Wednesday, September 15, 2021

 

जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. 16  सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटील या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 88 हजार 565 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 8  कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 949 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 294 एवढी झाली असून यातील 87 हजार 611 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 7 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात बिलोली तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गंत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 7 असे एकूण 8 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 22 हजार 541

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 19 हजार 306

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 294

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 611

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-25

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-32

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5

00000

 

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका ) दि. 15 :-    जिल्ह्यात गुरुवार 16  सप्टेंबर 2021 चे सकाळी 6 वाजल्यापासून  ते गुरुवार 30 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 16  सप्टेंबर 2021 चे सकाळी 6 वाजेल्यापासून  ते गुरुवार 30 सप्टेंबर 2021 मध्यरात्रीपर्यंत  शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

मोटार सायकलसाठी एमएच 26-बीझेड ही नविन मालिका

 

नांदेड (जिमाका ) दि. 15 :-   मोटार सायकलसाठी एमएच 26-बीझेड (MH26-BZ) ही नविन मालिका 21 सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर ईमेलसह अर्ज 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल लिखित संदेशाद्वारे (Text message) संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

 

0000

 

 दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू  

नांदेड (जिमाका) दि 15 :- जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा 16 सप्‍टेंबर ते  11 ऑक्‍टोंबर 2021 या कालावधीत सकाळी 10.30 ते दुपारी  1.30 व दुपारी 3 ते सायं 6 वाजेपर्यंत दोन सत्रात एकुण 22 केंद्रावर होणार आहे. या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी व शिक्षक या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध केले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

00000

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शुक्रवार 17 सप्टेंबर 2021 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तत्पुर्वी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

या समारंभासाठी सर्व निमंत्रितांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने मास्क घालूनच कार्यक्रमास उपस्थित रहावे. राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्यादृष्टिने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

00000

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे 

नांदेड (जिमाका) दि 15 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...