Thursday, September 6, 2018


विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश असलेला
लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित
मुंबई, दि. 6 : लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. 
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, संपादक सुरेश वांदिले,‍ विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके, वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहाय्यक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.
या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षी, शैक्षणिक क्रांतिचे जनक, गाव तेथे शाळा, सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
00000


गुरुवारी दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 6 :-जिल्ह्यात व शहरात गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. त्याअर्थी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर- 2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

‘राष्ट्रीय पोषण महिना’ विशेष लेख क्र. 1 : -


राष्ट्रीय पोषण महिनाविशेष लेख क्र. 1 : -

आहारात हवीत पोषणमुल्ये..
दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहिम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्व सांगणारा हा लेख ...

अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, उर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एका प्रौढ व्यक्तीला साधारणत: 3000 उष्मांक लागतात. त्याच्या आहारात 90 ग्रॅम प्रथिने, 90 ग्रॅम स्निग्ध द्रव्य व 450 ग्रॅम पिष्टमय पदार्थ (1:1:5) हे प्रमाण असावे. त्यात एकदल 400 ग्रॅम धान्य, 85 ग्रॅम द्विदल धान्य, पालेभाज्या 115 ग्रॅम, इतर भाज्या 85 ग्रॅम, कंदभाज्या 85 ग्रॅम, फळे 85 ग्रॅम, दुध दही 285 ग्रॅम, मांसाहार 125 ग्रॅम, साखर / गुळ 60 ग्रॅम, तेल-तूप 60 ग्रॅम अशा अन्नाचा समावेश केला तर पुरेशी जीवनसत्वे व खनिजे उपलब्ध होतात.

पण सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या जेवणांत कार्बोदकांचे प्रमाण जास्त असून इतर घटक त्या मानाने कमी पडतात. साधारणपणे घरात 4 माणसे असली की एक पाव किंवा अर्धा किलोग्रॅम पालेभाजी आणली जाते. पण मग ती शिजून अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी होते. घरातील 4 माणसांनी खाऊन उरली की ती उरलेली भाजी शिळी झाली म्हणून टाकून दिली जाते. पण एका प्रौढ व्यक्तीने अंदाजे 125 ग्रॅम पालेभाजी खावी तर त्यातले पौष्टिक घटक मिळू शकतात, पण आपण मात्र शिजून 1 पाव झालेली भाजी 4 लोक वाटून खातो. मग आवश्यक तेवढे पोषण घटक कसे मिळतील? त्याशिवाय कंदभाजी, दुध, तूप, मांसाहार या बाबीचा समावेशसुध्दा आपल्या रोजच्या आहारात व्हायला हवा.

आहारातील पोषणमुल्यांची कमतरता आणि आरोग्य :-
आहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे. बरेचसे आजार, व्याधी, विकृती याचे मूळ कारण अयोग्य आहार हेच आहे. लहान मुलांच्या शारिरीक आणि बौध्दिक वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. प्रथिनांच्या अभावाने मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. क्रॉशियाक्रॉर आजारात अंगावर सूज येते. केस लालसर सोनेरी दिसतात व कमजोर होऊन तुटतात, त्वचा कोरडी व शुष्क पडते, डायरिया होतो. रक्तक्षय होतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. उष्मांकांच्या कमतरतेने मॅरॅामस होतो. त्यात वजन कमी होऊन हातापायाच्या काड्या होतात. मुल चिडचिडे होते.

गरोदरपणात प्रथिने कमी पडली तर वारंवार गर्भपात होतो. अपूर्ण दिवसांचे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते, मृत मूल जन्माला येऊ शकते. विपरीत परिणामांबरोबर रक्तक्षय यामुळे गर्भाच्या मेंदूची वाढ बरोबर होत नाही. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रोटीन्सच्या कमतरतेने वजन कमी होणे, अंगावर सूज येणे, पोटात पाणी होणे असे दुष्परिणाम दिसू श्कतात.

