Tuesday, March 29, 2022

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 620 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली असून यातील 1 लाख 103 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकुण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 96 हजार 5

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 76 हजार 47

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 103

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-09

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000 


 तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त

मतदार नोंदणीचे विशेष शिबीर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून 31 मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयाच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तेंव्हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळखदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तृतीय पंथीयासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थानी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष शिबिरात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यात 27 मार्च ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत तर उर्वरित महाराष्ट्रात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिर राबविली जाणार आहेत. तृतीय पंथीयाकडे आवश्यक कागदपत्रे असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देवू केली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल तर त्यांच्या गुरु मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत:चे वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास ग्राह्य धरले जाते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तींच्या नावे सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.

00000



 

जागरूक लोकसहभाग हाच

ग्रामीण भागाच्या विकासाचा मूलमंत्र  

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- लोकसहभाग हा कोणत्याही गावाच्या विकासाचा आत्मा असतो. या मूलमंत्रावर शेंबोली येथील नागरिकांनी विकास कामांना गुणात्मक दर्जा बहाल केला आहे. शासनाचा विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी अधिकाधिक सदउपयोगात, दर्जेदार कामात कसा उपयोगी आणावा याचे उत्तम उदाहरण म्हणून शेंबोलीकडे पाहता येईल, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेंबोलीकरांचा गौरव केला. 

मुदखेड तालुक्यातील मुगट, शेंबोली येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर राजूरकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर, आनंद बोंढारकर, अरुणाताई कल्याणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेंबोली गावातील सिमेंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. ग्रामपंचायत असलेल्या गावात एवढ्या गुणात्तमक दर्जाचा चांगला रस्ता होऊ शकतो, यावर विश्वास बसणार नाही. या गावात जवळपास 20 लाख रुपये लोकवर्गणी करुन बौद्ध विहार साकारला जातो, ही बाब सुद्धा तेवढीच भूषणावह असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून दोन्ही कामांच्या गुत्तेदारांचा गौरव केला. ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष भेटून त्यांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या नजरेतील विकासाच्या गरजा समजून घेणे याला मी अधिक प्राधान्य देत आलो आहे. मुदखेड, भोकर व नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात पांदण रस्त्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या चर्चेतूनच समोर आला. या प्रश्नांवर आपण जिल्हा पातळीवर एक स्वतंत्र मोहिम राबवून जिल्हा प्रशानातर्फे गती दिली. अजूनही बऱ्याच भागात शेतीकडे जाणारे लहान पांदण रस्ते होणे आवश्यक असून त्यासाठी ग्रामविकास विभाग व इतर विभागांशी चर्चा करून अधिकचा निधी कसा उपलब्ध होईल याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.   

नांदेड जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आपण मोठ्या प्रमाणात निर्माण करीत आहोत. भोकर-मुदखेड मार्गाने दोन्ही तालुके अधिक जवळ आले आहेत. आजवर दूर्लेक्षीत असलेल्या अनेक विकास योजना आपण हाती घेतल्या. जवळपास 20 कोटी 66 लक्ष रुपये एकट्या शेंबोली गावासाठी आपण मंजूर केले. आज एकुण 7 कोटी 41 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन केले. 13 कोटी 25 लाख रुपयांची कामे पुढच्या टप्प्यात आपण हाती घेणार आहोत. शेंबोली येथे जलव्यवस्थापनाच्यादृष्टिने पुलाच्या ठिकाणीच बंधाऱ्याच्या स्वरुपात काही करता येते का याचेही आम्ही पडताळणी करू पाहू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागासाठी रस्ता, आरोग्य, दिवाबत्ती, पाणी हे कळीचे प्रश्न असतात. ग्रामपंचायतीने त्यांच्या पातळीवर या मूलभूत प्रश्नांसाठी योग्य व्यवस्थापन करणेही आवश्यक राहते. ग्रामीण भागातील या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात ग्रामपातळीपर्यंत भक्कम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. या समवेत पुढील 25 वर्षात गावनिहाय असणारी लोकसंख्या लक्षात घेता किती पाणी लागेल याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून विकासाची कोणतेही कसर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मुदखेड तालुक्यातील मुगट-रोहिपिंपळगाव रस्त्यावर दोन लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-डोंगरगाव-निवघा-खांबाळा-मुगट-धनज या मार्गावर लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-चितगिरी रस्त्यावर शेंबोली गावाजवळ मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकामांचा शुभारंभ आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...