Tuesday, January 9, 2024

 वृत्त क्र. 31 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 9 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने नांदेड विमानतळ येथे दुपारी 1.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व हेलिकॉप्टरने पोफाळी हेलिपॅड जिल्हा यवतमाळकडे प्रयाण. सायं. वा. नांदेड विमानतळ येथे आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथून हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. 

00000  

वृत्त क्र. 30

 

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन

राज्य क्रीडा दिन म्हणून होणार साजरा

 

नांदेड (जिमाका), दि. 9 :- महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी 2024 हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सायं. 4 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, स्टेडियम परिसर, नांदेड येथे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळात सहभागी व राज्यभर क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 13 जानेवारी 2024 पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.  

 

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळाला. त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती. या अनुषंगाने राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचा शासन निर्णय 29 डिसेंबर 2023 अन्वये कळविले आहे.

0000  

वृत्त क्र. 29

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात

15 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 9 :- शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यत सहभागासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

या अभियानात 15 फेब्रुवारी 2024 पर्यत नोंदणी करावयाची असून या स्कुल पोर्टल लिंकवर https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 नोंदणी करावी. तसेच संदेश, कात्रणे, जाहिरात, व्हिडीओ शेअर करण्यासाठीची https://drive.google.com/drive/folders/1SLpCMNhoiOAlfeJZ6rYzSVaD9IVXTzHn?usp=sharing  या लिंकचा वापर करावा, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

 

जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा मध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या अभियानात सहभागी होता येईल.  तसेच शाळांना पुढील प्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण. शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग 40 गुण. सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मूल्यांकन, आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण 4 टप्पे अभियानाचे स्वरुप आहे.

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांना पुढील  प्रमाणे बक्षीसे आहेत. तालुकास्तर पहिले बक्षीस 3 लक्ष, दुसरे बक्षीस 2 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 1 लक्ष रुपये आहे. जिल्हास्तर पहिले बक्षीस 11 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 5 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 3 लक्ष रुपये. विभाग स्तर पहिले बक्षीस 21 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 11 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 7 लक्ष रुपये. राज्यस्तर पहिले बक्षीस 51 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 21 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 11 लक्ष रुपये आहे.

 राज्य स्तरावरील स्पर्धा प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल. जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असणार आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...