Saturday, March 31, 2018


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 31 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथून मोटारीने नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेही आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, दक्षीण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. त्रिकालज्ञे राभा, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आदींची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांचे शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.
000000


Friday, March 30, 2018


कंधार ऊर्ससाठी 3 एप्रिल
ऐवजी 4 एप्रिलला स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 30 :- यापुर्वी कंधार ऊर्ससाठी मंगळवार 3 एप्रिल 2018 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी बुधवार 4 एप्रिल 2018 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यापुर्वीच्या अधिसुचनेतील दिलेल्या सोमवार 23 जुलै 2018 रोजी आषाढी एकादशी ( पंढरपूर यात्रा ) आणि मंगळवार 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दशी या दोन सुट्ट्यांच्या तारखा त्याच राहतील, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. हा सुधारीत आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही शुद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड, दि. 30 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 31 मार्च 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 31 मार्च 2018 रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 9.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. रात्री 9.25 वा. विमानाने मुंबई प्रयाण करतील.
000000


नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप
ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती
- अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 30 :- शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेऊन त्यांचा उत्पादीत माल खरेदी करुन शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती ग्राहकांमध्ये आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले.  
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेवतीने 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजित नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज विविध शेतकऱ्यांचा सन्मान करुन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते.      
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, कृषी महोत्सवात उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करुन शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना योग्य किंमतीत माल विक्री केला आहे. यामुळे शहरी ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना, कष्ट पोहचले आहेत. महोत्सवात कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात घेऊन त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना दयावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लोहा तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झिरो बजेट नैसर्गीक शेतीची माहिती देऊन शासनाने शेततळे दिल्यामुळे कोरडवाहू शेतीतून बागायत शेतीकडे वळता आल्याने शेतीत यशस्वी झाल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी कृषि महोत्सवात नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी व ग्राहकांनी सहभाग घेतल्याचे सांगून उत्पादीत शेतमाल विक्रीची सरासरी 67 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांबरोबर मार्केटींग तंत्रज्ञान शिकायला मिळाल्याचे, सांगितले.
यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीमध्ये उल्लेखनी अशी कामगिरी केलेले शेतकरी प्रतिक शिंदे, भागवत शिंदे, सुनिल मोरे, अर्जुन राऊत, भिमराव सोनटक्के, माधव सुर्यवंशी, विश्वनाथ होळगे, शशीकुमार पत्की, उमेश मामीडवार, कबीरदास कदम, संताजी वटाणे, नारायण पाटील, विजय ठाकरे, संदीप धडलवार, असलम पठाण यांना तर शेतकरी बचतगटात ओंकारेश्वर शेतकरी बचत गट भोगाव, पद्मश्री कदम शेतकरी गट धानोरा, जय आंबिका महिला शेतकरी गट तामसा, बलराम ग्रुप ॲण्ड फार्मस क्लब देगलूर, हरीतक्रांती शेतकरी गट बिलोली रुद्रापूर यांना प्रमाणपत्र देऊन उत्स्फूर्त गौरव करण्यात आला. तसेच 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि महोत्सवात स्टॉल लाऊन शेतीमाल उत्पादनाची विक्री व मार्गदर्शन केलेल्या सहभागींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  
सुरुवातीला कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांचेवतीने हळद लागवड तंत्रज्ञान, केळी लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ट्रायकोडमी, माती परिक्षण घडीपत्रिकेचे तसेच एकरी शंभर टन ऊस उत्पादन, आधुनिक शेती पालन, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी एक दृष्टिक्षेप या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक विजयकुमार भरगंडे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले. नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कृषि व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा दौरा
नांदेड, दि. 30 :-  केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 31 मार्च 2018 रोजी लातूर येथून वाहनाने रात्री 9.15 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे
जिल्ह्यात 22 एप्रिलला आयोजन
नांदेड, दि. 30 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड  यांच्याकडून रविवार 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी, चेक बाऊंसची (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी, भुसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार, मनपा,गरपालिका, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, टेलीफोन कंपन्यांची प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, म.न.पा. अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधित सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढुन आपला पैसा, वेळ वाचवावा व या राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या रूपाने चालून आलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश  सुधीर पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकन्यायालयातील यश पाहता यावेळी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालया ठेवावीत. यासाठी कुठलही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपसातील वाद मिटवून या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असेही आवाहान श्री. वसावे यांनी केले आहे.
000000

