Wednesday, July 5, 2017

बचत ग्रंथालयाचा वर्धापन दिन संपन्न
        नांदेड दि. 5 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत ग्रंथालयाचा 11 वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी तथा बचत ग्रंथालयाचे उपाध्यक्ष जयराज कारभारी यांनी बचत ग्रंथालयाची वाटचाल विषद करुन वाचनाचे महत्व सांगितले. ग्रंथालयाचे जास्तीतजास्त संख्येने सभासद होण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य सदृढ ठेवावे. त्याचा सुयोग्य परिणाम कार्यालयीन व दैनंदिन जीवनावर होईल, असे सांगितले.  
            यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांनी डिप्रेशनवर मात करुन होमियोपॅथीद्वारे उपचार या विषयावर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रिती सुराणा यांनी दातांची काळजी कशी घ्यावी व त्यावर कसा उपचार करावा तसेच नैसर्गीक दात वाचवीने किती आवश्यक आहे आणि दात काढावेच लागली तर कसे उपचार घ्यावेत तसेच इम्प्लांट बद्दल सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दातांची मोफत तपासणी केली.
शासनाच्या धोरणानुसार एक तरी झाड लावणे या उपक्रमास अनुसरुन वर्धापन दिनानिमित्त उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना वृक्षारोपन करण्यासाठी रोपांचे वितरण उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरविंद नर्सीकर, महादेव किरवले, श्रीमती ज्योती पवार, श्रीमती उज्वला पांगरकर, उपकोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, संगणक कक्षाचे सुनिल पोटेकर, नायब तहसिलदार उर्मिला कुलकर्णी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बचत ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्रीमती हस्मीत कौर, आरती कोकुलवार यांनी केले तर आभार श्रीमती मिना सोलापुरे यांनी  मानले.

0000000
फिरत्या लोकन्यायालयात वाद मिटविण्याचे आवाहन    
नांदेड दि. 5 :-  छोटया-छोटया गोष्टींमुळे होणारे वाद वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित ठेवून  वेळ वाया घालवता पक्षकारांनी या फिरत्या लोकन्यायालयात आपले आपसातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले.
फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे करण्यात आले.  
प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतील फिरत्या लोकन्यायालयाच्या वाहनाचे उद्घाटनानंतर जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर न्यायालयातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे या फिरत्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती.
यावेळी जिल्हा न्यायाधीश  एस. आर. जगताप, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी.वसावे, जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे यांनी या फिरत्या लोकन्यायालयाचा र्वीचा अनुभव सांगितला. तसेच यापुढेही पक्षकारांनी फिरत्या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. वसावे यांनी फिरते लोकन्यायालयाची कायदे विषयक शिबीराची संकल्पना, महत्व, उद्देश व त्यामागची भुमिका सांगितली.  
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये 5 ते 30 जुलै 2017 या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक तालुक्याकाही गावामध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व तळागाळापर्यंच्या नागरिकांना या फिरत्या लोकन्यायालयाचलाभ घेता यावा या हेतने ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
सुत्रसंचलन जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. तोडकर यांनी केले तर अॅड. नय्युम खान पठाण, यांनी  आभार  मानले.  यावेळी जिल्हा न्यायालयातील  न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के.आवटे तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ, पक्षकार मोठया ख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमानंतर  जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व न्यायधीश, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, अॅड. आर. जी. परळकर इतर ज्येष्ठ विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.

00000
शेतकऱ्यांना गावातच पीक विमा
भरण्याची सोय ; 31 जुलै अंतिम मुदत
        नांदेड दि. 5 :- प्रधानमंत्री पक विमा योजना सन 2017-18 अंतर्गत खरीप हंगामातील विविध पिकांचा पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी बँकेमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभ व्हावे म्हणुन यावर्षी प्रथमच कॉमन सर्व्हीस सेंटर (सी.एस.सी.) मध्ये गाव पातळीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधामुळे शेतक-यांना गावातच पीक विमा भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पीक विमा भरण्यासाठी सोमवार 31 जुलै 2017 ही अंतिम तारीख असून जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. . एस. मोटे यांनी केले आहे.  
नांदेड जिल्हयात एकुण 1 हजार 700 सी.एस.सी. केंद्र उपलब्ध आहेत. या व्यतिरीक्त ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार (महा ई-सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्र) अंतर्गत सुध्दा शेतकऱ्यांना पक विमा भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. बँकेच्या व्यतिरीक्त ही सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, पीकपेरा, 7/12, नमुना 8-, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांची पुर्तता करुन विमा हप्त्याची रक्कम रोखीने भरुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी कसल्याही प्रकारची अतिरीक्त शुल्क सुविधा केंद्रास देण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा हप्ता भरणा केल्यावर त्या रक्कमेची पावती जागेवरच देण्यात येणार आहे. ही सुविधा आधार लिंक असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वत: पीक विमा भरण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

