Saturday, February 25, 2017

लेख - कृपया मराठी गौरव दिनानिमित्त सोमवार 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र अंकात हा लेख प्रकाशित करावा , ही विनंती.

आपली मराठी....युनिकोडमध्ये…!
मराठी. मातृभाषा. पण संगणक आणि माहिती तंत्रज्ज्ञानाच्या युगात मराठी भाषेचं काय होणार ? अशी चर्चा सुरु होते. त्यामुळेच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं हा शोध घेणे औत्सुक्यपुर्ण ठरते. हा शोध थांबतो युनिकोड या प्रणालीशी येऊन. मराठी भाषेसह अनेक भाषांना आपल्या कवेत घेऊन , पुढे जाणारी प्रणाली विकसित झाली आहे. ती आहे, युनिकोड. या युनिकोडविषयीचा हा लेख...
अरे, तुझ्याकडे युनिकोड नाही ? अरे युनिकोडमध्ये लिही बाबा. फॉन्टचा प्रश्नच येत नाही. किंवा कित्येकदा समोरचा तुम्हाला चक्क मराठीतच ई-मेल पाठवतो. तुम्हालाही त्याला मराठीतच उत्तर द्यायचं असतं. मग शोध सुरु होतो , हे मराठीत लिहायचं कसं ?. मध्यंतरी… इंग्लिशचा वापर जोरात होता म्हणजे मराठीच पण इंग्रजीमध्ये लिहायचं. उदा. मला MALA किंवा उद्या आपण कुठे भेटायचे ? तर ते Udya Kuthe Bhetayache ? अशा प्रकारच्या इंग्रजीच्या मराठीतल्या वापरावर खूप टिका झाली. काय हे मराठी ? कसं होणार मराठीचं..? आणि खूप काही. पण युनिकोडचं युग सुरु झालं आणि जगभरातील अनेक भाषा एका सुत्रात बांधल्या गेल्या. युनिकोडनं अनेक भाषांच्या लिपींना आपल्यामध्ये सामावून घेऊन, आता माहिती-तंत्रज्ञान आणि एकूणच संगणकाच्या महाजालकावर अलिकडच्या काळातील मोठी क्रांती केली आहे , असं म्हणणंही चुकीचं होऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली आहे. युनिकोड अनेकांना वाटतं हा आणखी एखाद्या सॉफ्टवेअरचा प्रकार असावा. फॉन्ट म्हणजे टंक असावा, नाही. पण या युनिकोडनं आता आपलं व्यापक अस्तित्व ठळकपणे दाखवणं सुरु केलं आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान युगात युनिकोड आता परवलीचा शब्द आहे. अवघ्या दशकभरात युनिकोडनं विश्वाची वेब दुनिया म्हणजे इंटरनेट पादाक्रांत केलं आहे. डब्लूडब्लूडब्लू म्हणजे वर्ल्ड वाईट वेब www हे संगणकाचं जाळ महाजालक जितक्या वेगानं पसरलं त्याहून अधिक मोठा वेग युनिकोडचा आहे. वेबवरची तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक संकेतस्थळे ज्याला आपण वेब साईटस् म्हणतो ती आता युनिकोडचा वापर करुन लागली आहेत. यातच युनिकोडचं सामर्थ्य समजून घेता येईल. विशेष म्हणजे युनिकोडच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या वापर देवाण-घेवाणीसाठी वैश्विक अशी यंत्रणा कोणत्याही व्यापारी उद्देशाशिवाय काम करु लागली आहे. ( हां, आता अंतस्थ हेतू किंवा या युनिकोडच्या वापरामुळं जगभरातील इंटरनेटवरुन इतर व्यापारी हेतू साध्य केले जातील म्हणा... पण तो विषय नाही... असो. )
            युनिकोड म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या लिप्यांमधून व्यक्त होणाऱ्या , लिहिल्या जाणाऱ्या भाषांना एका विशिष्ट अशा प्रणालीनं सुत्रबद्ध करणं. ज्यामुळं एकीकडे संगणकाला आज्ञावली मिळेल ती संगणकीय भाषेत, पण समोर दिसेल-उमटेल ती भाषा मात्र त्या संगणकाचा वापर करणाऱ्यांची , त्यामुळंच युनिकोडनं आज जगभरातल्या अनेक देशांच्या सीमा आणि संस्कृती-भाषा भेद यांनाच भेदून टाकलं आहे असं म्हणावं लागेल.
