Friday, July 13, 2018


जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत
चार एकर क्षेत्रावर वृक्षारोपण
           
नांदेड दि. 13 :- बिलोली तालुक्यातील कार्ला फाटा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय जवळील चार एकर पडीत क्षेत्रावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह वनविभाग, संस्कृती संवर्धन मंडळ संस्था, अधिकारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सगरोळी (ता.बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेने पुढाकार घेतला होता. 
कार्ला फाटा येथील नूतन  प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ चार  एकर क्षेत्रावर काटेरी  झुडपांचे जंगल तयार झाले होते. तेलंगाना सिमेवरील नांदेड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले हे ठिकाण विद्रूप दिसत होते. संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या लक्षात येताच संस्थेने जागेची सफाई व वृक्ष लागवड करून सुशोभीकरण करण्याचे ठरविले होते त्यानुसार कदंब, महागणी, तबेबिया, टेकुमा, बोगनवेलिया आदी चारशे सुशोभित वृक्षांची लागवड करण्यात आली. संस्थेच्या शिवाजी हायस्कूल मधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला होता.
संस्थेचे माजी विद्यार्थी आत्माराम चिगळे व गुरुद्वारा बोर्डाने झाडे उपलब्ध करून दिली. काटेरी झुडपे काढणे, जागेचे सपाटीकरण व खड्डे आदी कामे संस्थेने केली आहेत. कार्ला खुर्द ग्रामपंचायतीने पुढील तीन वर्ष वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.  
संस्कृती संवर्धन मंडळातर्फे घेण्यात आलेला हा  उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी परिसरातील नागरिकांनी हा उपक्रम स्वतःच्या गावचा समजून वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी उपवनसंरक्षक आशिष  ठाकरे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपविभागिय अधिकारी कोळी, तहसिलदार श्रीकांत गायकवाड, जि.प.सदस्य प्रतिनिधी गणेश पाटिल शिंपाळकर, पंचायत समितीचे .उपसभापती दत्तराम बोधने, बिलोलीचे उपनगराध्य पटाईत, महावितरणचे  अभियंता बोधनकर,  उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, कार्यकारी अभियंता जि.प.रायबोगे, तालुका कृषी अधिकारी घुगे, गटविकास अधिकारी यु.डी.रहाटीकर, नायब तहसीलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गौंड, लागवड अधिकारी जाधव, वनपरिक्षेञ अधिकारी एस.बि.कोळी, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, किरण देशमुख, राजेंद्र पाटील कार्लेकर, व्यंकट सिध्दनोड आदी उपस्थित होते. 
000000



जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते
शेडनेट मधील भाजीपाला रोपावाटीकेचे उद्घाटन
संस्कृति संवर्धन मंडळातील विविध उपक्रमांची पाहणी
नांदेड दि. 13 :- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील नुकत्याच उभारण्यात आलेल्या शेडनेट वरील भाजीपाला रोपवाटीकेचे उद्घाटन केले. यावेळी डोंगरे यांनी संस्थेतील विविध उपक्रमाची पाहणी करून वृक्षारोपण केले.  
कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बागवानी मिशन अंतर्गत शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेट मध्ये केंद्रामार्फत विविध भाजीपाला रोपांची निर्मिती करण्यात येणार असून ही रोपे शेतकऱ्यांना मागणीप्रमाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीतील आर्थिक  नुकसान टाळण्यासाठी शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळत आहेत. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. कृषी विज्ञान केंद्राकडे दरवर्षी शेतकऱ्यांची भाजीपाला रोपांची मागणी वाढत असून शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विविध भाजीपाल्यांच्या एकाचवेळी साधारण दीड ते दोनलाख रोपांची निर्मिती होणार असून  या उपक्रमातून निरोगी व सदृढ भाजीपाला  रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपांची मागणी केंद्राकडे नोंदवू शकतात असे केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्ता मेहत्रे यांनी सांगितले.  जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. 
सीताफळ प्रक्षेत्राची पाहणी व वृक्षारोपण
कृषी विज्ञान केंद्राने हलक्या जमिनीवर इतर पिकांऐवजी कोरडवाहू फळबागेस प्राधान्य देण्यासाठी दहा एकर प्रक्षेत्रात सीताफळाची लागवड केली आहे. चार ते साडेचार हजार सीताफळ झाडांची लागवड करण्यात आली असून चार ते पाच वर्ष वयाची झाडे आहेत. दरवर्षी उत्पादन होणाऱ्या सिताफळावर प्रक्रिया करण्याची व्यवस्थाही उभी केली आहे. यामाध्यमातून सीताफळ विक्रीसह सीताफळाचा गर विकला जातो त्यामुळे अधिक आर्थिक उत्पन्न होण्यास मदत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या व्यवस्थेची पाहणी करून शेतकऱ्यांना अधिकाधिक  कोरडवाहू फळबाग लागवडीस प्रवृत्त करावे असे केंद्रास सुचविले. शिंपाळा येथील नवीन तलाव परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
000000



