फोटो कॅप्शन : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पशुप्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी डॉ शितल मुकणे, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे, राजकुमार पडिले, प्रवीण घुले, आदी उपस्थित होते.
Friday, December 19, 2025
वृत्त क्रमांक 1319
माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी या स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेत एक वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तसेच एक वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक असे दोन्ही पारितोषिके विनायक थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी पटकावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देवणी जातीची वैशिष्ट्ये, उत्तम बांधा, चांगले आरोग्य व शुद्ध वंश या गुणांच्या आधारे परीक्षकांनी या वळूंना विशेष गुण दिले.
या यशामुळे देवणी जातीच्या गोवंश संवर्धनाला चालना मिळाली असून परिसरातील
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळेगाव यात्रेतील या
पशुप्रदर्शन स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनाला नवी
दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या यशाबद्दल शेतकरी विनायक
श्रीमंतराव थोरात यांनी यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे पशुपालक, ग्रामस्थ तसेच
शेतकरी बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
मालेगाव यात्रा ही नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात खंडोबा देवाची मोठी यात्रा असते जी दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला भरते आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.
कोट
शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात
वळूची काळजी लहान मुलांप्रमाणे घ्यावी लागते. दररोज दोन वेळा शेंगदाण्याची
पेंड भिजवून द्यावी लागते. तसेच मका, ज्वारी-बाजरीचा भरडा, पौष्टिक खुराक आणि हिरवा चारा खाऊ घालावा लागतो. रोज सकाळी
व संध्याकाळी योग्य असा व्यायाम करून घ्यावा लागतो आणि स्वच्छतेची विशेष काळजी
घ्यावी लागते. दररोज शाम्पू व साबणाने नीट स्वच्छ करून घ्यावे लागते.
00000
वृत्त क्रमांक 1318
बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा
बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नांदेड, दि. १९ डिसेंबर :- जिल्हाधिकारी कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नांदेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत – १०० दिवसांचे अभियान अंतर्गत आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील सर्व शासकीय कार्यालये तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.
बालविवाह समूळ उच्चाटन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, बालविवाहामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शपथविधी कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके तसेच सर्व शाखांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच याच अनुषंगाने नांदेड शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्येही बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.
०००००
वृत्त क्रमांक 1317
नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी
नांदेड दि. 19 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच या मतदान असलेल्या क्षेत्रातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ. ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहिल असे नमूद केले आहे, अशी माहिती जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
0000
वृत्त क्रमांक 1316
प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड, दि. 19 डिसेंबर :- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी महानगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. याबाबत 15 डिसेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.
महानगपालिका निवडणूकीची प्रक्रीया, शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी, या दृष्टीकोनातून आंदोलन, मोर्चा, आमरण उपोषण, आत्मदहन इत्यादी कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व सद्या महानगरपालिका निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे 19 डिसेंबर 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 16 जानेवारी 2026 चे मध्यरात्रीपर्यत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नांदेड वाघाळा महानगर पालिका, तहसिल कार्यालय, नांदेड तसेच नांदेड शहरातील इतर शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणे परिसरात आंदोलन, मोर्चा, धरणे, आमरण उपोषण, आत्मदहन इत्यादी कार्यक्रमासाठी प्रतिबंधित आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमित केले आहेत.
00000
वृत्त क्रमांक 1315
शस्त्र परवाना नुतीनकरण करुन
घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. 19 डिसेंबर :- जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत
निर्गमित, अभिलेखात
नोंद असलेले शस्त्रपरवाने ज्याची
मुदत बुधवार 31 डिसेंबर 2025 रोजी
संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील
कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परवानाधारकाने पुढील कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण
करुन घेण्यासाठी नियमानुसार असलेले नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावे. आपले शस्त्रपरवान्यात नमुद
असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्यातील अर्ज, जन्म
तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार
कार्ड, एक
पासपोर्टफोटो व मुळ शस्त्रपरवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 23 डिसेंबर 2025 पासून
संबंधित विभागात दाखल करावा. नांदेड
जिल्हयातील शस्त्र परवाना धारक व सर्व
संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल
कर्डिले यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1314
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून वस्तुस्थितीचा खुलासा
नांदेड, दि. 19 डिसेंबर:- अलीकडच्या कालावधीत समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तींमार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबाबत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या माहितीतून महामंडळाची बदनामी होत असून मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.
राज्य शासनामार्फत विविध शासकीय विभाग, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद निश्चित केली जाते. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असून, त्याअंतर्गत प्रत्येक विभाग व महामंडळास वार्षिक इष्टांक (Targets) निश्चित करणे बंधनकारक असते.
