Saturday, January 24, 2026

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोठा प्रतिसाद.

मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधेचा गरजू भाविकांना होतोय लाभ.

आरोग्य विभागाचे सुमारे 300 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी तैनात.

नेत्र तपासणी, गरजूंना मोफत चष्मे आणि वृद्धांना आधारासाठी काठीचे वाटप.










 हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम

🗓️दि. २५ जानेवारी २०२६
⏲️सकाळी ८.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
📍असर्जन परिसर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैदान, वाघाळा-नांदेड

वृत्त क्र. 130

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन

नांदेड, दि. 25 जानेवारी:- हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

0000





वृत्त क्र. 129 

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री

सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

नांदेड, दि. 25 जानेवारी :- दिल्ली सरकारचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,पर्यावरण व वने मंत्री सरदार मनजींदर सिंघ सिरसा यांचे आज विमानाने श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. 

विमानतळावर श्री.सिरसा यांचे आगमन प्रसंगी खासदार अशोक चव्हाण,आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

श्री.सिरसा हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

00000







वृत्त क्र. 128 

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन 

नांदेड, दि. 25 जानेवारी :- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे आज २५ जानेवारी रोजी नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री श्री.कल्याण यांचे स्वागत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

उपमुख्यमंत्री श्री.कल्याण हे विमानतळ येथून शासकीय वाहनाने गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर "श्री गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विमानतळ येथून रवाना झाले.

00000






 

वृत्त क्र. 127 

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·         भाविकांनी व्यक्त केले समाधान 

नांदेड, दि. 25 जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. 

या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. 

याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आबालवृद्धांसह दूरवरून आलेल्या भाविकांनी या सेवा उपक्रमांचा लाभ घेतला. 

सेवा स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निःशुल्क सेवांबाबत बहुसंख्य भाविकांनी समाधान व्यक्त केले. सर्व स्टॉलधारकांनी दोन्ही दिवस योग्य नियोजन करून उत्कृष्ट सेवा बजावली असून ही सेवा निश्चितच प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

या सेवा उपक्रमांमुळे नांदेडकरांचा सेवाभाव भाविकांच्या मनात कायम राहील. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल व्यवस्थापन पथकाने स्टॉल नियोजन, वितरण व संचालनासाठी विशेष परिश्रम घेतले.

0000

 वृत्त क्र. 126 

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा 

नांदेड, दि. 25 जानेवारी :- हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. 

जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. 

सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. 

शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.

0000








 https://youtube.com/live/YOv5JQpFMs4 

वृत्त क्र. 125 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 24 जानेवारी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार 25 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने दुपारी 12.35 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.35 वा. श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 2 वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थिती. दुपारी 2.05 वा. मोटारीने तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी, नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. मोटारीने मोदी मैदान, वाघाळा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. मोदी मैदान वाघाळा, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 वा. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी एवं श्री गुरू गोबिंद सिंघजी 350 वा गुरता गद्दी शताब्दी समागम कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 वा. मोटारीने श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.40 वा. श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 4.45 वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्थान प्रसंगी उपस्थिती. सायं. 4.55 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000


विशेष वृत्त क्र. 124 

नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान 

नांदेड, दि. 24 : सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री. मान यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सेवा हाच खरा धर्म आहे. या सोहळ्यातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश देशभर पोहोचत आहे. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यांचे कार्य, त्याग व विचार येणाऱ्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मान यांनी सांगितले. नांदेड येथील पंजाब भवनचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुढाकार : राज्य समन्वयक रामेश्वर नाईक 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास घराघरात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शाळा, महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावरील माहितीपट, गीत दाखविण्यात येत असून यामाध्यमातून त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचला आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरणार आहे, असे राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले. 

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज, संत बाबा बलविंदर सिंघ जी, महंत रघु मुनी यांच्यासह संत, महंत यावेळी उपस्थित होते.

0000


विशेष वृत्त क्र. 123 

नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक 

नांदेड,दि.24 (जिमाका )हिंद- दी- चादर श्री  गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण केले.विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान,महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले. 

गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत श्री  गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने राज्यस्तरीय समागम समितीच्या सहाय्याने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी प्रशासन आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या माध्यमातून सुरू होती. यासाठी मोदी मैदानाच्या 52 एकर परिसरात गुरुद्वाराची प्रतिकृती असलेला मंडप उभारण्यात आला असून लंगर सेवेसाठी आठ मंडप, आरोग्य शिबिर, चित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. प्रशस्त पार्किंग,स्वच्छतेच्या उपाययोजना,पिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक सुविधांची उभारणी या मैदानावर करण्यात आली आहे. 

भाविकांचा जनसागर: पारंपारिक वेशभूषा आणि बोलीभाषेतील गीतांतून जागविला भक्तिभाव

याठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री  गुरु तेग बहादुर साहिबजी दरबार या मुख्य मंडपात गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. अबालवृद्ध भक्तांनी अतिशय शिस्तबद्धपणे गुरुचरणी माथा टेकत गुरुनाम स्मरण केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेल्या शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील भाविकांचा यामध्ये समावेश होता. आंध्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.यापैकी काही महिलांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या मंडपात आपापल्या बोली भाषेतील भक्तिगीते सादर करत अनोख्या पद्धतीने भक्तिभाव जागविला. 

प्रशासनाचे चोख नियोजन; भाविकांची स्वयंशिस्त आणि परिसराची स्वच्छता अबाधित

52 एकराच्या विस्तीर्ण परिसरात होत असलेल्या या भव्य कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावूनही परिसराची स्वच्छता कायम होती. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि राज्य समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशासकीय सदस्यांच्या मदतीने जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी चोख नियोजन केले होते. यासोबतच याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत झाली.

