कोरोनाचे संकट अजुन टळले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही हे तर बघणे आवश्यक आहेच मात्र त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या शारिरिक आणि भावनिक  आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे हित जोपासणे याला माझ्या शासनाचा प्राधान्यक्रम कायम राहणार आहे. एवढं मात्र नक्की.

           

000

(शब्दांकनः- अर्चनाशंभरकर)

 

शालेय शिक्षण विभाग महत्वाचे निर्णय

·         शालेय पोषण आहार प्री पॅकस्वरूपात वितरीत

·         केंद्र शासनाने दिलेल्या निर्दशानुसार कोवीड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर विद्यार्थ्यांना पौष्टीक आहारमिळण्याच्यादृष्टीने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ तसेच हरभरा वमृगडाळ (प्री-पॅक) स्वरुपात पुरवठा करण्यात आला.

·         १० वी १२ वी चे निकालाचे काम वेळेत पूर्ण

·         राज्यातील कोवीड-19विषाणूमुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती विचारात घेऊन इयत्ता 10 वी व इयत्ता 12वी परिक्षेच्या उत्तर पत्रिका परिक्षण व नियमन करण्यासाठी परिक्षक व नियमकांना घरी देण्याचा निर्णयघेण्यात आला. तसेच उत्तरपत्रिकांचे संकलन करण्यासाठी जिल्हा व तालूका निहाय संकलन केंद्रे निश्चित करुनया केंद्रावर समक्ष जाऊन उत्तरपत्रिकांचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे कोविड-19 विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीमध्येही इयत्ता 1012वी च्या परिक्षेच्या निकालाचे काम वेळेत पूर्ण करण्यातआले.

·         ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उपाययोजना

·         कोवीड -19 विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सन 2020-2021 साठीचा 11वी ऑनलाईन प्रवेश. प्रक्रीयेसाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

·         अर्ज भरण्यापासून ते प्रवेश निश्चित करेपर्यंत सर्व कार्यवाही संपर्क विरहीत व ऑनलाईन पध्दतीनेकरण्यात येत आहे. यासाठी Moaf Demo Registration ही नविन संकल्पना राबविण्यातआली.माहिती पुस्तिका डिजीटल स्वरुपात उपलब्ध केली तसेच सुलभतेसाठी मोबाईल ॲपतयारकरण्यातआले.

·         विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

·         मराठी भाषा सक्तीची

·         महाराष्ट्र राज्यातील सर्व परिक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगीव्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे इयत्ता 10वी पर्यंत अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले.

·         लर्निंग फ्रॉम होम

·         कोविड-19 च्या प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अध्ययन - अध्यापन प्रक्रिया सुरुराहण्यासाठी लर्निग फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यात आली.

·         अधिनियमात सुधारणा

·         खाजगी विना अनुदानित शाळेतील शिक्षकांची अंशत: अनुदानित किंवा अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदलीकरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम 1977 मध्येसुधारणा करण्यात आली.

·         फी वाढ न करण्याच्या सूचना

·         कोविड-19 या विषाणुमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणतीही फी वाढ करुनये अशा सुचना राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आल्या.

·         परीक्षा न घेता वर्गोन्नती

·         इ. 9 वी. व 11 वी. च्या द्वितीय सत्राच्या परीक्षा न घेता प्रथम सत्र परिक्षेमधील तसेच चाचण्या, प्रात्याक्षिके वअंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांचा विचार करुन त्याआधारे विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, असे आयुक्त  (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात आले.

·         ९ वी व ११ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

·         राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन इयत्ता ९ व इयत्ता११ वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्येसुरु होणाऱ्या १० वी व १२ च्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

·         संपर्क साहित्य तयार करण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा

·         राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या संदर्भात संपर्क साहित्य तयार करणे या विषयाबाबत शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

·         बीएमसीशाळां मधील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना

·         बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांनाउपलब्ध करून देणेबाबत निर्णय घेण्यात आला.

·         ऑनलाईन शिक्षणासाठी मार्गदर्शक सुचना

·         पूर्वप्राथमिक ते इयत्ता 12 वी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यानुसार इ. 9 वी. ते 12 वी.च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी 45 मिनिटांच्या चार सत्रांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यात येते.

·         राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना

·         माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व शाळांमधील मुलांना समान आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारती/ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.

·         300 शाळांना आदर्श शाळाम्हणून विकसित करण्याचा निर्णय

·         केंद्र शासनातर्फे देण्यात येणारे PGI (performance Grading Index) पिजीआय मध्ये महाराष्ट्र राज्य श्रेणी ४ मधून श्रेणी १ मध्ये समावेश.

·         पाच हजारापेक्षा जास्त शिक्षकांची  'पवित्र' प्रणली मार्फत भरती.

·         प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के  व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या  २४१७ शाळांना १ नोव्हेंबर २०२० पासून अतिरिक्त २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय.

·         प्रायोगिकतत्वावर द्विभाषिक व एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप

·         शाळेतील मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेलवाचविण्याचा निर्णय

·         लोकशाहीची मुल्ये शालेय जीवनातच रूजविण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय. शाळांमधून संविधान उद्देशिकेचे वाचन

०००

 

 

 


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...