Thursday, April 19, 2018


साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे कामे पूर्ण

---मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

            नांदेड, दि. 19 : राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे मागील ६७ वर्षात केवळ पाच हजार कि.मी. चे तर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. कामे पूर्ण झाले आहेत. आमच्या सरकारचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे रस्ते, वीज,‍ पाणी या विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  पाणी,  रस्ते या कामात राज्याला भरीव मदत केली आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत, हे ओळखून त्यांनी राज्यात सुरु केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहा येथे केले. 

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अंतर्गत औसा-चाकूर या ५५ कि.मी., चाकूर-लोहा या ११४ कि. मी. व  लोहा - वारंगा १८७ कि.मी. रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे तसेच नांदेड-उस्माननगर-कंधार-जांब-जळकोट या ६५ कि.मी., उस्माननगर-मुखेड-कुंद्राळ या ५२ कि.मी. रस्त्यांचे, कुंद्राळ-बीहारीपूर-हनेगांव- वझर या ५२ कि .मी. रस्त्यांचे, अर्धापूर-तामसा- हिमायतनगर या ६४ कि.मी. रस्त्यांचे, हिमायतनगर-फुलसावंगी या ‍६४ कि.मी. रस्त्यांचे, जळकोट-उदगीर-तोगरी या ६५ कि.मी रस्त्याचे, रावी-देगलूर या ९५ कि.मी. रस्त्याचे व आदमपूर फाटा-कार्ला या १३९ कि.मी. रस्त्याच्या पूनर्बांधणी व दर्जा उन्नतीची कामे अशा एकूण पाच हजार ३४३  कोटी रुपये खर्चाच्या ५४८ कि. मी. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ई-भूमीपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे, खासदार डॉ.‍ सुनील गायकवाड, सर्वश्री आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तुषार राठोड, विनायकराव जाधव-पाटील व सुधाकर भालेराव, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नितीन गडकरी हे केवळ घोषणाच करतात प्रत्यक्ष काम होईल का असा प्रश्न  विरोधक विचारत असतात. परंतु, गडकरी यांनी डंकेकी चोटपर सगळी काम सुरु केली आहेत. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची घोषणा करुन ते थांबले नाहीत तर त्यांनी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातही राष्ट्रीय महामार्गाचे मोठे जाळे ते उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. राज्यात रस्त्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात गेल्या २५  वर्षात रखडलेल्या रेल्वेची कामेही सुरु झाली आहेत. आता राज्यात धरणांची काम सुरु होत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की , मराठवाड्याच्या वाट्याच्या कृष्णा खोऱ्यातील 21 टी.एम.सी. पाणी पश्चिम महाराष्ट्राने पळवले आहे. या २१ पैकी १४ टी.एम.सी. पाण्याचा पत्ताच लागत नाही. तर आता 7 टी.एम.सी. पाणी देण्याचं काम सुरु आहे. या २१ टी.एम.सी.  पाण्यासह मराठवाड्याला आणखी ५० टी.एम.सी. पाणी पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त  शिवारची कामे सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यात ६७४  कामे या योजनेतंर्गत करण्यात आली असून ५० हजार हेक्टर नवीन सिंचन क्षेत्र यातून निर्माण झाले आहे. याशिवाय जिल्ह्यात ७५ टक्क्याने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच जलयुक्तच्या कामांचा परिणाम म्हणून एकूण सिंचन क्षमतेत २०० टक्क्यानी वाढ झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. केवळ ०.८० मीटर‍पासून ५.६० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. एकेकाळी जिल्ह्यात ४०० टँकरने पाणी पुरवठा केला जात होता, तिथे सध्या २५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. असेच काम आगामी वर्ष-दीड वर्ष सुरु राहिले तर संपूर्ण राज्य टँकरमुक्त होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात आठ हजार ४०० विहिरींचे व आठ हजार शेततळ्यांचे कामे करण्यात आली आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची मोठ्या प्रमाणात कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या साठवणीची क्षमता वाढणार असून शेतीही कसदार होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत मराठवाड्यातील चार हजार गावामध्ये एकात्मिक शेती सुधार योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेने सहा हजार कोटी रुपये कर्ज देण्याचे मान्य केले आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.

नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छता अभियानातंर्गत मौलिक कामगीरी केली आहे. केवळ एका वर्षात जिल्ह्यात दोन लाख स्वच्छतागृहांचे बांधकाम करुन राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या ७० वर्षात आया-बहिणींना उघड्यावर शौचास जावे लागत होते. आता त्यांना सन्मानाची वागणूक मिळणार आहे. महाराष्ट्राने राज्यात गेल्या तीन वर्षात ४० लाख स्वच्छतागृहाची कामे करुन देशात विक्रम प्रस्थापित करुन महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित केला आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वीमा  योजनेअंतर्गत ७५०  कोटी रुपयांचे वाटप केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  २०१२ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकांना घर देण्यांचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. परंतु राज्य सरकारने २०१९ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय घेतला असून बेघरमुक्त राज्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील लोकप्रतिनीधीनी मोठ्या प्रमाणात लक्ष घालून सहकार्य करावे. या कामांचा प्रस्ताव दाखल केल्यापासून तीन महिन्यात दिला जाईल. गेल्या साडेतीन वर्षात बेघरांना घर देण्याची ५५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. या कामात निधीची टंचाई भासणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

 

राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात राज्यातील ग्रामीण रस्त्याचे काम रखडले जावू नये म्हणून पंतप्रधान ग्रामीण रस्ते विकास योजनेप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत 30 हजार कि.मीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तर 10 हजार कि.मी. च्या राज्य महामार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचा  71 हजार 362 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आयुष्यमान भव योजनेअंतर्गत देशातील 50 कोटी रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या उपचारांची सुविधा रुग्णांना मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आमदार चिखलीकर यांनी मागणी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणाही यावेळी केली.

वीज, पाणी, रस्ते व दळणवळणांची साधने ही विकासासाठी महत्वाची असतात. कोणताही नेता आपल्या जातीचा विकास करीत नाही तो स्वत:चा विकास करीत असतो. विकास हा जात, धर्म, भाषा, लींग यांच्याशी जोडला जावू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिल राहून काम करीत आहेत. गरिबीला जात नसते ती सर्व धर्म व जातीत असते. तसेच महागाईचेही असेच आहे. गरिबी दूर करण्यासाठी विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यातून रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळते हीच बाब लक्षात घेवून आपण आज मराठवाड्यात  आठ हजार कोटींची कामे सुरु करीत आहोत, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्‍त शिवार अभियानाचे काम क्रांतीकारक आहे. जल-जमीन यातून महाराष्ट्रात संपन्नता आणण्याचे काम यातून होत आहे. याला जोडूनच माझ्याकडे केंद्रीय जलसंपदा विभागाचा कार्यभार आल्यानंतर मी राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर 170 ब्रीज कम बंधाऱ्यांची कामे हाती घेतली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे. लातूर-नांदेड येथील दुषित पाणी परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रास देण्यात यावे. आणि मांजरा धरणातील शुध्द पाणी लातूरकरांना पिण्यासाठी द्यावे असे सूचविले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असून याबाबतच्या प्रकल्पाचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी आमचे एक महत्वाचे काम केले आहे. ठाणे जिल्ह्यातील पिंजार दमण गंगा पाण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यात करार झाला होता. या करारात मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हा करार मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी दमण गंगा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी चार धरणे बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितला आहे. आणि या प्रकल्पाच्या खर्चाचा निधी केंद्र सरकार करेल, असेही  सांगितले. या प्रकल्पातंर्गत ठाणे

जिल्ह्याच्या वरच्या भागात चार धरणे बांधता येतील आणि त्यातून नदीजोड प्रकल्प राबवून हे पाणी मराठवाडा आणि नाशिकच्या धरणामध्ये साठविण्यात येईल. या प्रकल्पाचे काम तीन महिन्यात सुरु होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून त्यासाठी कधीही निधीची अडचण येणार नाही. तसेच मराठवाड्यात होत असलेल्या महामार्गांची गुणवत्ता पाळली जाणार असून हे रस्ते दोनशे वर्षे टिकतील याची खबरदारी  घेतली जाणार आहे.‍ आमदार चिखलीकर यांनी मागणी केलेल्या लोहा शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामास मंजुरी देवून त्यांनीच मागणी केलेला लोहा-नरसी या 50 कि.मी. चा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.

आमदार चिखलीकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचीही भाषणे यावेळी झाली.

प्रास्ताविक व आभार या प्रकल्पाचे व्यवस्थापक आर. व्ही. सींग यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास लोहा-कंधार तालुक्यातील ग्रामस्थासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

****

   

 



















No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...