युनिकोडच्या आधी साहजिकच संगणकीय वापर आणि क्रांतीवर अमेरिकनांची निर्विवाद सत्ता होती. त्यामुळेच त्यांच्याकडील अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फर्मेशन इंटरचेंज ( अर्थात अस्की - Ascii) त्यांच्या तालावरच सगळ्या गोष्टी घडत. पण सन 1967 च्या सुमारास संगणक आणि माहितीचे महाजालक म्हणजे इंटरनेटमुळं ग्लोबल कंम्प्युटींगची गरज भासू लागली. अमेरिकसह अनेक देशतील कंपन्यांनार आशियासह, इतर खंडातील बाजारपेठ खुणावू लागली. त्यामुळंच भाषांचा हा अडथळा कसा दूर करता येईल यासाठी प्रयत्न सुरु झाले. अगदी पाश्चिमात्य म्हणजे युरोपातही हा अडथळा जाणवत होता. मग आफ्रिका , आशिया आणि सोव्हियत संघाची बातच दूर. त्यामुळेच जगभरातल्या बलाढ्य कंपन्या ज्यामध्ये ॲपल, आयबीएम, सन मायक्रोसिस्टम्स, झेरॉक्स, अल्डस् , लोटस आणि नॉव्हेल यांनी युनिकोडसाठी प्रयत्न सुरु केले. सन 1989 च्या सुमारास युनिकोडचा हा प्रकल्प आकार घेऊ लागला आणि त्यातूनच युनिकोडसाठी एक कन्सोर्शिअम ज्याला आपण एक संघ म्हणून तो अस्तित्वात आला.
            या युनिकोडने लिपीतील मुळाक्षरे, चिन्हे, उच्चारणातील काही घटक यांच्यासाठी विशिष्ट अशा पद्धतीने एकजिनसीपणाने एनकोडींग म्हणजे जागतिक स्तरावर संकेत तयार केले आहेत. त्यामुळं युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉरमॅट आणि युनिव्हर्स कॅरॅक्टर सेट या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. यातूनच युनिकोडने अगदी अलिकडे-अलिकडे युनिकोड - 6 हे खुले केले आहे. ज्यामध्ये अगदी आपल्या भारतीय रुपयासाठीचे चिन्हही समाविष्ट केले गेले आहे. युनिकोड आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण ऑर्गनॉयझेशन-आयएसओ हे एकत्रित काम करत असल्याने जगभरातील युनिकोडचे हे संकेतबद्ध गोष्टी आपोआपच प्रमाणित म्हणून वापरल्या जातात. त्यांमध्ये बदल करायचे झाल्यास , बदल सुचवायचे असल्यास या संघाकडे जावे लागते. त्यामुळे जगभरातल्या युनिकोडच्या वापरात एक सुसूत्रता राहते.
भारतातही आपल्याकडे भारतीय प्रमाणिकरण यंत्रणेतूनच या युनिकोडचा वापर सुरु झाला आहे. त्यासाठी इंडियन स्टँडर्ट कोड फॉर इन्फर्मेशन इंटरचेंज एक्सेंज (आयस्की- Iscii) काम करते आहे. ही यंत्रणाही आपल्या बीआयएस म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंर्डशी संलग्न असल्याने युनिकोडचा भारतातील वापरही प्रमाणित होतो. याशिवाय भारत सरकारकडे स्वतंत्र असा भाषेसाठी एक विभागही कार्यरत आहेत. भारतीय भाषा तंत्रज्ज्ञान विकास संस्था ( टेक्नॉलॉजीकल डेव्हलपमेंट फॉर इंडियन लँग्वेजस TDIL ) असे त्यांचे नाव आहे. भारतीय भाषांकरीता या सगळ्यांनी मिळून Iscii – 88 आणि Iscii- 91 हे युनिकोड प्रमाणित केले आहेत.
