Sunday, October 3, 2021

  नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीस कळवावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर 

नांदेड,दि.29:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमूळे नुकसानग्रस्त झाल्यामूळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. 

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे. पीक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी. 

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करु शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

0000

 

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्व 411 मतदान केंद्रावर आरोग्य सेवकाची नेमणूक

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 29 : देगलूर (90) राखीव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोवीड- 19 च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून 411 मतदान केंद्रावर आरोग्य सेवकाची नेमणूक करुन योग्य ती खबरदारी घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली. 

या पोट निवडणूकीच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. देगलूर मतदार संघातील सर्व संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी या बैठकीत दुरदृश्य प्रणालीव्दारे सहभाग घेतला. 

मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे थर्मल स्कॅनिंग तपासणी करुन त्यांना मतदान करण्यास अनुमती देण्यात येईल. तसेच कोरोना नियम पाळणे सर्वासाठी बंधनकारक असून सुरक्षित अंतर ठेवणे , सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारके आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रीयेसाठी जवळपास साडेतीन हजार अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ लागणार आहे. तालुकास्तरावर सर्व ग्रामसेवक तलाठी यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. पोटनिवडणुकीसाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे त्या सर्वांनी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. नांदेड जिल्ह्यात 3 लाख लसीचे डोस प्राप्त झाले असून या दृष्टीने लसीकरणाला गती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नामनिर्देश पत्र देगलूर येथे भरावे

देगलूर पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्राबाबतची कार्यवाही देगलूर तहसील कार्यालयात केली जाईल. नामनिर्देश पत्र भरण्यासाठी तीन वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. या निवडणूकीत स्टार कॅम्पेनर यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त हजार व्यक्तीना अथवा ज्या ठिकाणी सभा घेतली जाईल त्या जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के एवढयाच लोकांना अनूमती असेल. रोड शो किंवा दुचाकी रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन ज्यात सीयू 968, बीयू 1206 आणि व्हीव्हीपट 993 उपलब्ध करण्यात आले आहे. मतदान केंद्रामध्ये मुख्य मतदान केंद्र 340 तर सहायक मतदार केंद्र 65 असे 411 मतदान केंद्र असतील. निवडणुक आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली असून आचारसंहितेचा भंग कोणीही करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.

0000

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 4 ऑक्टोंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा, या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 3 ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 15 लाख 42 हजार 646 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचासाठा पुढील प्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 13 लाख 11 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 21 हजार 280 डोस याप्रमाणे एकुण 16 लाख 32 हजार 310 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 

 

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 781 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 327 एवढी झाली असून यातील 87 हजार 659 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 16 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये अँटिजेन तपासणीद्वारे भोकर तालुक्यांतर्गत 1  बाधित आढळला आहे. 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 16 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 35 हजार 210

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 31 हजार 787

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 327

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 659

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये आझादी का अमृत महोत्सव  विधी सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यत नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 2 ऑक्टोंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा न्यायालय नांदेड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते पार पडले. जिल्हयातील सर्व तालुका विधी सेवा समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रॅली काढून व पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. 

यावेळी  जिल्हा न्यायाधीश-2 एस. ई. बांगर, जिल्हा सरकारी वकिल आशिष गोदमगावकर, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलिंद लाठकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव राजेंद्र रोटे, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल विधीज्ञ, विधी स्वयंसेवक, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या विभाग प्रमुख श्रीमती उशा सरोदे, डॉ. घनश्याम येळणे, एम. एस. डब्ल्यूचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीकांत आणेकर यांनी गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र रोटे यांनी केले तर सुत्रसंचालन रिटेनर लॉयर नय्युमखान पठाण यांनी केले. यावेळी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम एस डब्ल्यू शाखेच्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक विषयावर पथनाटय सादर केले. त्यानंतर जिल्हा न्यायालय नांदेड येथून रॅलीचे आयोजन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0000000

 देगलूर विधानसभा  पोटनिवडणूकीसाठी

माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 1 : विधानसभा सदस्य रावसाहेब जयंता अंतापूरकर  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ९०- देगलूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेकरिता पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोट निवडणूकीचे मतदान ३० ऑक्टोबर २०२१ (शनिवार ) रोजी व मतमोजणी २ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार) रोजी होणार आहे. यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राधिकार पत्रांसाठी १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत शिफारस पत्रे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे सादर करावीत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या निवडणूकीच्या मतदान, मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोटनिवडणूकीच्या प्राधिकारपत्रांसाठी आपल नावे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र दोन प्रतींसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे १३ ऑक्टोबर २०२१पर्यंत पर्यंत पाठवावीत.

प्रत्येक शिफारस पत्रासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र असणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीला  दोन्ही केंद्रात (मतदान व मतमोजणी ) प्रवेश हवा असल्यास तीन प्रतींसह सादर करावीत. छायाचित्रांच्या छायांकित प्रती स्विकारल्या जाणार नाहीत. प्राधिकारपत्रे द्यावयाच्या व्यक्तींची संख्या मर्यादित असावी अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

                  00000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...