राज्यातील इतर आर्थिक विकास महामंडळांप्रमाणेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फतही वार्षिक इष्टांक निश्चितीची कार्यवाही करण्यात येते. त्या इष्टांकाच्या मर्यादेतच वित्तीय दायित्व निर्माण करणे नियमानुसार आवश्यक आहे. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून काही नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिचे पालन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांवर बंधनकारक आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केवळ महानगरपालिका क्षेत्र तसेच निवडणुका प्रलंबित असलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या हद्दीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील इतर भागात पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
आदर्श आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रांमध्ये पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महामंडळाबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा अथवा चुकीच्या माहितीवर मराठा बांधवांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटिबद्ध असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
0000
वृत्त क्रमांक 1313
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश
नांदेड दि. 18 डिसेंबर : जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा मतदानाच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूकीची सर्व प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व मतदान केंद्र परिसरात 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
याबाबतचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील नप/नपं- धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा निवडणूक 2025 च्या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यन्त अंमलात राहणार आहे.
0000
वृत्त क्रमांक 1311
यळकोट यळकोट जय मल्हार.....!
देवस्वारी, खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ
हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन
नांदेड दि. 18 डिसेंबर :- "उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी" अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदा माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रति वर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी मानकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प. माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांची उपस्थिती होती.
मानकऱ्यांचा गौरव -पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे, आंबादास खंडेराव जहागीरदार या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने जोड आहेर, मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी -उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजूरी उत्तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यासोबत यात्रेत विविध साहित्य-सामानाचे दुकाने सजली आहेत. यामध्ये बैलाचा साज, पुजेचे साहित्यासह उंच उंच आकाश पाळणे, सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.
यंदा यात्रेत वाघ्या-मुरळी, पोतराज व डफवाल्यांच्या सहभागाने वातावरण भक्तीमय झाले होते. भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्लॅस्टिकमुक्त व स्वच्छ यात्रेचा संकल्प राबविला जात आहे. याबाबतचे चोख नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तगडी व्यवस्था, भाविकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही चोख नियोजन करण्यात आले आहे.
पालखी पुजनाच्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूर कुमार आंदेलवाड, शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह विविध विभागचे खाते प्रमुख, अधिकारी, यांची उपस्थिती होती. उद्या पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदशर्न व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1312
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
माळेगाव - शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माळेगाव येथे केले. ते माळेगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त नांदेड जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माजी जि. प.सभापती प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, शरद पवार, सुनिल नानवटे, पशुसवर्धन अधिकारी प्रविणकुमार घुले, रोहित पाटील, चद्रमुनी मस्के, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, माळेगाव यात्रेला विशेष महत्व असून, या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आपला देश कृषी प्रधान असून, शेतीमुळे अर्थ व्यवस्था बळकट होती. शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय कडे वळावे असे आवाहनही सहकार मंत्री ना. पाटील यांनी केले.
या कर्यक्रम चे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी डॉ.निलकुमार ऐतवडे यांनी केले.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या देवस्वारी व पालखीचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर, लोहा विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पूजन करुन सुरुवात करण्यात आली.
00000
वृत्त क्रमांक 1310
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी
नांदेड दि. 18 डिसेंबर:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी येथील क्ष-किरणशास्त्र विभागामध्ये अत्याधुनिक व उच्चक्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. याप्रगत वैद्यकीय सुविधेची काल 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
ही Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन अत्यंत जलद, अचूक व उच्च रिझोल्यूशन प्रतिमा देणारी असून अल्प वेळेत संपूर्ण शरीर तपासणी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. यामशीनच्या सहाय्याने मेंदूचे आजार, स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, अपघातातील अंतर्गत दुखापती तसेच छाती व पोटातील गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक व त्वरित निदान करणे शक्य होणार आहे.
आभासी ब्रॉन्कोस्कोपी या सुविधेमुळे फुफ्फुसातील अंतर्गत गाठीचे अचूक निदान करता येते. तसेच शरीरातील विविध प्रकारच्या गाठींची बायोप्सी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अन्न नलिकेतील आजारांचे निदान करण्यासाठी डायनॅमिक ओरल कॉन्ट्रास्ट अभ्यास ही तपासणी करून संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते.
अर्धांगवायूने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये मानेतील व मेंदूतील रक्तवाहिन्यांची तपासणी या यंत्रावर उपलब्ध आहे. अपघातग्रस्त रुग्णांच्या संपूर्ण शरीराचे सिटी स्कॅन करता येत असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निदान करून प्रभावी व तातडीची रुग्णसेवा देणे शक्य होते. तसेच पाठीच्या मणक्यांशी संबंधित विविध आजारांचे निदान देखील या यंत्रावर करता येते. या यंत्राद्वारे महिला रुग्णांच्या गर्भाशयाची पिशवी तसेच इतर अवयवांतील विविध आजारांचे अचूक निदान करण्यात येते. तसेच लहान मुलांमधील दुर्धर आजारांचे निदान सुद्धा या अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्यात येते.
