Wednesday, September 28, 2016

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील
जागांच्या आरक्षणा बाबत बुधवारी सोडत कार्यक्रम
             नांदेड दि. 28 :-  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-2017 साठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने आरक्षणासाठी बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सोडत काढण्यात येणार आहे. 
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून ( सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) महिलांचे आरक्षण जागासाठींची ही सोडत जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्याबाबतीत  बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. तसेच पंचायत समिती निर्वाचक गणांच्याबाबतीत संबंधीत तालुक्याच्या मुख्यालयी 5 ऑक्टोंबर 2016 रोजी तहसिल कार्यालयामार्फत सोडतीने काढण्यात येणार आहे.
            याबाबतचा सविस्तर कार्यक्रम व तपशील जिल्हाधिकारी कार्यालय-नांदेड, सर्व तहसिल कार्यालये, जिल्हा परिषद-मुख्यालय नांदेड, पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस फलकावरही लावण्यात आलेला आहे. इच्छुकांनी या सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
            जिल्हा परिषद प्रारुप निवडणूक विभाग तसेच पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्विकारल्या जाणार आहेत, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी असेही आवाहनही करण्यात आले आहे. 

000000
उत्सव काळातील शांतता सुव्यवस्थेसाठी
पोलीस अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे अधिकार प्रदान
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शनिवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 12 ऑक्टोंबर 2016 या कालावधीमध्ये नवरात्र महोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना शनिवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 12 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत वरील कलमान्वये अधिकार प्रदान केला आहे. 
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
तसेच कोणीही इसमांनी हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चा, मिरवणूक, निर्देशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुक, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. हा आदेश संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 1 ते 12 ऑक्टोंबर 2016 पर्यंत लागू राहील.

0000000
 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोमवार 26 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...