Tuesday, March 6, 2018


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 6 :- वेतन पडताळणी  पथकाचा मार्च 2018 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 20 ते शुक्रवार 23 मार्च 2018 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झाली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
0000


    जवाहर नवोदय विद्यालयात
नववीसाठी प्रवेश परीक्षा
नांदेड दि. 6 :- जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी वर्गातील रिक्त जागेसाठी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची मुदत गुरुवार 5 एप्रिल 2018 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी www.nvshq.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.  
जिल्ह्यातील शासनमान्य शाळेतील इयत्ता 8 वी वर्गातील चालू शैक्षणिक वर्षे 2017-18 मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करु शकतात. प्रवेश परीक्षा शनिवार 19 मे 2018 रोजी जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर ता. बिलोली येथे घेण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000



माजी सैनिकांच्या
महिलांचा गुरुवारी मेळावा
नांदेड दि. 6 :- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे माजी सैनिकांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हयातील माजी सैनिकांच्या महिलांनी गुरुवार 8 मार्च रोजी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सायं 4 वा. उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
या मेळाव्यात जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता, सैन्यसेवेत असताना दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी, सर्व माजी सैनिकांच्या व सेवेतील सैनिकांच्या पत्नींचा सहभाग राहणार आहे. यावेळी सैनिक कल्याण विभागामार्फत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्हयातील शहीद जवानांच्या वीरपत्नी,  मा. सै. महिला बचतगट महिला, सामाजिक  व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्‍यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 6 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात रविवार 1 एप्रिल 2018 पासून सुरु होणाऱ्या 96 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारीकरीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे मंगळवार 27 मार्च 2018 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 31 मार्च 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 27 मार्च 2018 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.  
****


ज्येष्ठ नागरिक, सायबर क्राईम,
ताणतणाव व्यवस्थापनाची शनिवारी कार्यशाळा
नांदेड, दि. 6 :- ज्येष्ठ नागरिक, सायबर क्राईम, ताणतणाव व्यवस्थापनाची कार्यशाळा यशदा पुणे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने शनिवार 10 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम 2007 व नियम 2010 व सायबर क्राईम, ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयावर यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी यशदा पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड याच्या संयुक्त विद्यमानाने 250 व्यक्तींची कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, न्यायाधीश, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, विद्यापीठातील समाजशास्त्राचे एमफीलचे व पीएचडीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मंडळ, जिल्हा सरकारी अभियोक्ता, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता, पोलीस अभियोक्ता, सर्व तहसिलदार, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल), कुलगुरु, विशेष पोलीस महानिरीक्षक, विधी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विभाग प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे, असेही माहिती देण्यात आली आहे.  
00000



उष्‍णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी
नागरीकांनी काळजी घ्‍यावी - जिल्‍हा प्रशासन
नांदेड दि. 6 :- उन्‍हाळयाची सुरुवात यावर्षी लवकरच झाली असून मार्च ते जून  या कालावधीत राज्‍यात उष्‍णतेची तिव्रता निर्माण होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यानी व्‍यक्‍त केली आहे.  या उष्‍णतेच्‍या लाटेपासुन बचाव करण्‍यासाठी नागरीकांनी व परिक्षांचा कालावधी पुढे सुरु होत असल्‍यामुळे विद्यार्थ्यांनी योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.  
उष्‍माघातामुळे शरीराचे तापमान वाढुन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मोठा पांढरा पंचा आणि डोके झाकेल असा रुमाल, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे परिधान करणे, कमीत कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणे, जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने दोन तीन ग्लास पाणी पिणे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी, फळांचे रस पिणे अशा उपायानी उष्माघात टाळता येतो.  
कडक उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच स्वत:च्या रक्षणासाठी सावलीमध्ये बसणे आणि भरपूर पाणी पिणे या उपायानी पुरेसा आराम मिळतो. बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो. प्रखर तापमानात बाहेर उन्हात फिरल्‍याने शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढावतो. कानास फडके न बांधल्‍याने उष्णता मेंदुपर्यंत जाते व व्‍यक्‍ती बेशुध्‍द होते, उपाशी पोटी उन्हात फिरल्‍याने शरीरास साखरेचा, ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो. ती थंड पाणी पिल्‍याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो. अशावेळी त्‍वरीत वैद्यकीय उपचार घेणे आवश्‍यक आहे. कारण नसताना उन्‍हात न जाणे, भरपुर पाणी पिणे आणि  सुती  कपडे परिधान करने याद्वारे उष्‍माघात टाळता येतो.
नागरीकांना उष्‍माघाताचा रुग्‍ण आढळल्‍यास तात्‍काळ त्‍यास जवळच्‍या रुग्‍णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे. मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्‍हाळयाची सुरुवात लवकर झालेली असुन उष्‍णतेच्‍या लाटेपासून कोणत्‍याही प्रकारची जीवित‍हानी होऊ न देण्‍यासाठी जिल्‍हयातील महानगरपालिका आणि आरोग्‍य यंत्रणेशी समन्‍वय साधून उष्‍णतेच्‍या  लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्‍या तसेच यंत्रणा सज्‍ज ठेवावयाच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. उष्‍णतेची तिव्रता आणि तापमानात अचानक होणाऱ्या  वाढीवर नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...