Saturday, December 24, 2016

लेख -

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीचा ठेवा
  मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात 14 व्या दिवशी भरते.  यावेळी ही यात्रा 27 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान भरणार आहे. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेविषयी माहिती....
महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. याठिकाणी महामार्गा शेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेला पडते. त्याठिकाणाहून उजव्या बाजुला आत गेल्यानंतर भव्य मंदिर, परिसर यात्रेकरुनी दुमदुमलेला दिसतो. माळेगाव येथे पूर्व-पश्चिम असे एक मोठे आवार बांधले आहे. या आवाराच्या पूर्वाभिमूख महाद्वार आहे. या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णुची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. आठराव्या शतकातील हा शिलालेख मराठी भाषेत आहे. मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबादेवाची महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातही बारा देवस्थान आहेत.       
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन जागृत दैवत खंडोबारायांच्या समोर भरवली जाते. यात्रेचे व्यवस्थापन नांदेड जिल्हा परिषद नियोजनबद्ध करते. देवघरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. या मुर्तीच्या देवघरासमोर एक सभागृह बांधले आहे. सभागृहाच्या मुख्यद्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. 18 व्या शतकातील हा शिलालेख मराठीत भाषेत आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते.
सांस्कृतिक परंपरा
            श्रीक्षेत्र माळेगावच्या नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा आहे. अनेकजण खंडोबास मनापासून आपले कुलदैवत मानतात. स्थानिक परंपरेनुसार दोन अख्यायिका येथील नागरिकांमध्ये अधिक रुजलेल्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असल्याने श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबारायाच्या मंदिरासोबत यात्रेची देखभाल व व्यवस्था चांगली ठेवली जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचा आदर्श ठेऊन लोककला आणि मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाशा कला महोत्सव, लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. त्यासाठी प्रोत्साहनाच्या बक्षिसांची लयलूट होते. कुस्तीच्या आखाड्यातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविल्या जाते. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन केले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते. विविध विभागाची, माहिती प्रदर्शने, वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळी, उद्योग दालने, संमेलन, मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरवून बसावे असे सर्व काही प्रेक्षणीय म्हणजे ही यात्रा आहे. यात्रेच्या निमित्ताने देशातील विविध भागातून सर्व जातीचे-धर्माचे नागरिक एकत्र येतांना येथे दिसतात. याठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचे, एकात्मतेने नटलेल्या‍ विविधतेचे दर्शन जवळून घडते. आनंद मिळवून देणाऱ्या, विविध अंगाने सजलेल्या या यात्रेत भाविकांबरोबर कलावंतांनी सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा महोत्सवाच्या रुपाने जवळून पहावा.  
-         काशिनाथ र. आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000000
विभागीय महसूल क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत
नांदेड जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद
क्रीडा प्रकारात पटकाविले 402 गुण; औरंगाबादला दुसरे स्थान
नांदेड, दि. 24:- औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. औरंगाबाद जिल्ह्याला दुसरे तर लातुरला तिसरे स्थान मिळाले. नांदेड जिल्ह्याने सांघिक खेळात खो-खो पुरूष व महिला, थ्रो-बॅाल, कबड्डी, व्हॅालीबॅाल आणि जलतरणमधील विविध प्रकारात निर्विवाद विजेतेपद पटकाविले. क्रिकेटमध्ये परभणीने तर फुटबॅालमध्ये हिंगोलीने स्पर्धेतील विजेतेपद मिळविले. सांस्कृतिक विभागातही नांदेडला विजेतपद मिळाले. सांस्कृतिकमध्ये लातूर दुसऱ्या तर औरंगाबाद तिसऱ्या स्थानावर राहीले. या तीन दिवसीय विभागीय स्पर्धा येथील यशवंत महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय तसेच जिल्हा क्रीडा संकूल, महापालिकेचा तरणतलाव अशा विविध ठिकाणी पडल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपुर्ण वातावरणात संपन्न झाले. यजमान नांदेडसह मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास संत बाबा बलविंदरसिंघजी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विभागीय अप्पर आयुक्त गोविंद बोडखे होते. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, परभणीचे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांच्यासह उपायुक्त वर्षा ठाकूर, सरीता अंबेकर, महेंद्र हरपाळकर, नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अप्पर आयुक्त श्री. बोडखे यांनी नांदेडने यजमानपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतून मिळणारी ऊर्जा घेऊन, पुढे आणखी जोमाने काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. नांदेड जिल्ह्याने या तीन दिवसांच्या स्पर्धा आयोजनात कुठलीही कमतरता ठेवली नाही. खरेतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांमुळे कुणीतरी जिंकतो. त्यामुळे सहभागी संघांचे, त्यातील खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही या निमित्ताने अभिनंदन करावे लागेल. यातून मराठवाडा विभागाचा उत्तम संघ राज्यस्तरावरील प्रतिनीधीत्वासाठी तयार होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी  स्पर्धेसाठी नियोजनासाठी अपुरा कालावधी असूनही, निवडणुकांच्या धकाधकीच्या दिवसातच नांदेड जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह, विविध घटकांनी झटून या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न केले. या सर्वांना स्पर्धेच्या नेटक्या नियोजनाचे श्रेय जाते, असे सांगून. स्पर्धेसाठी विविध बाबींकरिता वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व घटकांचा आवर्जून उल्लेख करून, त्यांचे आभारही मानले.