Thursday, March 29, 2018


हिरवळी, जैविक खताची योग्य सांगड
रासायनिक खताशी केल्यास उत्पन्नात वाढ
- प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड
नांदेड दि. 30 :- जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यात हिरवळी व जैविक खताची योग्य सांगड रासायनिक खताशी केल्यास हमखास उत्पन्नात वाढ होते, असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड यांनी केले.   
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवात गुरुवार 29 मार्च रोजीच्या चर्चासत्रात "सुधारीत ऊस लागवड तंत्रज्ञान" या विषयावर कळंब तालुक्यातील शिरपूर येथील प्रगतशील श्री आव्हाड हे मार्गदशन करतांना बोलत होते.
प्रगतशील शेतकरी श्री आव्हाड यांनी एकरी 110 टन ऊस उत्पादन घेतल्याचे स्वताचा अनुभव शास्त्रोद्योत पद्धतीने शेतकऱ्यास सांगितला. ऊस पीकावरील पंचसुत्रीची सविस्तर माहिती देताना सुपीकत, हंगाम  लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा वापर, किड रोग व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली. कृषि महोत्सवास ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला शेतमालास पसंती देऊन खरेदी केली. अशी माहिती नांदेडचे प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दिली.
00000

Wednesday, March 28, 2018


जिल्हा कृषि महोत्सवाचे 30 मार्च पर्यंत आयोजन  
शेतकरी, ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट द्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 28 :- जिल्हा कृषि महोत्सवास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट देऊन विविध धान्य, कृषि उत्पादने खरेदी करुन कृषि विषयक विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान व परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान येथे जिल्हा कृषि महोत्सव शुक्रवार 30 मार्च पर्यंत आयोजित केला आहे. या महोत्सवास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी जिल्हाधिकारी जयराम कारभारी यांनी सपत्नीक भेट दिली. त्यांनी विविध स्टॉलाची पाहणी करुन शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करुन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हा कृषि महोत्सवामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. मंगळवार 27 मार्च अखेर धान्य महोत्सवा गहू, तुरडाळ, मुगडाळ, तीळ, जवस, मका, टरबुज, आवळा ज्युस, सेंद्रीय गुळ, टाळकी ज्वारी, हरभरा, कडकनाथ कोंबडया व अंडी विक्रीतून 2 लाख 50  हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. तर 26 27 मार्च अखेर 5 हजारापेक्षा जास्त शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली प्रक्रियायुक्त उत्पादने, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनीचे दालने, औजारे, मशिनरी, यंत्रसामग्री, खते, औषधी, बियाणे, सिंचन साधने यांची विशेष दालने, सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. उत्पादक ते ग्राहक अशी मध्यस्थाविना येथे विक्री होत आहे.
कृषि महोत्सवात कृषि विभाग, पणन, मार्केटिंग, महाबीज, वनविभाग, रेशीम, जिल्हा उद्योग केंद्र, पुरवठा, आधार कार्ड नोंदणी, कृषि विज्ञान केंद्र, जैविक किड नियंत्रण, मृद चाचणी, शासकीय फळरोप वाटीका, जिल्हा परिषद मधील कृषि विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग, मतदान नोंदणी आदी विभागांचे दालने उभारले आहेत. कृषि महोत्सवात प्रवेश विनामुल्य असून शेतकरी, ग्राहक व नागरिकांनी कृषि महोत्सवातील प्रदर्शनास भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे.
00000



इंग्रजी माध्यमाच्या नामांकित
निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2017-18 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशसाठी इच्छूक पालकाकडून रविवार 1 एप्रिल ते 20 मे 2018 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज शासकीय अनुदानीत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घेऊन त्यांच्याकडेच परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमती पत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला अंगणवाडी / सरपंच / ग्रामसेवक यांचा शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. 
 विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सकयांनी दिलेले वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. विधवा, निराधार, परित्यक्ता यांचेसाठी शंभर रुपये बॉन्ड पेपरवर नोटरीसह दयावे लागेल. घटस्फोटीता  करीता कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
 विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत शंभर रुपये बॉन्ड पेपरवर पालकानी लेख दयावे लागेल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 24 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

