Wednesday, January 4, 2023

वृत्त क्रमांक 11

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज शंभर टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये / सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. या पंधरवडयात केलेल्या कार्यक्रमांचे अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.   

00000

 वृत्त क्रमांक 10 

तालुकास्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन 

समितीच्या बैठकीचे आयोजन 

लेखी स्वरुपात तक्रारी देण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयांमध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्ट कामकाजाबाबत काही निवेदने / तक्रारी असल्यास  किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यालयांमध्ये करण्यात येणाऱ्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या संबंधीत तहसिल कार्यालयाकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

शासन परिपत्रकान्वये सर्व तहसिल कार्यालयात तालुकास्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समिती गठीत करून सर्व तहसिल कार्यालयांनी बैठका आयोजित करावेत. या समितीची वर्षातून मार्च, जुन, सप्टेंबर व डिसेंबर या महिण्यामध्ये बैठक घेण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून संबंधीत नागरिकांना त्यांचे तक्रारी अर्ज सादर करणे सुलभ होईल. तसेच नगारिकांनी संबंधीत तहसिल कार्यालयात तक्रारी अर्ज सबळ पुराव्यासह सादर करणे आवश्यक आहे. 

कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल. या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून संबंधितावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 9

 धान / भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला दिली मुदतवाढ   

नांदेड (जिमाका) दि. 4 :- आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान / भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरु आहे. या ऑनलाईन नोंदणीला शनिवार 7 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

या नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात / बारा, बँक खात्याची साक्षांकित प्रत, आधार कार्डची प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन दरम्यानचा लाइव्ह छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 8

 लोकसेवा हक्क कायद्याची

प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

-  आयुक्त दिलीप शिंदे 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- शासकीय पातळीवरच्या सेवा या नागरिकांना वेळेत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा तयार करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या सेवा वेळेत मिळणे त्यांचा हक्क आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी नेहमी दक्ष राहून नाविण्यपूर्ण काम करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले.  

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकूळे यांची प्रत्यक्ष तर सर्व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.   

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या कायद्यातील सर्व विभागाच्या सेवा जनतेला पुरविणे बंधनकारक आहे. तालुका पातळीवरील सर्व यंत्रणानी या सेवा देतांना प्रलंबित प्रकरणे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रलंबित प्रकरणाचा निपटारा तात्काळ  करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे असेही आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले. या कायद्याची चांगल्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात येईल याची सुरुवात नांदेडपासून होईल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. तालुका पातळीवर यंत्रणानी आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा वेळोवेळी आढावा घेतल्यास अनेक प्रस्तावातील त्रुटी या कमी होती. यातून प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील सर्व सेवा 1 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या अधिनियमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राला त्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तसेच अनेक तृतीयपंथी यांची उपस्थिती होती.  

0000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...