तत्पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचा ध्वज पुढील आयोजनासाठी जालना जिल्ह्याकडे यजमान म्हणूनही अप्पर आयुक्त श्री. बोडखे यांच्या सुपूर्द करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस वाद्यवृंद पथकाचे यावेळी विशेष कौतूक करण्यात आले. तसेच स्पर्धा संयोजनात सहकार्य करणाऱ्या विविध घटकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यातही आले. परभणीचे जिल्हाधिकारी श्री. महिवाल यांचेही भाषण झाले. व्यंकटेश चौधरी आणि तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभाचे सुत्रसंचालन केले.
मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पदक तसेच सांघिक खेळांसाठी चषकाच्या स्वरुपातील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या संयोजनात सहभाग घेतलेल्या महसूल खात्यातील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. क्रीडा स्पर्धेत वैयक्तीक व सांघिक अशा 49 प्रकारात अधिकारी-कर्मचारी खेळाडुंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा संक्षीप्त निकाल पुढील प्रमाणे - कॅरम एकेरी (पु.)- राजु ससाणे (परभणी), कॅरम दुहेरी (पु.)- सुरेश गवळी (लातूर) व चंद्रकांत राजुरे, कॅरम एकेरी (महिला)-अश्विनी सोलापूरे (नांदेड), कॅरम दुहेरी (महिला)- अनिता कोलगने व मनिषा कांबळे (औरंगाबाद). बुद्धीबळ (पु.)- प्रविण चोपडे (बीड). बुद्धीबळ (महिला)- अश्विनी जाधव (परभणी). टेबल टेनिस एकेरी (पु.)-सिताराम ठोंबरे (औरंगाबाद). टेबल टेनिस दुहेरी (पु.)- सिताराम ठोंबरे आणि दत्तात्रय सबनीस (औरंगाबाद). टेबल टेनिस एकेरी (महिला)- मंगला मोरे (औरंगाबाद). टेबल टेनिस दुहेरी (महिला)- मंगला पवार व मनिषा कांबळे (औरंगाबाद). टेबल टेनिस मिश्र खुला- सिताराम ठोंबर व मंगला मोरे (औरंगाबाद). टेबल टेनिस 45 वर्षावरील एकेरी (पु.)-सिताराम ठोंबरे (औरंगाबाद). टेबल टेनिस 45 वर्षावरील दुहेरी (पु.)- सिताराम ठोंबरे आणि दत्तात्रय सबनीस (औरंगाबाद). टेबल टेनिस 45 वर्षावरील एकेरी (महिला)- प्रभा उंबरे (उस्मानाबाद). टेबल टेनिस 45 वर्षावरील दुहेरी (स्त्री)- अनिता खोरे आणि करुणा सांगळे (नांदेड). टेबल टेनिस 45 वर्षावरील मिश्र- दत्तात्रय सबनीस व मनीषा कांबळे (औरंगाबाद). बॅटमिंटन एकेरी (पु.)-सिरसिकर संतोष (लातूर). बॅटमिंटन दुहेरी (पु.)- विक्रम देशमुख व सिरसिकर संतोष (लातूर). बॅटमिंटन एकेरी (महिला)- स्वाती पेदेवाड (नांदेड). बॅडमिंटन दुहेरी (महिला)- वैशाली घाटोळ व ज्योती चौदंते (नांदेड). बॅडमिंटन मिश्र- संग्राम कदम व स्वाती पेदेवाड (नांदेड). 45 वर्षावरील बॅडमिंटन एकेरी- सुनिल महिंद्रकर (परभणी), 45 वर्षावरील बॅडमिंटन दुहेरी (पु.)- सुनिल महिंद्रकर व विजय गोंधले (परभणी). 