Wednesday, November 9, 2016

नोटांच्या बदलाबाबत नागरिकांनी घाबरून
जाऊ नये , बँकांनी-यंत्रणांनी सेवा देण्यासाठी दक्ष रहावे
जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन , विविध यंत्रणांची बैठक
नांदेड , दि. 9 :- भारत सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केलेल्या आहेत. पण या नोटा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 च्या रात्री बारा वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार त्या स्विकारण्यात याव्यात व बँकांद्वारे या नोटा विहीत पद्धतीने बदलून देण्याची आणि रक्कम काढण्याबाबतही निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सामान्य नागरिकांची अडवणूक होऊ नये यासाठी या यंत्रणांनी काळजी घ्यावी. तर नागरिकांनीही घाबरून न जाता व कोणत्याही आमिष, अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या निर्देशानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध यंत्रणा, बँकांचे अधिकारी-प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. गुंटूरकर,  रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ तसेच पेट्रोप पंप चालक संघटनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 
बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या सर्व यंत्रणांना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्ष रहावे असे निर्देशित केले. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. अनावश्यकरित्या बँकामध्ये व्यवहारांसाठी गर्दी करू नये. रुग्णालये, औषध दुकाने, पेट्रोल-डिझेल आणि गॅस पंप, घरगुती गॅस, सरकारी बस सेवा, रेल्वे तिकीट, विमान तिकीट अशा विहीत केलेल्या विविध ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी इंधन व औषध खरेदी करताना, पाचशे व हजाराच्या पटीत करणे सोईस्कर ठरेल. इंधन व औषधांसाठी समन्वयाने सुट्ट्यांपैश्यांच्या उपलब्धतेबाबत मार्ग काढण्यात यावा. शुक्रवार 11 नोव्हेंबर नंतर मात्र या जीवनावश्यक सेवांच्या ठिकाणीही जुन्या नोटांचा वापर करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.
बैठकीत बँक तसेच उपस्थित विविध यंत्रणांना जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी येत्या दोन दिवसात काटेकोर काळजी घेण्यात यावी. पुरेसे कर्मचारी सेवा देतील व येणाऱ्या सामान्य नागरिकांचे पुर्ण समाधान होईल, अशी माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशाही सुचना करण्यात आल्या. जुन्या नोटा बँकांमधून बदलून देण्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे.तसेच व्यवहारांचा लेखा-जोखा असेल, तर अशा जुन्या नोटांच्या स्वरुपातील रक्कमा पुढे 30 डिसेंबर 2016 पर्यंत संबंधितांना खात्यात जमा करता येणार आहेत.
बँकामधून टप्प्या-टप्प्याने ग्राहक, खातेदारांना एटीएम व थेट बँकेतून रक्कमा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीही भारतीय रिझर्व बँकेने पद्धत विहीत करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजेपुरत्या रक्कम उपलब्ध होणार आहेत. पण अनावश्यकरित्या बँकेतून रक्कमा काढून घेण्यासाठी गर्दी करू नये. बँकांनी याबाबत ग्राहकांना-खातेदारांना माहिती द्यावी. मागणीनुसार चलन पुरवठ्यासाठी वेळीच कार्यवाही करावी, वरीष्ठ बँकांकडे सतत-संपर्क ठेवावा, असेही निर्देशित केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या दोन दिवसात बँकीग व्यवहाराबाबत दक्ष रहावे. कोणत्याही आमिषाला व अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत. घाई-गर्दी न करता व्यवहार करावेत. यामुळे चलन पुरवठ्याची परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी मदत होईल. जनतेने बँक यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून काळा पैसा आणि चलन व्यवहारातील गैरप्रकार निपटून काढून, राष्ट्र उभारणीत हातभार लागेल, असेही आवाहन केले आहे.

00000