Wednesday, April 24, 2024

वृत्‍त क्र. 382

 डंख छोटा धोका मोठा

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी

 

नांदेड दि. 24 एप्रिल : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Accelerating the Fight Against Malaria for a more Eqitable World मराठी भाषांतर मलेरिया विरुध्‍द जगाच्‍या संरक्षणासाठी, गतीमान करु हा लढा मलेरियाला हारविण्‍यासाठी असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

 

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2021 मध्ये 2,75,221 सन 2022 मध्ये 4,41,904 सन 2023 मध्ये 5,17, 519 तर मार्च 2024 अखेर 1,21,899 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.  

 

हिवताप

हिवताप हा आजार "प्लाझमोडीअम" या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

 

डासांची उत्पत्ती

स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते.

 

हिवतापाचा प्रसार

हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

 

हिवतापाची लक्षणे

थंडी वाजुन ताप येणेताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतोताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

 

रोग निदान

प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

 

तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

 

औषधोपचार

औषधोपचार कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

 

हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना

 

आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका.


घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.


अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 

झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे.

 

संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

 

आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये.

 

घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

 

वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

 

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावाअसे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

 

00000  

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...