Saturday, September 16, 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
पालकमंत्री खोतकर यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न
नांदेड दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.  

ध्वजवंदनापूर्वी पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, आमदार सर्वश्री अमर राजुरकर, हेमंत पाटील, डी. पी. सावंत, आमदार सौ. अमिता चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, आदींनी पुष्पअर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सहदेव पोकळे यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले. व्यंकटेश चौधरी, स्नेहलता स्वामी, मुगाजी काकडे यांनी समारंभाचे सुत्रसंचलन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                 

000000
कृषि कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची 22 सप्टेंबर मुदत
आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार
नांदेड, दि. 16 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना 2017 या योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी  ऑनलाईज अर्ज  भरण्‍याची मुदत शुक्रवार 22 सप्‍टेबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीच्‍या आत शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यावर आधार कार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
आजपर्यंत जिल्‍ह्यात एकुण 2 लाख 59 हजार 259 शेतकरी कुटूंबाचे ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले आहेत.  या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्‍हा पातळीवर समीत्या गठीत केलेल्‍या आहेत. ज्‍या शेतक-यांना ऑनलाईन अर्ज भरण्‍यासाठी अडचणी येत असल्‍यास त्‍यांनी तहसिलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. शासनाने आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्‍या  शेतक-यांची गावनिहाय याद्या उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत. कर्जमाफीमध्‍ये आपले नाव ऑनलाईन यादीत आहे की नाही हे पाहण्‍यासाठी लिंक http://csmssy.in या संकेतस्‍थळावर जावून खात्री करावी. आधारकार्ड नसले तरी नोंदणी करता येणार असून नोंदणी झाल्यावर आधारकार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. बोटाचे ठसे जुळत नसल्यास त्यांचे मोबाईल नंबर आधारकार्डला जोडल्यास OTP  प्राप्त होईल नाव नोंदणी करता येईल. यातही अडचण आल्यास डोळयाचे बुबुळ रेटिना जुळवता येईल किंवा शेवटचा पर्याय म्हणून आधारकार्ड नसल्याचे नोंदवून लॉगईन करावे, मतदान ओळखपत्र, वयाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडून नाव नोंदणी करु शकतात  असेही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी कळविले आहे.

00000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
आज पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंद
नांदेड, दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार 17 सप्टेंबर 2017 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री र्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तत्पुर्वी सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.   
या समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
वृत्त क्र. 864        
सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- केंद्र शासन पुरस्कृत सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज मंजुरीसाठी सोमवार 30 ऑक्टोंबर 2017 व नुतनीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.  
 तसेच नुतनीकरण अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात सीडीसह हार्डकॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावी. ऑफलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ऑनलाईन अर्ज सोमवार 30 ऑक्टोंबर 2017 पर्यंत तर नुतनीकरणाचे अर्ज शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत संबंधीत विद्यार्थ्यांनी भरावीत.
नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान अनुदानीत, विना अनुदानीत, कायम विनाअनुदानीत, महाविद्यालय तसेच व्यवसायिक महाविद्यालयात सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी / मार्च 2017 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्ता यादीत टॉपच्या 20 विद्यार्थ्यांना तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंटरल सेक्टर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी नुतनीकरण-1 व नुतनीकरण-2  या पद्धतीने सादर करावीत. तसेच नुतनीकरण-3 व नुतनीकरण-4 अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात सीडीसह हार्ड कॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावीत.
00000


गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध
एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची जिल्ह्यात पहिली कारवाई
शासनाकडून जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचे आदेश कायम
नांदेड, दि. 16 :-नांदेड शहरातील विक्रम उर्फ जुगनु बालाजी ठाकुर याने त्याच्या साथीदारांसह स्वत:जवळ जीवघेणी हत्यारे बाळगुन गंभीर गुन्हे करुन हैदोस घातला होता. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एमपीडीए अंतर्गत जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी विक्रम उर्फ जुगनु यास स्थानबद्ध करुन तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणात शासनाकडून चौकशीअंती जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश कायम केले आहेत. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015 ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील इतवारा भागातील चिराग गल्लीत राहणारा विक्रम उर्फ जुगनु बालाजी ठाकुर वय 28 वर्ष याने त्याच्या साथीदारांसह स्वत:जवळ तलवार, चाकु, खंजर व दगड यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दगडफेक, बेकायदा गर्दी करणे आणि घातक शस्त्राने दुखापत, गंभीर दुखापत यासारखे गंभीर गुन्हे करुन हैदोस घातला होता. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणण्याचा बऱ्याचवेळा प्रयत्न केला आहे. त्याच्या विरोधात तक्रार देण्यास कुणीही समोर येत नसल्याने परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवीतास, मालमत्तेस देखीली शाश्वत धोका बनला होता. त्यामुळे त्याला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याने आरोपीच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस विभागाकडून मागवून घेण्यात आला होता. त्यानंतर जिल्हादंडाधिकारी यांनी विक्रम उर्फ जुगनु या आरोपीला स्थानबद्ध करुन तुरुंगात टाकले. या प्रकरणात शासनाने संपुर्ण चौकशी करुन जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचे आदेश कायम केले आहेत.  

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...