Tuesday, January 11, 2022

 फोटो ओळी : 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. श्री. संजय तुबाकले यांनी उमेद अभियान अंतर्गत स्थापित स्वयंसहायता समूहांच्या स्टॉल्सला भेट देऊन खरेदी केली.



0000000

 कृषि क्षेत्रासमवेत शिक्षणाच्या सुविधाही भक्कम व्हाव्यात 

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

·         डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण   

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारताच्या खेड्यापाड्यात असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जय जवान जय किसान हा नारा दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी दिला. यातून  शेतकऱ्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्रांती तर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांतीसाठी दिलेल्या योगदानाने कोरडवाहू क्षेत्रालाही हक्काचे पाणी मिळू शकले. असंख्य योजना ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे राबविल्या जात आहेत. काळानुरूप या योजनांमध्ये बदल करून त्याला नवतंत्रज्ञानाची जोडही दिली आहे. शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधाही अधिक भक्कम होणे गरजेचे असून नव्या काळाशी सुसंगत यात बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने  कै. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन 2020-21 वितरण सोहळा आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपा महापौर जयश्री पावडे, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर,  दिनकर दहीफळे, नामदेव आईलवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात माहूर, हिमायतनगर, किनवट व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषि क्रांती योजना या भागासाठी राबविल्या जातात. आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्र यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या ग्रामीण पातळीपर्यंत यशस्वीपणे पोहल्या पाहिजेत. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी निजामकाळातील असलेल्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक असलेल्या शाळांच्या इमारती काढून त्याठिकाणी नवीन इमारती उभ्या करण्यावर भर देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

आपल्या जिल्ह्याचे क्षेत्र मोठे आहे. सर्व भागाच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्राम विकासात नांदेड जिल्हा मागे राहणार नाही यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यावर भर देऊन काम करतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाला शुद्ध व स्वच्छ पाणी पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे. अर्धवट बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित कशा होतील याकडे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे. ज्या ठिकाणी नवीन योजना प्रस्तावित केल्या आहेत ती कामे अधिक चांगल्या प्रतीचे झाली पाहिजेत. येत्या दोन वर्षात जलजीवन मिशनमधील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा-सुविधा देण्याच्यादृष्टिने माती व परीक्षण करता यावे, यासाठी फिरत्या तपासणी व्हॅनची आवश्यकता आहे. यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मागच्यावर्षी 110 तर यावर्षी 70 लाभार्थ्यांना सानुगृह अनुदान दिले आहे. कृषिसमवेत पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना नांदेड जिल्ह्यात राबविल्या जात असल्याची माहिती कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी दिली.

 

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कृषी विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या यशोगाथा बळीराजाची या पुस्तिकाचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी कै. वसंतराव नाईक व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विश्वास अंबेकर यांनी गायलेल्या वंदेमातरम्  गीतने झाली. 

 

माझी शेती व माझे शिवार या डेमो हाऊसचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवडक शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील 70 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदानाचे धनादेश देण्यात आले. सर्पदंशामुळे मृत्यू जनावरांच्या मालकास प्रत्येकी वीस हजार रुपये नुकसानभरपाईचे 5 लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकामाचा कार्यारंभ आदेश प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना प्रधान करण्यात आले. 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमनशेटे यांनी मानले. तीत प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक, नाविन्यपूर्ण पद्धतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.  स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, फेटा, साडी-चोळी व वृक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे हे आहेत मानकरी       

 

या समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात दत्तात्रय कदम (धामदरी अर्धापूर),  बालाजी शामनवाड (नागापूर भोकर), बळवंत पाटील (बोरगाव थडी बिलोली),  सदाशिव वाडीकर (खुतमापूर देगलूर),  प्रमोद हेमके (करखेली धर्माबाद),  कैलास पोगरे (हदगाव),  अर्जुन राठोड (बळीराम तांडा हिमायतनगर),  गोविंद काळम  (उस्माननगर कंधार),  पांडुरंग खुपसे (टिंगणवाडी किनवट),  अर्जुन जाधव (डेरला लोहा), संजय गायकवाड (हिवळणी माहूर), संजय पवार (निवघा मुदखेड),  केशव इंगोले (बेरळी बु मुखेड),  कमलबाई अण्णाराव धोतरे (नाळेश्वर नांदेड),  नागनाथ हुलकुडे (मांजरमवाडी नायगाव),  माधव कदम (शेलगाव उमरी) व बालाजी जाधव (लखमापूर मुखेड) यांचा समावेश आहे. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव इंगळे व धोंडीराम सुपारे यांचाही यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

000000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...