Thursday, April 3, 2025

वृत्त क्रमांक 348

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिम नांदेड तहसीलचे नाविन्यपूर्ण उपक्रम 

 जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते उद्घाटन ;अन्य कार्यलयांनाही सुधारणांचे आवाहन 

नांदेड दि. ३ एप्रिल : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर तहसील कार्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रमात अनेक सुविधा डिजिटल केल्या आहेत. विविध ऑनलाईन प्रशासकीय सुविधा, ई -लायब्ररी, सायबर वॉल, तहसिल अॅप, प्रमाणपत्र सेवांचा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते शुभारंभ झाला.

 नांदेड शहरचे तहसीलदार संजय वारकड यांनी कल्पकतेने आपल्या टिमच्या मदतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम नांदेड तहसिल कार्यालयात साकारला आहे. नांदेडकर नागरिकांना आता या नव्या सुविधांचा वापर करता येणार असून या सुविधांचे लोकार्पण आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

आज शुभारंभ झालेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये .ई लायब्ररी . सायबर वॉल व सुकर जीवनमानमध्ये डिजिटल नांदेड तहसील ॲप, विविध प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र व ऑनलाईन लिंक एका क्लिकवर जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. 

 ई लायब्ररीमध्ये तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुंदर पद्धतीने बॉक्स तयार करून त्यावर महसूल विषयक कायदे , वर्तमानपत्र स्थानिक वर्तमानपत्रासह मराठी, हिंदी ,इंग्रजी एकूण 46 वर्तमानपत्रे विनामूल्य वाचता येणार आहे. स्पर्धा परीक्षासाठी विविध पुस्तके, इतर कथा कादंबरी नाटके अशी 5000 पेक्षा जास्त पुस्तके विनामूल्य नागरिकांना वाचता तसेच ई-सरकारी नोकरीची जाहिरात व ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरता येणार. हे सर्व आपल्या मोबाईलद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून उपलब्ध होणार आहेत. 

तसेच आपण इंटरनेट वापरतो बँकिंग व्यवहार करतो परंतु, यामध्ये बऱ्याच नागरिकांची फसवणूक होते.त्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी तहसील कार्यालय नांदेड यांनी सायबर वॉलच्या माध्यमातून इंटरनेट सुरक्षेवरील मार्गदर्शन क्यू आर कोड द्वारे खालील बाबतीत उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने वायफाय सुरक्षा ,सिम क्लोनिंग, ई-मेल सुरक्षा, एटीएम सुरक्षा, आधार सक्षम पेमेंट इत्यादीचा समावेश आहे. 

तसेच नागरिकांची जीवन हे सुकर व्हावे यासाठी नांदेड तहसील कार्यालयाने डिजिटल नांदेड तहसील ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये क्यू आर कोड उपलब्ध करून दिला आहे. या किंवा पोर्टल द्वारे विविध शासकीय योजनांची माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यामध्येच लिंक द्वारे आपल्याला फॉर्म सुद्धा भरता येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ,नमो शेतकरी सन्मान निधी योजना ,स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात योजना , ॲग्री स्टॅक, योजना ,जलयुक्त शिवार अभियान योजना ,सामाजिक सुरक्षाच्या योजना, जिवंत सातबारा योजना  इत्यादी योजनेचा समावेश आहे. 

तसेच विविध प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे व त्याच ठिकाणी ऑनलाइन अर्जदाराला फॉर्म भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सुद्धा क्यू आर कोडद्वारे सर्व जनतेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र ,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांसाठी जनतेला उपयोग होणार आहे. काही अर्जदारांना तातडीने प्रमाणपत्र पाहिजे असते, परंतु आता आपल्याला तातडीने जरी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तहसील कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जदाराने फक्त किंवा क्यूआर कोड द्वारे जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवा अंतर्गत एक छोटासा क्यू आर कोड द्वारे फॉर्म भरायचा. अशा अर्जदाराला एक दिवसात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी महोदय यांनी घेऊन तहसीलदार नांदेड श्री. संजय वारकड व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. 

मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी तहसील कार्यालयामधील दिशादर्शक फलक, नागरिकांची सनद, अभिलेख शाखा, महसूल शाखा ,पुरवठा विभाग इत्यादी ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या जॉब चार्ट व बसण्याची व्यवस्था इत्यादीची पाहणी केली.  याप्रसंगी जिवंत सातबारा योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरूपामध्ये पाच शेतकऱ्यांना नमुना नंबर 9ची नोटीस देण्यात आली, ॲग्री स्टॅकच्या पाच खातेदारांना फार्मर आयडी प्रमाणपत्र, जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवा अंतर्गत पाच प्रमाणपत्र, सायबर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्यां पाच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप तसेच igot कर्मयोगी मधील कोर्स पूर्ण करणाऱ्या प्राथमिक स्वरूपात दोन कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी PPT द्वारे नांदेड तहसीलच्या वतीने 100 दिवसांमध्ये आज पर्यंत केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी अमित राठोड, तालुका कृषी अधिकारी  चातरमल, स्वप्निल दिगलवार, इंद्रजीत गरड, काशिनाथ डांगे, संजय नागमवाड, सर्व नायब तसीलदार, देविदास जाधव, लक्ष्मण नरमवार,  सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी नहनू कानगुले, स्वामी, रणवीरकर, सर्व कार्यालयीन कर्मचारी,मंडळ अधिकारी ,तलाठी, कोतवाल, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन

 स्वप्निल दिगलवार  नायब तहसीलदार यांनी केले. आभार प्रदर्शन संजय वारकड तहसीलदार नांदेड यांनी केली.

