Friday, September 3, 2021

 हंगामातील प्रतिकूल परिस्थिती धिसुचना जिल्ह्यात लागू 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.

 

नांदेड जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. जिल्हयामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.

 

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे. सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत विमा कपंनीस निर्देश दिले.

 

तालुकानिहाय सायोबिन उत्पादकतेत घट : 

नांदेड तालुका 62.33, अर्धापुर 55.00, मुदखेड 61.67, बिलोली 61.98, धर्माबाद 61.74, नायगाव 60.00, मुखेड 60.37, कंधार 61.69, लोहा 64.00, हदगाव 59.75, हिमायतनगर 66.65, भोकर 64.73, उमरी 60.27, देगलूर 60.72, किनवट 68.79, माहूर 67.19 याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी मध्ये आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 843 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 748 एवढी झाली असून यातील 88 हजार 63 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, मुदखेड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 2 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 13 हजार 708

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 10 हजार 672

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 748

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 63

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 4  सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 लस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 2 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 34 हजार 482 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 3 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 67 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 88 हजार 160 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 55 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

 पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे  

नांदेड (जिमाका), दि. 3 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 3 सप्टेंबरला दिलेल्या सूचनेनुसार 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी  येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. रविवार 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या 6 व 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये याबाबत विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

पुढील गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये 

पूर येण्यापूर्वी : अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे. 

पूर दरम्यान : प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले / क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा. 

पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका.आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा.ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...