******


वृत्त क्र. 122 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड, दि. 25 जानेवारी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 12.15 वाजता बारामती पुणे येथून श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या स्वागतास उपस्थिती. दुपारी 2.05 वाजता मोटारीने गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी नांदेड येथे दुपारी 2.15 वाजता आगमन. तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी नांदेड येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता मोदी मैदान, वाघाळा, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वाजता हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहिदी दिनानिमित्त व श्री गुरु गोबिंद सिंहजी यांच्या 350 व्या गुरता गद्दी शताब्दी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.40 मोटारीने श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. नंतर माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता पुणेकडे प्रयाण करतील.

00000

 

 


विशेष वृत्त क्र. 121 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम 

आरोग्य शिबिरात 250 डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ 


·         कर्करोग व एंडोस्कोपी सुविधाही उपलब्ध 

नांदेड, दि. 24 : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमधील मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २५० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून भाविकांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात येत आहेत. 

आजपासून मोदी मैदानावर सुरू झालेल्या या आरोग्य शिबिराला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी १२ सुसज्ज दालने उभारली असून, शासकीय यंत्रणेसह खाजगी रुग्णालयांच्या सहभागाने ही सेवा अखंडितपणे दिली जात आहे. 

अद्ययावत आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञांची फौज श्री गुरु तेग बहादूर साहिबजी दरबार या मुख्य मंडपाच्या दोन्ही बाजूस उभारण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.  यामध्ये विविध वैद्यकीय शाखांमधील २५० डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे असंसर्गजन्य रोग, दंतरोग, महिलांचे आजार, मधुमेह, हृदयरोग, आणि क्षयरोग यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सल्ला व उपचार दिले जात आहेत. 

पोटाच्या विकारांसाठी 'एंडोस्कोपी' आणि 'कर्करोग तपासणी' (कॅन्सर स्क्रिनिंग) यांसारख्या महागड्या चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जात आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी काठीचे वाटपही करण्यात येणार आहे. 

आपत्कालीन सज्जता कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. कार्यक्रमस्थळी ५ बेडचा अद्ययावत अतिदक्षता कक्ष (आयसीयू) स्थापन करण्यात आला आहे. तसेच, शहरात 'अँडव्हान्स लाईफ सपोर्ट' (एएलएस) प्रणाली असलेल्या २५ आणि 'बेसिक लाईफ सपोर्ट' (बीएलएस) प्रणाली असलेल्या ४०, अशा एकूण ६५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी दिली.       

आरोग्य शिबिरात पहिल्याच दिवशी ५,२४९ रुग्णांनी घेतला लाभ

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास भाविक व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २४९ रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 

या शिबिरामध्ये १,०८० रुग्णांची हाडांची तपासणी, २,९६७ रुग्णांची नेत्र तपासणी, ४३७ रुग्णांची आयुष तपासणी, तर ६४२ रुग्णांची एनसीडी (असंसर्गजन्य आजार) स्क्रीनिंग करण्यात आली. तसेच १६ रुग्णांना इंजेक्शन, ८८ रुग्णांची ईसीजी तपासणी, १३१ लहान मुलांची आरोग्य तपासणी, आणि ७७ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. यासोबतच सर्जरी विभागामार्फत ७२ रुग्णांची तपासणी, ३४ जणांची अवयवदान नोंदणी, ५८७ रुग्णांना चालण्यासाठी आधाराची काठी, तर १,७९९ रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ३२ रुग्णांची मोतीबिंदू तपासणीही करण्यात आली. 

भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या व्यापक आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

हिंद दी चादर शहीदी समागमात भाविकांना उत्तम सुविधा; आरोग्य शिबिराचा लाभ घेत केले समाधान व्यक्त   

 हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमात सहभागी झालेले भाविक गोपाळ हरी सावळे यांनी कार्यक्रमस्थळी चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगत येथील आरोग्य शिबिरास भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीनंतर आवश्यक औषधे तसेच चालण्यासाठी आधाराची काठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. 

याचप्रमाणे श्रीमती लक्ष्मीबाई पुंड व श्रीमती उषाबाई सूर्यवंशी यांनीही कार्यक्रमात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य शिबिरामार्फत तपासणी करून आवश्यकतेनुसार चष्मा देण्यात आल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. 

शहीदी समागमाच्या निमित्ताने भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जनकल्याणकारी उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0000


वृत्त क्र. 120 

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा

नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 1 वाजता कलिना विमानतळ येथून विमानाने मा. मुख्यमंत्री महोदयासमवेत श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वा. वाहनाने मोदी मैदान वाघाळाकडे प्रयाण. दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत मोदी मैदान, वाघाळा, नांदेड येथील हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वी शहिदी व श्री गुरु गोविंदसिंघजी 350 वी गुरता गद्दी शताब्दी समागम कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.35 वाजता नांदेड येथून वाहनाने जालना जि. जालनाकडे प्रयाण करतील.

0000


वृत्त क्र. 119 

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा

 नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 2 वा. परभणी येथून श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहीबजी नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मोदी मैदान, नांदेड येथील हिंद-दी-चादर कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 4 वाजता नांदेड येथून सेलू जिल्हा परभणीकडे प्रयाण करतील.

0000


वृत्त क्र. 118 

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचा दौरा  

नांदेड दि. 24 जानेवारी :- दिल्लीचे  उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, पर्यावरण व वने मंत्री सरदार मनजींदर सिंघ सिरसा हे रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.  

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 10.15 वाजता हैद्राबाद येथून विमानाने श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून विमानाने हैद्राबाद विमानतळकडे प्रयाण करतील.

00000


विशेष वृत्त क्र. 117 

शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण 

️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस 

️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी 

नांदेड, दि. 24 : शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे. 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीख' या प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाचे दालन भाविकांनी तुडुंब भरल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आज, 25 जानेवारी 2026 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

0000


विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...