45 वर्षावरील बॅडमिंटन एकेरी (महिला)- वंदना मस्के (परभणी). 45 वर्षावरील बॅडमिंटन दुहेरी (महिला)- सुनंदा गायकवाड व ऐश्वर्या काळुसे (औरंगाबाद), 45 वर्षावरील बॅडमिंटन मिश्र- गोविंद गोंधले व वंदना मस्के (परभणी), लॉन टेनिस एकेरी पु. – सखाराम मांडवगडे (जालना), लॉन टेनिस दुहेरी पु. – किरण अंबेकर व के. ए. पटने (नांदेड). 45 वर्षावरील लॉन टेनिस एकेरी- बुरांडे एस. आर. (बीड), 45 वर्षावरील लॉन टेनिस दुहेरी पु. – बुरांडे एस. आर. व ए. आर. गायकवाड (बीड). शंभर मीटर धावणे पु. – बबन हजारे (औरंगाबाद), शंभर मीटर धावणे (महिला)- अनिता हुडे (लातूर), दोनशे मीटर धावणे पु. – बबन हजारे (औरंगाबाद), दोनशे मीटर धावणे महिला- कदम वैशाली (उस्मानाबाद), चारशे मीटर धावणे पु. – राजेश शिंदे (औरंगाबाद), चारशे मीटर धावणे महिला- वैशली बारगळ (औरंगाबाद), उंच उडी पु. – जुनेद हाबीब शहा (जालना), उंच उडी महिला- किरण पावडे (हिंगोली), लांब उडी पु.- रोहित बागले (औरंगाबाद), लांब उडी (महिला)- वैशाली बारगळ (औरंगाबाद), गोळाफेक पु.- अनिल धुळगुंडे (नांदेड), गोळाफेक महिला- डोंगरे सध्या (लातूर), थाळीफेक पु.- प्रविण सुरेसे (हिंगोली), थाळीफेक महिला- अंजली घुगे (औरंगाबाद), भालाफेक (पु.)-लक्ष्मण जाधव (औरंगाबाद), भालाफेक महिला- शिल्पा कोहर (हिंगोली), तीन किमी चालणे 45 वर्षावरील- लक्ष्मण शिंदे (परभणी), तीन कमी चालणे 45 वर्षावरील (महिला)- कांताबाई झामरे (नांदेड), क्रिकेट- सितष रेड्डी व इतर (परभणी), फुटबॉल- इमरान पठाण व इतर (हिंगोली), खो-खो पु. – कानगुले व इतर (नांदेड), खो-खो (महिला)- श्रीमती एस. के. शहाणे व इतर (नांदेड), थ्रो बॉल- विद्या सुरुंगगवाड व इतर (नांदेड), कबड्डी- संतोष वेणीकर व इतर (नांदेड), व्हॉलीबॉल- विजय येरावाड व इतर (नांदेड),संचलन- श्री. झगडे व इतर (नांदेड), 4 बाय 50 जलतरण रिले- विजय येरावाड, मुगाजी, चंद्रकांत, संतोष (नांदेड), 50 मीटर फ्रीस्टाईल- चंद्रकांत बाबर (नांदेड), 50 मीटर बॅकस्ट्रोक- मुगाजी काकडे (नांदेड), 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक-विजय येरावाड, 100 मीटर फ्रीस्टाईल- चंद्रकांत बाबर (नांदेड), 100 मीटर बॅकस्ट्रोक- मुगाजी काकडे (नांदेड), 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक- विजय येरावाड (नांदेड), रिंग टेनिस एकेरी महिला – स्वप्ना अंभुरे (परभणी), रिंग टेनिस दुहेरी महिला- अर्चना कर्णेवाड व मिरा इंदुरकर (नांदेड), 4 बाय 100 रिले पुरुष- बबन हजारे, लक्ष्मण बोराडे, रोहित बागले, शिंदे राजेश (औरंगाबाद), 4 बाय 100 रिले महिला- भाग्यश्री जिल्हेवाड, वर्षा गंदगे, अनिता हुंडे, संध्या डोंगरे (लातूर), 4 बाय 400 रिले पुरुष – राजेश, रोहित, परमेश्वर, बबन (औरंगाबाद).