फार तांत्रिक बाबींच्या खोलात न जाता विचार करु. मुळात युनिकोड ही संगणक आज्ञाप्रणालीचा म्हणजे सॉफ्टवेअर नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. तर संगणकाचा वापर वाढवण्यासाठी, जगभरातील लक्षावधी भाषिकांना त्यांच्या-त्यांच्या लिपीमध्ये व्यक्त होण्यासाठीची सुविधा आहे. त्यात एक सुसूत्रता असावी यासाठीच युनिकोड आता आपल्या मराठी भाषे पुरता विचार करु. समजा तुम्ही भारतात आणि महाराष्ट्रात आहात , मराठी युनिकोडची तुमच्याकडे सुविधा आहे. तर तुम्ही ई-मेल युनिकोड मराठीतून लिहिला तर तो तुमच्या अमेरिकेच्या किंवा अगदी चीनमधल्या मित्राला दिसेल मराठीतून, वाचताही येईल मराठीतून. पण त्या मित्राला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे तर त्याच्याकडे युनिकोड नसेल , तर संपले. फक्त युनिकोड असून चालणार नाही, तर युनिकोड इन्स्टॉल करावे लागेल. त्यातही आशियायी भाषांसाठी सेटींग करावे लागेल. त्याशिवाय कि-बोर्डसाठीचा ऑप्शन सुरु करावा लागेल. शिवाय युनिकोडशी संबंधित तो टंक म्हणजे फॉन्टही डाऊनलोड करुन घ्यावा लागेल. समजा चीनमधल्या त्या मित्राकडेही या सगळ्या गोष्टी आहेत. तर तोही तुम्हाला युनिकोड मराठीतच उत्तर देऊ शकेल. यापुर्वी टंक म्हणजे फॉन्ट आणि हे लेखन करण्यासाठी खूप यातायत करावी लागेल. या सगळ्या गोष्टींच युनिकोडने संपुष्टात आणल्या करण्यासाठी खूप यातायत करावी लागेल. या सगळ्या गोष्टींच युनिकोडने संपुष्टात आणल्या आहेत. म्हणजे युनिकोड कन्सोर्शिअम करते तर काय ? तर वर उल्लेख केल्याप्रमाणे भाषेची लिपी, त्यातील चिन्हे, गणितीय चिन्हे, विराम चिन्हे आदी गोष्टी एनकोड म्हणजे संकेतबद्ध करते. म्हणजे तुम्ही जगभरात कुठेही गेलात आणि ही पद्धती वापरली तर फरक तो पडणार नाही. म्हणजे पुन्हा आपल्या मराठी पुरता विचार करु किंवा मराठी भाषेसाठी समीकरण मांडू म्हणजे ते जगभरातल्या भाषांना-लिप्यांना लागू करता येईल. यातून युनिकोडने किती स्वतंत्र आणि व्यापक विचार आणि अस्तित्व निर्माण केले आहे, ते लक्षात येईल.
मराठीतच्या वर्णमालेचा विचार करु या. अगदी स्वर, व्यंजन आणि मुळाक्षरांसाठी अ पासून ज्ञ पर्यंत युनिकोड एक सांकेताक तयार करते. तोच संकेत ज्ञ आणि च्या विविध रुपांसाठी युनिकोड प्रमाणित करते. हीच गोष्ट अगदी जपान किंवा चिनच्या लिप्यांना लागू होते. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात कि-बोर्ड वापरत असता इंग्रजी. पण युनिकोड सुरु तुम्ही ॲक्टिव्ह असेल, त्यावेळी मात्र तुमच्या कि-बोर्डवरुन जाणारा संकेत मात्र त्या-त्या भाषेसाठी निर्धारित केलेल्या संकेताप्रमाणे जात असतो, आणि स्क्रिनवर ती लिपी-भाषा उमटत असते. त्यामुळे आता आपण पाहतो आहोत, की यापुर्वी सगळ्या संकेतस्थळांवर अपरिहार्य कारणाने इंग्रजीच वापरावी लागत असे. पण आता मात्र युनिकोडमुळे अनेक मराठी संकेतस्थळी दिसू लागली आहेत. युनिकोडचा वापर वाढू लागल्याने, पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल, तब्बल पन्नास टक्क्यांवहून अधिक संकेतस्थळ युनिकोडमध्ये दिसू लागगली आहेत. हा युनिकोडच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक घटकांचा विजय मानावा लागेल. युनिकोड नं जगभरातल्या अनेक भाषांना आपल्यात सामावून घेऊन, एक स्वतंत्र अशी भाषा तयार केली आहे. खरेतर ती कुठेही वर-वर दिसत नाही. पण संकेताकांच्या आणि प्रत्येक चिन्हाच्या रुपाने निर्धारित होत असते. तिचा पसारा अफाट आणि दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळेच युनिकोडने जगाला भाषांच्या वापरातून संगणकाच्या युगात युनिफाय म्हणजे एकसंघ केले आहे असेच म्हणावे लागेल.
भारतातात इंडियन स्क्रिप्ट अर्थात इनस्क्रिप्टसह फोनेटिक कि-बोर्डही वापरात येतो. पण देवनागरीशी संबंधित भाषांसाठी इनस्क्रिप्टच युनिकोडसाठी अधिक वापरला जातो.
मायक्रोसॉफ्टने ओपन टाईप इंडिक स्क्रिप्ट भारतात उपलब्ध केले आहेत. लता- तमिळ, मंगल-देवनागरी, रावी- गुरमुखी व देवनागरी, श्रृती- गुजराथी व देवनागरी , तूंग- कन्नड व देवनागरी.