Tuesday, March 27, 2018


एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी    
कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 27 :- बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात एमएचटी-सीईटी परीक्षा महत्वाची असून परीक्षेचे काम सुव्यवस्थीत नियोजनानुसार व चोखरितीने पार पाडण्यासाठी कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
एमएचटी-सीईटी परीक्षा गुरुवार 10 मे 2018 रोजी  नांदेड शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. या परीक्षेचे काम चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा परीक्षेचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश पोपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, महावितरणचे कार्यकारी अभियंता एन. के. ठाकरे, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, परीक्षेचे उपजिल्हा समन्वय अधिकारी डी. एम. लोकमनवार, पोलीस निरीक्षक पी. जी. देशपांडे, तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर,  गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एस. आर. कोकणे, शासकीय तंत्रनिकेतनेचे सर्व जिल्हा संपर्क अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कार्यपालन अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, परीक्षेच्यावेळी मोबाईल व तत्सम साहित्य विद्यार्थ्यांनी घेऊन येऊ नये. त्यासाठी प्रत्येक केंद्राच्या गेटवर तपासणी करुन विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात सोडण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत हेल्पलाईन सेवा सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.  
एमएचटी-सीईटी परीक्षेची विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत असून नव्याने कृषि शास्त्र अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश एमएचटी-सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा नांदेड जिल्ह्यात 22 टक्के विद्यार्थी आजपर्यंत वाढण्यात आले आहेत. परिक्षेसाठी नियुक्त कर्मचारी/अधिकारी यांचे  मानधन हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहे. त्यामुळे त्यांना बँक खात्याची सविस्तर माहिती  पहिल्या परिक्षणाच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी कार्यपालन अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश व पुरेसा पोलीस बंदोबस्त (महिला पोलीसांसह) लावावा. परीक्षेचे महत्वाचे साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविणे. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टंकलेखन संस्था, एसटीडी केंद्र बंद ठेवणे तसेच मोबाईल यंत्र व शिघ्र संचाराची साधने नेण्यास प्रतिबंध करणे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षेचे साहित्य मुंबई येथे पोलीस संरक्षणासह पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परीक्षेचे गोपनीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर विभागातील चारही जिल्हा केंद्राचे जिल्हा संपर्क अधिकारी यांना सुपूर्द करणे. परीक्षा संपल्यानंतर गोपनीय साहित्य जमा करण्याबाबत सुचना देण्यात आली.  परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  परीक्षेच्या दिवशी परीक्षा उपकेंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांची भोजनाची व्यवस्था, परीक्षेचे पेपर्स आणण्यासाठी व परत पोचविण्याची व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करण्यात आली. गोपनीय साहित्य स्ट्रांग रुममध्ये जमा करुन घेण्याबाबत, सिलबंद पेट्या परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आदेशित केले. परीक्षेसाठी उपकेंद्र म्हणून निवड झालेल्या शाळा, महाविद्यालय प्राचार्य, मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे सूचना. परीक्षा उपकेंद्रावर आरोग्य पथक आवश्यक साहित्यासह नेमणूक करणे. परीक्षा कालावधीत परीक्षा उपकेंद्रावरील विद्युत वितरण खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा उपकेंद्राचे अंतर लक्षात घेऊन शहरात जादा सिटी बसची व्यवस्था करावी. जेणेकरुन सर्व परीक्षार्थी यांना वेळेवर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे शक्य होईल, अशीही सुचना देण्यात आली.   
00000


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 27 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव ( राज्यमंत्री दर्जा ) मधुकरराव कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 28 मार्च 2018 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यासमवेत बैठक व राखीव. दुपारी 4.30 वा. नांदेड येथुन कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.
0000000