0000000
तोडकर 24.12.2016                            


श्री खंडेरायाच्या माळेगाव यात्रेसाठी
काटेकोर सुनियोजन करा - शिनगारे
कृषि, पशू प्रदर्शनासह भरगच्च कार्यक्रम, बैठकीत सर्वंकष आढावा
नांदेड, दि. 24:- श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची यात्रा 27 ते 31 डिसेंबर 2016 कालावधीत भरणार आहे. या यात्रेत कृषि-प्रदर्शन, पशू-प्रदर्शन यांच्यासह कुस्ती स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी नेमके आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा मिळाव्यात यासाठी सुनियोजन करा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले. यात्रेच्या पुर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलताई गुंडले होत्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती संजय बेळगे,अर्थबांधकाम समितीचे सभापती दिनकर दहीफळे, समाजकल्याण समिती सभापती स्वप्नील चव्हाण, लोहा पंचायत समितीच्या सभापती सौ. सोनाली ढगे, कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री श्रीनिवास मोरे, पुरुषोत्तम धोंडगे, श्रीमती कावेरी भालेराव, लोहा पंचायत समितीचे उपसभापती रोहीत पाटील, माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य तसेच लोहा-कंधार परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच  अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, यात्रा समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एल. रामोड, प्रवीणकुमार घुले,  विविध विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती.
बैठकीत पाणी पुरवठा, पोलीस बंदोबस्त, पशुसंवर्धन, कृषि, बांधकाम, शिक्षण आरोग्य आदी विभागांच्या जबाबदाऱ्या व सहभागाबाबत पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पशू प्रदर्शन यावर्षीही भव्य आणि सुनियोजितपणे होईल यासाठी नियोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कृषी प्रदर्शनात विविध विषयावरील मार्गदर्शनाप्रमाणेच यावर्षी शेतकऱ्यांसाठी रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांबाबत बँक अधिकाऱ्यांकडून दररोज दोन सत्रात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, यात्रेसाठी समन्वयाने आणि वेळेत नियोजन करा. प्रत्येक विभागाला सोपविलेले काम आणि त्याची अमंलबजावणी चोखपणे करा, या यात्रेची परंपरा फार मोठी आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाची यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेद्वार पशू-प्राण्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या जाती-प्रजातींचे जतन करण्याचे काम होते. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून नियोजन करा. विशेषतः आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेविषयी दक्ष रहा. प्लॅास्टीक कचऱ्याच्या उठावासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त अधीक्षक श्री. डोईफोडे यांनी आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी वीज व्यवस्था, अग्निशमन दलाच्या वाहनांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबतची माहिती दिली. यात्रेसाठी सुमारे एक हजार मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात असेल असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून चोवीत तास तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच पुरेसा औषधसाठा, तीन रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका उपलब्ध राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.
 बैठकीच्या सुरवातीला यात्रा समितीचे सचिव श्री. कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद व्यवहारे यांनी सुत्रसंचालन केले. बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आदींसह उपस्थिती नागरिकांनाही चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या.              
0000000
माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनात सहभागासाठी
पशुपालकांना जनावराच्या नोंदणीचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी पशुपालकांच्या जनावराची नोंदणी सकाळी 8 ते 11 अशी राहील. याची पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
मंगळवार 27 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन. बुधवार 28 डिसेंबर रोजी भव्य पशु प्रदर्शन. शुक्रवार 30 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना पशुपालकांसाठी देण्यात आल्या आहेत. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने जनावरांची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी 8 ते 11 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. निवड समितीचा निकाल अंतिम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसे दिली जातील. पशुपालकांनी येताना बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
000000