000000
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
नवीन अभ्यासक्रम आवश्यक - प्राचार्य पोपळे 
नांदेड दि. 5 :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन अभ्यासक्रम आवश्यक अस विद्यार्थ्यांना आधुनिक गरजेवर आधारित शिक्षण देवून विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सक्षम दर्जेदार अभियंता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रकाश पोपळे यांनी केले.   
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून लागू केलेल्या नवीन अभ्यासक्रमाची (आयस्कीम) माहिती प्रथम वर्षाच्या संबंधित अधिव्याख्यात्यांना होण्याच्या दृष्टीकोनातून एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनावरुन प्राचार्य पोपळे हे बोलत होते. 
प्रशिक्षणात शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर येथील प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. एच. पी. तासकर यांनी नवीन अभ्यासक्रमाबाबतची सामाजिक तांत्रिक मानसिकता, त्याचे विविध पैलू आवश्यकता याबाबत दृष्यश्राव्य पद्धतीने विश्लेषन केले. हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतनचे यंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. एस. एच. काद्री यांनी नवीन अभ्याक्रमाबाबत आपले विचार मांडले.
प्रास्ताविकाशैक्षणिक समन्वय प्रा. सुहास कुलकर्णी यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी शिक्षकांच्या योगदानाचे महत्व विषद केले. प्रशिक्षणास नांदेड, परभणी हिंगोली जिल्हयातील शासकीय खाजगी तंत्रनिकेतन येथील 77 अधिव्याख्यात्यांनी सहभाग नोंदवला.
सुत्रसंचालन डॉ. संतोष चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुहास कुलकर्णी, डॉ. संतोष चौधरी, प्रा. संतोष मुधोळकर, सुकुमार कासार, गणेश नंदे, श्री.कासारपेठकर, श्री. सोनवणे, श्री. राहुल पोहरे,श्री. हुरदुके,श्री. बोडावार, श्री. झडते यांनी संयोजन केले.

000000
शेतकऱ्यांना पीक कर्जाकरीता येणाऱ्या
अडचणीबाबत नांदेड तालुकास्तरीय समिती स्थापन
नांदेड , दि. 5 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम-2017 साठीच्या पीक कर्जाकरीता येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करणे व आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सुचनेनुसार नांदेड तालुकास्तरीय समन्वय समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधीत तालुक्याचे तहसिलदार हे आहेत. तर उप / सहाय्यक निबंधक, गटविकास अधिकारी , तालुका कृषि अधिकारी, बीएलबीसी समन्वय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरिक्षक हे या समितीचे सदस्य आहेत.  
समितीची सभा दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत तहसिल कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. यावेळेत कर्ज वाटपासंबंधी अडचणी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे सात/बारा, आठ-अ, चर्तु: सिमा, नकाशा, जि.म.स. बँकेचे नादेय प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समन्वय समितीची राहणार आहे. तहसिलदार नांदेड यांनी तालुक्यातील सर्व मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी या संबंधाने एक-एक मदत केंद्र स्थापन करण्याबाबत सर्व मंडळ अधिकारी यांना दि. 17 जुन 2017 रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर मदत केंद्र कार्यरत आहे.
राज्य शासनाच्या दि. 6 जुन 2017 रोजीच्या सुलभ पीक कर्ज अभियान-2017 च्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच  दि. 28 जुन 2017 रोजी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 या कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड तालुकास्तरीय समन्वय समिती तथा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड ता. नांदेड यांनी केले आहे.

000000
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नांदेड , दि. 5 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, तसेच आऊट ऑफ टर्न परीक्षा पुढील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षा- मंगळवार 18 जुलै 2017 ते बुधवार 2 ऑगस्ट 2017. प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा, दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यानुभव विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा- सोमवार 10 जुलै 2017 ते 17 जुलै 2017. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा- सोमवार 17 जुलै 2017. आऊट ऑफ टर्न परीक्षा- गुरुवार 3 ऑगस्ट 2017 याप्रमाणे परीक्षा कालावधी राहील.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. विभागीय मंडळाने छपाई केलेल्या व माध्यमिक शाळा यांचेमार्फत वितरीत केलेल्या अधिकृत वेळापत्रकावरुन विद्यार्थ्यांनी खात्री करुन घ्यावी व परीक्षेस प्रविष्ट व्हावे. खाजगी व्यक्ती, खाजगी क्लासेस, अन्य यंत्रणनेने, अन्य संकेतस्थळावरील किंवा जाहिरातीसाठी छपाई केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी अवलंबुन राहु नये. खाजगी यंत्रणेने छपाई केलेल्या जाहिरातीशी अथवा वेळापत्रकाशी मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे परीक्षेपुर्वी मंडळाने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अनाधिकृतरित्या खाजगी यंत्रणेमार्फत प्रसिद्ध केलेल्या चुकीच्या वेळापत्रकामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावे, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव यांच्यावतीने विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...