युनिकोडमध्ये आता जगभरातील तब्बल 93 हून अधिक भाषांच्या लिपी संकेतबद्ध एनकोड केल्या गेल्या आहेत. यामध्ये तब्बल दहा ते बारा लाख अक्षरांचा समावेश केला गेला आहे. उपखंडीय संरचनेनुसार जगभरातल्या अनेक लिप्या आता युनिकोडमध्ये झाल्या आहेत. त्यामध्ये युरोपीयन, आफ्रिकन, मध्य पुर्वेतील अरेबिक, हिब्रू, दक्षिण अशियायी ज्यामध्ये देवनागरी लिपीमध्ये समाविष्ट विविध भाषा, पूर्व आशियायी, दक्षिणमध्ये आशियायी, फिलीपाईन, मध्ये आशियायी यांच्यास उच्चारणातील एक गट तयार करण्यात आला आहे.
युनिकोडनं अनेक भाषांना संगणकीय संवाद, माहितीचं आदान-प्रदानाच्या क्षेत्रात असं काही गुंफून टाकलंय, की बस्स. त्यामुळे आता मराठी संगणक आणि माहितीच्या महाजालावरही दिमाखात दिसू लागली आहे. युनिकोडनं जगभरातल्या भाषांना, आपल्या भारतातल्याही अनेक भाषांना संगणकीय परवलीद्वारे माहितीच्या महाजालकांवर आणि संगणकीय व्यवहारात स्थान दिले आहे. नव्हे, त्यामध्ये सातत्यपुर्ण संशोधनही सुरु आहे. ज्यामुळे तंत्रज्ज्ञान आणि प्रणालीतील बदल झाले, तरीही या भाषांचा वापर सहज सुलभ होईल, असे प्रयत्न आहे. त्याअंगाने युनिकोड म्हणजे काय हे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. माहितीच्या महाजालकांवर मराठी विराजमान झाली आहे. तिचा अधिकाधिक वापर, वाचन-लेखन आणि त्यासाठी नव-नवे प्रयोग, उपक्रम राबविणे या गोष्टी आपल्या हातात आहेत. ज्यामुळे माहिती तंत्रज्ज्ञानाच्या या वेगवान युगातही आपली मराठी आणखी समृद्ध होईल. ती इतरांसाठीही औत्सुक्याचा, कुतूहलाचा विषय होईल. त्यामुळे संगणकावर माहितीच्या महाजालावरही मराठी वाचू या..लिहू या.. तिचा अधिकाधिक वापर करू..या !
युनिकोड (कन्सोर्शिअम) संघाचे सदस्य.
स्थायी सदस्य- अडोब, ॲपल, गुगल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट ओरॅकल, सॅप, याहू.
संस्थात्मक सदस्य : भारत सरकार, पश्चिम बंगालमधील सोसायटी फॉर नॅच्युरल लॅंग्वेज टेक्नॉलॉजी रिसर्च, बांग्लादेशचे विज्ञान- माहिती तंत्रज्ज्ञान मंत्रालय, उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेचा भाषा विषयक अभ्यास केंद्र.
याशिवाय सह्योगी सदस्य, व्यक्तिगत सदस्यत्व अशा गटातही कित्येक बलाढ्य कंपन्यांसह, अनेक विद्यापीठ, भाषा विषयक संशोधन संस्था, संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या संघाचे सदस्य आहेत.

युनिकोड एक संगणक क्रांतीच..!
डब्लूडब्लूडब्लू अर्थात वर्ल्ड वाईड वेब अर्थात इंटरनेटच्या या महाजालकाचा उद्गागाता , सर टीम बर्नलर ली.  ली वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्शिअमचे संस्थापक आहेत, ते म्हणतात, वर्ल्ड वाईड वेबने (www) जगावर जितका प्रभाव टाकला, तितकाच मोठा प्रभाव युनिकोडचा आहे. युनिकोडमुळे संगणक क्षेत्रात केलेली ही क्रांतीच मानावी लागेल.
जावा; या प्रणालीचा उद्गगाता आणि सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक जेम्स गोस्लिंग म्हणतात. युनिकोडशिवाय इंटरनेटला अनेक कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले असते. पण आता यामुळे जगभरातील अनेक लोकांना जोडणे सोपे झाले आहे. युनिकोड शिवाय जावा या प्रणालीला जावा म्हणते आले नसते. इतका अमुलाग्र बदल युनिकोडने घडविला आहे.
मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस म्हणतात. डिजीटल डिव्हाईड म्हणजे आपआपल्या भाषांत संगणकाचा वापर करु शकणारे आणि संगणकीय माहिती तंत्रज्ञानाचे युग यातील मोठी दरीच युनिकोडने नाहीशी केली आहे.
-         निशिकांत तोडकर

माहिती अधिकारी नांदेड 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...