दिव्यांग व्यक्तींनी मतदानासाठी जागरुक रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- दिव्यांग व्यक्तींनी मनातील उदाशीनता दूर करुन मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानासाठी जागरुक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे, दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर चर्चासत्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिलीप कच्छवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात जिल्हा समाज कल्याण अधिकारी आ. व. कुंभारगावे, नायब तहसिलदार डी. एन. शास्त्री, गजानन नांदगावकर, स्नेहलता स्वामी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. डी. शेवाळे, जे. व्ही. रायेवार, के. टी. कणे, बी. के. आडेपवार, अर्चना बियाणी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. हर्षवर्धन सोनकांबळे, जिल्हा आरोग्य कार्यालयाचे डॉ. एस. व्ही. फुलवरे आदीने सहभाग घेतला होता.
यावेळी दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविणे. त्यांना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी व्हिलचेअर, रॅम्प व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले. शासकीय अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात सहभागी करण्यात येणार नाही त्याबाबत संबंधीत विभागांना निर्देश देण्यात येतील. ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराची जास्त संख्या असेल तेथे विशेष लक्ष देऊन सुविधा देण्यात येतील. दिव्यांग मतदारांची मतदार नोंदणी अर्जात दिव्यांग म्हणून नोंदणी होते. जिल्ह्यात सरासरी 35 हजार दिव्यांग पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी होणे असल्याची माहिती देण्यात आली. मतिमंद मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. 90 ते 100 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी पोस्टल मतदान किंवा  मोबाईल मतदान केंद्राद्वारे सुविधा देण्याची सुचना सहभागींनी मांडली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 18 वर्षावरील पात्र दिव्यांग मतदारांची मतदान टक्केवारी वाढून त्यांचेतील उदाशीनता दूर करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी व मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या विविध सोई-सुविधा विषयी सहभागींनी उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
000000



लोकशाही दिनाचे
2 एप्रिल रोजी आयोजन
नांदेड, दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 एप्रिल 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 27 मार्च पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 मार्च 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 26 एप्रिल 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000

Monday, March 26, 2018

युवा प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याचे

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन

नांदेड दि. 26 :- युवाच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल नांदेड येथे जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्हयातील पात्र युवक-युवतीनी आपली नावे विहित नमुन्यात क्रीडा कार्यालयास बुधवार 28 मार्च 2018 रोजी सकाळी 11 पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

भारत हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. युवा हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक असून समाजाच्या व देशाच्या विकास प्रक्रियेत युवांचा सक्रीय सहीभाग व युवांचे सक्षमीकरण होण्याची गरज आहे. युवामंध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, कौशल्यांचा विकास, स्मरणशक्तीचे नियोजन, समाजिक जाणीवेचे भान असणे आवश्यक आहे. आजच्या जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी युवा सक्षमीकरणाची गरज लक्षात घेवून राज्य शासनाने राज्याचे पहिले स्वतंत्र युवा धोरण सन 2012 मध्ये जाहीर केले आहे.

सामाजीक निर्णय प्रक्रिया, संघटनात्मक नियोजन व शैक्षणिक सुधारणा हे युवा सक्षमीकरणाचे प्रमुख घटक आहेत. व्यक्तिमत्व विकास, प्रशिक्षण व कौशल्य विकास, स्वयंरोजगार, राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संरक्षण, संविधानाप्रती आदर, युवांचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करुन आदर्श युवक व युवा नेतृत्व निर्माण करण्यासाठी तसेच युवांच्या सर्वांगीण विकास व्हावा हा मुख्य उद्देश घेऊन 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल, नांदेड येथे जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबीरचे आयोजन करण्यात आलेला आहे.

या प्रशिक्षण केंद्राच्यावतीने युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयावरील दहा दिवसाच्या प्रशिक्षणात तज्ज्ञचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरासाठी 15 ते 22 व 23 ते 29 या वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी 22 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व नेहरु युवा केंद्राकडे नेहरु युवा कर्मी, राष्ट्रीय सेवा योजनेचे 2 कॅम्प पुर्ण केलेले विद्यार्थी युवक-युवती, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी युवक युवती, एम.एस.डब्ल्यू, एम.ए.सायकॉलॉजी, एम.ए.सोशियालॉजी इत्यादी शिक्षण घेत असलेले युवक युवती, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा व महिला मंडळे इत्यादीकडून सामाजिक कार्यात रस घेणारे व आवड असणारे युवक-युवती यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हयातील पात्रता धारण करणा-या युवकांना शिबिरासाठी बोलावण्यात येणार आहे.

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभानिमित 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल नांदेड येथे निश्चित केले आहे. या प्रशिक्षणात सामाजिक विकासात युवांची भुमिका, युवकांपुढील आव्हाणे, राज्याचे युवा धोरण-2012, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी विषयावर चर्चा तसेच तज्ज्ञ व्यक्तिकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी उपस्थित युवकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...