"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" योजनेंतर्गत बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे गाळ काढलेल्या तलावाचे जलपूजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी, तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायब तहसीलदार संजय नागमवाड, उपकार्यकरी अभियंता श्री गुंडरे, लोहगावचे उपसरपंच नाना राखे, अनुलोमचे विजय मोरगुलवार, पांडुरंग बुद्धेवार आदी उपस्थित होते.
( छाया : विजय होकर्णे, नांदेड )




मोटार सायकलसाठी नवीन मालिका  
  नांदेड, दि. 13 :- मोटार सायकलसाठी एमएच 26- बीएल ही नवीन मालिका रविवार 15जुलै 2018 पासून सुरु होत आहे. पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज 15 जुलै 2018 पासून स्विकारण्यात येणार आहेत. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 5.03 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात शुक्रवार 13 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.03 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 80.46 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 353.34 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 37.21 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 13 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 1.38 (403.43), मुदखेड- 6.33 (521.34), अर्धापूर- 3.33 (362.67), भोकर- 9.25 (514.25), उमरी- 6.00 (365.31), कंधार- 4.00 (334.83), लोहा- 2.00 (343.98), किनवट- 5.43 (344.27), माहूर-7.25 (437.25), हदगाव- 8.29 (493.45), हिमायतनगर- 6.67 (474.69), देगलूर- 1.83 (133.50), बिलोली- 6.60 (220.60), धर्माबाद- 4.33 (253.32), नायगाव- 6.20 (268.00), मुखेड- 1.57 (182.54). आज अखेर पावसाची सरासरी 353.34 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5653.43) मिलीमीटर आहे.  
00000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन
  नांदेड, दि. 13 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 16 जुलै 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यानुसार सोमवार 16 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी केले आहे.
00000


नोंदणी विवाहासाठी
ऑनलाईन नोटीस बंधनकारक
1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी
नांदेड, दि. 13 :- विशेष विवाह कायदा 1954 नुसार नोंदणी विवाह करणाऱ्या वर-वधू यांना बुधवार 1 ऑगस्ट 2018 पासून विवाहाची नोटीस, वय व रहिवास या पुराव्याच्या कागदपत्रांसह ऑनलाईन देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एन्ट्री करण्यामध्ये पक्षकारांचा वेळ जाऊ नये व त्यामध्ये चुका होऊ नयेत याकरिता नागरिकांना त्यांची डाटा एंट्री करण्याची सुविधा विभागाने http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एच. एस. उजगिरे यांनी दिली आहे.  
विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छूक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहिवास यासाठीच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह संबधित जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना सादर करावी लागते आणि नोटीस फी भरावी लागते.
सदर वर-वधू संबंधित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी सदर नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावतात. तसेच वर किंवा वधू या दोघांपैकी एकजण अन्य जिल्ह्यातील असल्यास या नोटीसीची एक प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते.
विवाह अधिकारी यांचेकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत नियोजित विवाहबद्दल आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या 60 दिवसात वर-वधू 3 साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यासमोर हजर राहतात व विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देतात.
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई, मुंबई उपनगर  व पुणे या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत.
विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे देखील संगणकीकरण केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आलेली आहेत.
विशेष विवाह नोंदणीकरीता वर व वधू यांना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे व तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पूर्ण करता येईल अशी व्यवस्था दिनांक 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठीची लिंक देखील विभागाच्या http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यवस्थेचा / सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टिने संबंधीत विवाह निबंधक कार्यालयांमध्ये सूचना फलक लावण्यात आले आहेत.
ऑनलाईन नोटीसच्या जनजागरणाचा भाग म्हणून पुणे येथील विवाह निबंधक कार्यालयाच्या परिसरात विभागाने नागरिकांकरिता ऑनलाईन नोटीस सुविधेच्या वापरासाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य मार्गदर्शक ऑपरेटरसह मोफत उपलब्ध ठेवले आहे. तसेच 1 ऑगस्ट 2018 पासून विशेष विवाहासाठीची नोटीस ऑनलाईन देणे बंधनकारक करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...