Sunday, October 30, 2016

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 – विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्षवेधले.
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर एकता दौड मार्गस्थ झाली. दौडमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, मनपा सहाय्यक आयुक्त संतोष कंदेवाड, जिल्हा‍ क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, तहसिलदार अरविंद नरसीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी सहभागी होते.
पोलीस अधीक्षक ऐनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने पथक जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...