Saturday, August 12, 2017

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड, दि. 13 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 16 ऑगस्ट 2017 रोजी उदगीर येथुन शासकीय मोटारीने दुपारी 2.15 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. मुखेड येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती. सायं. 4 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथुन लातुरकडे प्रयाण.

0000000
बाल हक्क संरक्षण आयोगाचे
अध्यक्ष प्रविण घुगे यांचा दौरा
 नांदेड दि. 13 :-  राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे हे सोमवार 14 ऑगस्ट 2017 रोजी माहूर व किनवट येथील आदिवासी आश्रमशाळांना भेट देतील. शासकीय विश्रामगृह माहूर येथे राखीव.

                                                                    00000
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 70  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 15 ऑगस्ट, 2017  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

0000000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

                                                                    00000
शिधापत्रिका धारकांनी स्मार्ट कार्डसाठी
रास्तभाव दुकानदाराकडे अर्ज करावीत  
नांदेड दि. 13 :- धान्य मिळणाऱ्या व न मिळणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनी स्मार्ट कार्डसाठी वार्डातील रास्‍तभाव दुकानदाराकडे अर्ज करावीत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
नांदेड तालुक्यातील सर्व शिधापत्रिकांची ऑनलाईन नोदणी सुरु आहे. नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका मिळणार असुन जुनी शिधापत्रिका बंद होणार आहे. शिधापत्रिकाधारकांना स्‍मार्टकार्ड देण्यात येणार आहे. या स्‍मार्ट शिधापत्रिका घेऊन शिधावाटप दुकानात त्‍या स्‍वाईप करुन धान्य मिळवता येणार आहे. सर्व शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी झाली असुन नवीन वर्षी नागरिकांना या स्‍मार्ट शिधापत्रिका मिळणार आहेत. यामुळे धान्याचा काळाबाजार रोखला जाऊ शकणार आहे. डॉक्‍टर, व्यापारी, कर्मचारी, मजूर व इतर सर्व ज्‍यांचेकडे शिधापत्रिका आहेत त्यांनी डिजीटल स्‍मार्ट कार्ड शिधापत्रिकेसाठी अर्ज करावेत.
यामुळे धान्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी स्‍मार्ट कार्ड शिधापत्रिकाचे रुपांतरणाची प्रक्रिया पुर्ण होत आहे.  स्‍मार्ट कार्ड योजनेचे लाभ पुढील प्रमाणे आहे. लाभार्थ्‍यांनाच धान्य मिळेल, धान्याचा काळा बाजार रोखला जाऊ शकेल, नोंद ऑनलाईन असेल त्‍यामुळे लाभार्थी कुटूंबाला धान्य मिळाले की नाही त्‍याची नोंद पुरवठा विभागाकडे राहणार आहे.
स्‍मार्ट शिधापत्रिका पुढील प्रमाणे राहतील. स्मार्ट शिधापत्रिका एटीएमकार्डाच्‍या आकराच्‍या असतील आणि पाकिटात बसतील. त्‍या टिकाऊ असणार आहेत. अनेकदा शिधापत्रिका फाटतात, त्‍यांची पाने गहाळ होतात आणि मग अनेक समस्या निर्माण होतात त्‍या त्रासापासून मुक्‍तता होणार आहे.
             स्‍मार्ट शिधापत्रिकेसाठी आवश्‍यक कागदपत्रे पुढील प्रमाणे.  कुटूंब प्रमुख महिला यांचा विहीत नमुन्यातील अर्ज, कुटूंब प्रमुख याचे आई-वडिलाचे नाव अर्जामध्‍ये असणे आवश्‍यक, कुटूंब प्रमुख व कूटूंबातील सर्व सदस्यांचे आई-वडिलाचे नाव असणे आवश्‍यक, कुटूंब प्रमुख व कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची छायांकीत प्रत, जुने राशनकार्ड असल्‍यास त्‍याची छायांकीत प्रत, कुटूंब प्रमुखाचे बॅंकेचे पासबूकची छायांकीत प्रत, गॅस जोडणी असल्‍यास गॅस पासबूकची छायांकीत प्रत, वास्‍तव्याचा पुरावा (लाईबिल, घरपट्टी, निवडणूक ओळख पत्र इतर),
  स्‍मार्ट कार्ड शिधापत्रिकेसाठी अर्ज दाखल कोठे करावे. स्‍मार्ट कार्डसाठी पिवळी रंगाची शिधापत्रिका, केशरी रंगाची शिधापत्रि‍का व शुभ्र रंगाची शिधापत्रिका या सर्व शिधापत्रिका धारकांनी स्‍मार्ट कार्डसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करावे. स्‍मार्ट कार्डचा अर्जाचा नमुना आपल्‍या वार्डतील रास्‍तभाव दुकानदारांकडे मिळतील. आपल्‍या वार्डतील रास्‍तभाव दुकानदारांमार्फत अर्ज स्विकारण्‍यात येतील, अशी माहिती तहसिलदार नांदेड यांनी दिली आहे.