00000









 वृत्त क्रमांक 347 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 3 एप्रिल : नांदेड जिल्ह्यात 2 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 16 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 2 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 16 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 वृत्त क्रमांक 346 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित 

नांदेड दि. 3 एप्रिल : वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी आज यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी नियमावली बाबतचा शासन निर्णय 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये समाजातील वेगळ्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करणे मात्र अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे या समाजातील जागरूक नागरिकांनी या समाजात वावरणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची व संस्थांची सन 2024-25 अशा रितसर अर्ज पुरस्कारासाठी सहायक संचालक  इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे बुधवार 9 एप्रिल 2025 पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दि. 8 मार्च 2019 शासन निर्णयामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. शासनाच्या वेबसाईटवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. ही माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे समाजातील व्यक्ती व संस्थांनी मुदतीत 9 एप्रिल पर्यंत शासन पत्र 22 जुलै 2019 अन्वये विहित केलेल्या नमुन्यात रितसर अर्ज करावा. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0000000

 

 

 वृत्त क्रमांक 345 

नांदेड शहरातील मोर्चे-रॅलीच्या मार्गात बदल

 

नांदेड दि. 3 एप्रिल :- नांदेड शहरात होणाऱ्या रॅली-मोर्चेच्या मार्गात जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115, 116, 117 तसेच महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मधील तरतुदीनुसार बदल केला आहे.

 

नांदेड शहरातील रॅलीमोर्चे इत्यादीसाठी महात्‍मा फुले चौक ते अण्‍णाभाऊ साठे चौक-हिंगोलीगेट ओव्‍हरब्रिज-गुरुगोविंदसिंहजी म्‍युझियमची उजवीबाजू-गर्ल्‍स हायस्‍कूल-जिल्‍हा न्‍यायालयाचे पाठीमागील बाजूने-शिवाजी महाराज पुतळा ते जिल्‍हाधिकारी कार्यालय हा पर्यायी मार्ग राहील.  

 

नांदेड शहरातील रॅलीमोर्चे इत्यादीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग महात्‍मा फुले पुतळाआय.टी.आय.चौक-फुले मार्केट चौक-कुसुमताई चौक-एस.टी.ओव्‍हरब्रिज-कलामंदीर-वजिराबाद चौक-शिवाजी महाराज पुतळा हा आहे.

00000

 वृत्त क्रमांक 344 

जिल्हा उद्योग केंद्रात निरुपयोगी सामानाची विक्री 

नांदेड दि. 3 एप्रिल :- जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयात जुने, निरुपयोगी व कालबाहय झालेली उपकरणे इत्यादी भंगार झालेल्या सामानांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. विल्हेवाट करावयाचे सामान हे कार्यालयात पडून असून सामानांची विक्री करण्यात येणार आहे. इच्छुकांनी कार्यालयात प्रत्यक्ष येवून सामानांची पाहणी करावी. 

विक्री करण्यात येणाऱ्या सदरच्या सामानाच्या पाहणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या मुदतीपर्यंत पाहता येईल. कार्यालयाचा पत्ता जिल्हा उद्योग केंद्र, पहिला मजला उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड-431602 आहे. सदरील वेळेत येणाऱ्यांचा विचार केला जाईल तद्नंतर निविदा पद्धतीने सदर साहित्याची विक्री करण्यात येईल. सदरचे साहित्य जसे आहे तसे खरेदी करावे, उपकरणे हस्तांतरीत केल्यानंतर, उपकरणात काही दोष आढळल्यास हे कार्यालय त्यास जबाबदार राहणार नाही. वाहतूक, जकात इ. खर्च संबंधीतास करावा लागेल, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

Wednesday, April 2, 2025

 वृत्त क्रमांक 343

मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत  

AI चा प्रशासनात प्रभावीपणे वापर व सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचे प्रशिक्षण संपन्न 

नांदेड, दि. २ एप्रिल :– तहसील कार्यालय नांदेड येथे  मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी "Stay Safe Online / Cyber Hygiene" सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय वारकड यांच्या हस्ते झाले. मास्टर ट्रेनर दीपक सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक उपाययोजनांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यशाळेत Wi-Fi Security, Online Security, ATM Security, SIM Cloning, Aadhaar Payment Security, Cyber Bullying Protection यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

तहसील कार्यालय नांदेड आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून, हा उपक्रम सरकारी कार्यालयांसाठी आदर्श ठरेल. या प्रशिक्षणास स्वप्निल दिगलवार, काशिनाथ डांगे, इंद्रजीत गरुड, रवींद्र राठोड सर्व नायब तहसीलदार, देविदास जाधव इत्यादी सह सर्व कर्मचारी हजर होते.

0000





वृत्त क्रमांक 342 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 2 एप्रिल :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी कळमनुरी येथून सायंकाळी 7.30 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वा. लोहा येथे तहसिलदार लोहा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. सकाळी 11 वा. कंधार ता. जि. नांदेड येथे तहसिलदार कंधार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 12 वा. विश्रामभवन कंधार जि. नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. कंधार येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक   348 १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिम नांदेड तहसीलचे नाविन्यपूर्ण उपक्रम   जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते उद्घाटन ;अन्य कार्...