Sunday, August 22, 2021

 

जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 23 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 21 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 42 हजार 52 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 22 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 51 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 95 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 406 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 721 एवढी झाली असून यातील 88 हजार 18 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, किनवट तालुक्यांतर्गत 1, हदगाव 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात बिलोली तालुक्यांतर्गत 2, अर्धापूर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 98 हजार 264

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 95 हजार 347

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 721

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 18

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000



 

 शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आम्ही शिंदे परिवाराच्या दु:खात सहभागी - पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वीरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतीक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी सुरक्षिततेची जबाबदारी चोखपणे बजावली. छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याचे सांगून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

मुखेड तालुक्यातील बामणी गावाच्या शिवारात शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्यावर आज सकाळी 10 वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, सरपंच माधवराव जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी महेश वडदकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

शिंदे परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शोकभावना शिंदे परिवाराप्रती व्यक्त केल्या असून हृदय हेलावून टाकणारा हा क्षण असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. शासनाच्यावतीने त्यांनी शहीद सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. 

जिल्हा प्रशासनातर्फे बामणी शिवारात शहीद शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तातडीने चबुतरा व शेडची उभारणी केली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव कबीर यांने अग्नीडाग दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरुन आले. त्यांच्या पत्नी सुधा, वडील रमेश, आई, लहान भाऊ व बहिणीसह सर्व परिवार शोकसागरात बुडाला. अग्नीडागापूर्वी शहीद शिंदे यांना जिल्हा पोलीस तसेच लष्कराच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा व वडील रमेश यांच्याकडे लष्कराच्यावतीने पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पूद करण्यात आला.  

00000












 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...