Monday, January 23, 2023

वृत्त क्रमांक 37

 दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास जागवावा

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

पुर्वतयारी आढावा बैठकीत कॉपीमुक्त परीक्षेवर अधिक भर   

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शाळा तेथे परीक्षा केंद्र याबाबीखाली किमान 15 विद्यार्थी असलेल्या प्रत्येक शाळांना परीक्षा उपकेंद्र देण्यात आले होते. यावर्षी मंडळाने पूर्वीच्याच मुळ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून परीक्षा विहित वेळेप्रमाणे व शंभर टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांचा पूर्वी प्रमाणेच आत्मविश्वास वाढावा व त्यांना आनंदाने भयमुक्त वातावरणात परीक्षा देता याव्यात यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन कॉपी मुक्त परीक्षेसाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडावी यादृष्टिने पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राचार्य जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, विस्तार अधिकारी पोकळे आदी उपस्थित होते.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 2 मार्च पासून सुरू होत आहेत. यासाठी अनुक्रमे 92 व 160 परीक्षा केंद्र याचबरोबर केंद्र संचालक नेमण्यात आले असून तेवढेच बैठे पथक नेमण्यात येत आहेत. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून 39 हजार 645 तर दहावीच्या परीक्षेला 45 हजार 468 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी परिक्षकही नेमण्यात आलेले आहेत.

 

कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सर्व संबंधीत परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सीसीटीव्ही सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या-त्या परीक्षा केंद्रावर व्हायला हवा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या-त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अधिक सोपा कसा होईल, लहान प्रश्न व त्याचे उत्तरे लक्षात कशी ठेवता येऊ शकतील याबाबत मार्गदर्शनावर शिक्षकांनी भर द्यावा. विद्यार्थी तणाव मुक्त कसे होतील यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.

000000 

वृत्त क्रमांक 36

असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई

-  जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

 

तक्रारदारांच्या तक्रारीबाबत विभाग प्रमुखांसमवेत

विशेष सुनावणी घेऊन तक्रारींचा निपटारा

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- तक्रारदारांच्या तक्रारींचा निपटारा हा तक्रारदारांच्या समोर झाल्यास त्यांचेही विश्वासार्हता वाढीस लागते. मोर्चा, धरणे, उपोषण, आमरण उपोषण हे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अपेक्षित नाहीत. एकप्रकारे या राष्ट्रीय सणांचा अवमान केल्याचे हे द्योतक आहे. जिल्ह्यात लागू असलेली आचारसंहिता, जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

तक्रारदाराच्या मागण्यांमधील सत्यता पडताळून त्याचा वेळीच निपटारा करण्याच्यादृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. यात आज रोजी पर्यंत प्राप्त व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील उपोषण संदर्भाने आलेले 5 अर्ज जिल्हाधिकारी स्तरावरील 27 अर्ज, नांदेड जिल्ह्यातील आत्मदहन संदर्भाने आलेले 33 अर्ज व नांदेड शहरातील 7 अंदोलनाच्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यासाठी सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पाचारण केले होते. प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख व अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी झाल्यामुळे जलदगतीने निपटारा होऊ शकला याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समाधान व्यक्त केले. काही प्रकरणात जर संबंधित प्राधिकरणाबाबत काही तक्रार असल्यास संबंधीत प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अपील सादर केले जाऊ शकते, असे त्यांनी निर्देशीत केले.

 

जिल्ह्यात सध्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असून त्याअनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर सर्व संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कार्यासन यांनी अर्जदार, तक्रारदार यांच्या समवेत समन्वय साधून प्रकरणे तात्काळ निरसीत करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

000000



 वृत्त क्रमांक 35 

राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) प्रशांत दिग्रसकर होते. स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. 

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन दिनांक 21 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, लातूर उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी डी. व्ही. गडपल्लेवार, जागतीक पॅराबॅडमिंटन स्पर्धा पदक विजेती खेळाडू लताताई उमरेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जनार्धन गुपीले, सुरज सोनकांबळे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी डॉ.राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम बुडके, उद्योजक अमोल कदम, ऑल नांदेड जिल्हा वुशू असो. सचिव राजेश जांभळे, सहसचिव डॉ. प्रमोद वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातून 176 मुले, 144 मुली असे एकुण 320 व निवड समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक असे एकुण 350 ते 375 उपस्थित झाले आहेत. मुलांच्या खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास गुरुद्वारा परिसर नांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे. 

या स्पर्धेचे पंच म्हणुन वर्धा येथील प्रणव विटणकर, अभिषेक सोनावणे, निलेश राऊत,  मुंबईचे प्रकाश पगारे, दिनेश्‍ माळी, ठाणेचे साहिल भंडारी, कोल्हापूरचे शारुख अत्तार, अविनाश पाटील, औरंगाबादचे सदाम सय्यद, बंटी राठोड, जोहर अली, कृष्णा चव्हाण, नाशिकचे उमेश थोरे, नागपूरचे प्रफुल्ल गजबिये, गोंदियाचे संजय नागपुरे, निशाराणी पांडे, सोलापूरचे फुलचंद जावळे, माधव शेरीकर, नांदेडचे डॉ. प्रमोद वाघमारे, अक्षय जांभळे, प्रतीक्षा भगत, वाघमारे संदेश, अहमदनगरचे प्रविण थोरात आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी कलीमओददीन फारुखी, संजय गाडवे, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, राजेश जांभळे, सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो. डॉ. प्रमोद वाघमारे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, क्रीडा शिक्षक रवींद्र देशपांडे, एन. आर. पोटफोडे, सहशिक्षक जी. आर. कदम, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे, सुभाष धोंगडे, मोहन पवार, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठे व ऑल नांदेड जिल्हा वुशू असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि परिश्रम घेत आहेत.

0000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...