या सिटी स्कॅन मशीनची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत : अत्यंत कमी वेळेत (हाय स्पीड स्कॅनिंग) तपासणी पूर्ण होणे, कमी किरणोत्सर्गात(Low Radiation Dose) उच्च दर्जाचे स्कॅन, 3D व 4D इमेजिंग सुविधेमुळे अधिक अचूक निदान, मेंदू, हृदय, फुफ्फुसे, पोट व संपूर्ण शरीराचे सविस्तर परीक्षण, अपघात ग्रस्त रुग्णांसाठी तातडीने संपूर्ण शरीराची सिटी स्कॅन सुविधा, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे (CT Coronary Angiography) अचूक परीक्षण तसेच बालरुग्ण व वृद्ध रुग्णांसाठी सुरक्षित तपासणी व्यवस्था. या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत सुलभता येऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून गंभीर रुग्णांचे तात्काळ व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात अशाप्रकारची उच्च क्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन एकमेव स्वरूपात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे उपलब्ध झाली असून याचा थेट लाभ जिल्ह्यातील तसेच परिसरातील हजारो रुग्णांना होणार आहे.
यापाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुग्णालयाच्या एकूण स्वच्छतेबाबत तसेच दैनंदिन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व रुग्णालय प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कापसे, विभागप्रमुख, क्ष-किरण शास्त्र डॉ. अमित पंचमहालकर, क्ष-किरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.अनिल तापडिया, सूक्ष्मजीवशास्त्र प्राध्यापक डॉ.एस.आर.मोरे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वैष्णवी कुलकर्णी, बालरोग प्राध्यापक डॉ. किशोर राठोड, औषधशास्त्र प्राध्यापक डॉ.कांतीलाल चंडालिया, डॉ.कपिल मोरे, डॉ.उबेदखान, सहयोगी प्राध्यापक (औषध वैद्यक शास्त्र) उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय वराडे, खुशाल विश्वासराव, संजय वाकडे, प्रशासकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील घुगे व डॉ. धनंजय मोरे व श्रीमती अलकनंदा कुलकर्णी, सहायक अधिसेविका, सतिश इंगळे, ग्रंथपाल यांचे सह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 1309
जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रम संपन्न
अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत जनजागृती
नांदेड, दि. १८ डिसेंबर : दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याक विकास विभागाचे परिपत्रक १० डिसेंबर २०२५ अन्वये जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म व परंपरा जतन व संवर्धन करण्याचा अधिकार असून, या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून नमस्ते नांदेडचे पत्रकार रोहन ऋषिकेश कोंडेकर मोहम्मद जिशान बेग (जनकल्याण सेवाभावी संस्था, मुखेड) तसेच रेह. मोझेस पॉल (अध्यक्ष, शालोम मिनिस्ट्री, नांदेड) यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी रोहन ऋषिकेश कोंडेकर यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ व १५ तसेच कलम ३०(१) यांचा उल्लेख करत अल्पसंख्याकांना समानता, भेदभावाविरुद्ध संरक्षण आणि शैक्षणिक संस्था स्थापन व व्यवस्थापनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
दुसरे व्याख्याते मोहम्मद जिशान बेग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारतातील लोकशाही मजबूत असून अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण मिळाल्याचे सांगितले. जाती व धर्माधारित भेदभाव कमी होत असून, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी रेह. मोझेस पॉल यांनी ‘अल्पसंख्याक म्हणजे कोण?’ याबाबत सविस्तर माहिती देत शिक्षणाचा अधिकार, सामाजिक समानता, धार्मिक स्वातंत्र्य व सांस्कृतिक जतन या विषयांवर भाष्य केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अल्पसंख्याक समुदायाला लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील सर्व धर्मीय नागरिक भारतीयत्वाच्या भावनेने एकत्र राहत असल्याचे सांगत, प्रसिद्ध शायर इकबाल यांच्या ओळींनी त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अर्जुन झाडे यांनी शासकीय योजनांचा लाभ अल्पसंख्याक समुदायातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. अल्पसंख्याकांमधील असुरक्षिततेची भावना दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अल्पसंख्याक समुदायाकडून सादर करण्यात आलेली निवेदने स्वीकारून ती शासनाकडे सादर करण्यात येतील, तसेच संबंधित अडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन प्रयत्न करेल, असे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
०००००
विशेष वृत्त क्र. 137 ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)