000000
महात्मा फुले विकास महामंडळाच्या
कर्ज योजनेसाठी आवाहन  
नांदेड दि. 13 :-  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून चालु वर्षात 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेसाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांनी कर्जासाठी स्वत:चा ईमेल वापरुन ऑनलाईन पद्धतीने 16 ऑगस्ट 2017 ते 15 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी 14 ऑक्टोंबर 2017 पर्यंत कर्ज मागणी अर्जाची मुळप्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग ग्यानमातासामोर, नांदेड येथे स्वत: सादर करावीत. इतर व्यक्तींकडून अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत, असेही आवाहन येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000000
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी
नवीन पोर्टलवर नोंदणी करावी
 नांदेड दि. 13 :- जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी MahaDBT या नवीन पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आ. ब. कुंभारगावे, समाज कल्याण अधिकारी, जि. प. नांदेड यांनी केले आहे.
नोंदणीसाठी आधार क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी व शिष्यवृत्ती खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. इयत्ता 9 वी व दहावीतील अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना जातीचा दाखला हा जेपीजी, पीएनजी, टीआयएफएफ, पीडीएफ या फाईलमध्ये स्कॅन करुन अपलोड करावा. फाईलची साई 256 केबी पेक्षा कमी असावी. शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणाऱ्या सुचना मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत देण्यात याव्यात, असेही आवाहन केले आहे.

000000
फटाका व्यापारी वेलफेअर संस्थेच्या
सभासदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 13 :- फटाका व्यापारी वेलफेअर असोसिएशन नांदेड (नोंदणी क्र. 10261) या संस्थेत कोणीही सभासद नसल्यामुळे व न्यासाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी नवीन सभासदाची निवड  करण्यासाठी संस्थेचे सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी बुधवार 30 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंजुषा अलोने यांनी केले आहे.
संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्रात पुढील प्रमाणे राहील. सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. त्याला संस्थेचे उद्देश व नियमावली मान्य असावी. आजीवन सभासद होण्यासाठी सभासद शुल्क 101 रुपये राहील. साधारण सभासद एका वर्षासाठी शुल्क 51 रुपये राहील. या अटी पुर्ण करुन सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज 14 ते 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जिजामाता पब्लिक ट्रस्ट , चौधरी पेट्रोल पंपाजवळ, नांदेड येथे सादर करावा. सभासद अर्ज मंजुर झालेल्या सभासदांनी त्यांना लेखी सुचना मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत सभासद शुल्क सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड या कार्यालयात भरावे, असेही आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नांदेड विभाग, नांदेड यांनी केले आहे.

0000000
सोयाबीन, कपाशीवरील
किड नियंत्रणासाठी कृषि संदेश
 नांदेड दि. 13 :-  सोयाबीनवरील उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी निबोंळी अर्क 5 टक्के अधिक प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फरमनट्रप्स एकरी 5 लावावेत. अझाडिरॅक्टिन 1 हजार 500 पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाणी क्विनॉलफॉस 20 इसी सी 25 मिली प्रती दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी ॲसिफेट 50 टक्के ईमिडाक्लोप्रीड 1.8 एस.पी. 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
मुदत बाहय बियाणे विक्रीमुळे
कृषि केंद्राचा परवाना निलंबीत
           नांदेड दि. 13 :- कोथिंबीरचे मुदत बाहय बियाण्याची विक्री करुन पावतीवर अंतिम मुदत दर्शविल्यामुळे बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विकास कार्यालयाने अर्धापूर येथील सदगुरु ग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत केला आहे.

अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील अवधुत राऊत यांच्या तक्रारीवरुन बियाणे निरिक्षक तथा कृषि अधिकारी श्रीमती जी. डी. स्वामी यांनी चौकशी केली. त्यानंतर बियाणे परवाना निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकाबाबत तक्रारी असल्यास प्रत्यक्ष, दुरध्वनी 02462-230123, ईमेल, एसएमएस तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000, भरारी पथकाच्या फ्लेक्सवरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.                       00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...