स्निग्ध पदार्थांच्या अभावाने त्वचा कोरडी होते, वजन कमी होते, मेंदूचा ऱ्हास होतो. जीवनसत्त्वांच्या अभावाने शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. अ व्हिटामीनच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, डोळ्याच्या पांढऱ्या भागात तिळासारखा डाग दिसणे, दृष्टी गामवणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होते. ड व्हिटामीनच्या कमतरतेने मूडदूस होतो. कॅल्शियम आणि फॉस्फोरसच्या कमतरतेने हाडे ठिसूळ होतात. हाडांच्या विविध समस्या उद्भवतात. ब व्हिटामीनच्या कमतरतेने बेरीबेरी आजार होतो, त्यात मेंदूकार्यात दोष निर्माण होतो, स्मरणशक्ती कमी होते, भूक लागत नाही, पचन नीट होत नाही. ब व्हिटामीनच्या कमतरतेने वरचेवर तोंड येते, जीभ लाल होते, अन्नपचन नीट होत नाही, त्वचेचे विकार होतात. ब 6 व्हिटामीनच्या कमतरतेने pellagra नावाचा  आजार होतो. त्वचा शुष्क होते, मानसिक बदल होतो. क व्हिटामीनच्या कमतरतेने स्कर्व्ही नावाचा आजार होतो, त्यात हिरड्यांमधून रक्त येणे, सांध्यांना सूज येणे असा त्रास होतो. लोहाच्या कमतरतेने रक्तक्षय होतो. एकाग्रता कमी होते, धाप लागते. आयोडिनच्या कमतरतेने गलगंड होऊ शकतो.

आहाराचे नियोजन :-
पदार्थांचा रंग, पोत, चव, आकार यालाही महत्त्व आहे. एकाच जेवणात या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांचे आयोजन करताना त्यांचे रंगही लक्षात घ्यावे. जसे पांढरा भात, पिवळे वरण, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी, रंगीत कोशिंबीर, पिवळी कढी इत्यादी. पातळ, घट्ट, मऊ कुरकुरीत असे पदार्थ आहारात असावेत. पातळ वरण, घट्ट फळभाजी, मऊ भात, पोळी, भाकरी, कुरकुरीत पापड इत्यादी.

अन्न शिजविण्याच्या विविध पध्दतींचा वापर करावा. जसे भाजलेली पोळी, तळलेली पुरी, उकळलेला भात, वाफवलेली इडली. आंबट, गोड, तिखट अशा चवीचे पदार्थ एकाच जेवणात असावे. ताटातील संपूर्ण पदार्थापैकी काही सौम्य, मध्यम व काही तीव्र चवीचे असावे. म्हणजे सौम्य मसाले भात, मध्यम भाजी आणि तीव्र चटणी.
विविध अन्नपदार्थ शिजविण्याच्या पध्दतीचा वापर करत असताना खाद्य पदार्थांतील पोषक तत्त्वांचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळे यांची उपलब्धता विशेष असते. त्यामुळे ज्या ऋतूत ज्या भाज्या आणि जी फळे मिळतील त्यांचा आहारात उपयोग करावा. संपूर्ण दिवसातील आहारामध्ये विविधता असावी. सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, सायंकाळची न्याहरी आणि रात्रीच्या जेवणाचा विचार होणे आवश्यक आहे.
तीव्र मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण ते पचनेंद्रियांना बाधक ठरतात. घरात वृध्द माणसे व लहान मुले असतील त्यांचा विचार करुन आहाराचे नियोजन करावे. रोजच्या आहारातून कमी खर्चात जास्तीत जास्त पोषकमुल्ये मिळविणे शक्य आहे. आहार तोच, पण ज्ञान आणि कौशल्याचा वापर केला तर आपण योग्य पोषण मिळवू शकतो.

काही दक्षता
तांदूळ, डाळ जास्त वेळा धुऊ नये. कारण त्यातील पौष्टिक घटक वाहून जातात. शिजताना भाताचे पाणी काढून फेकू नये. बरेच लोक पुलाव, बिर्यानी मोकळी होण्यासाठी तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून ते पाणी फेकून देतात, पण त्यामुळे पौष्टिक मुल्यांचा ऱ्हास होतो. भाजी कापण्याआधी धुऊन निथळून घ्यावी. कापून धुतली असता अन्नसत्त्वे पाण्याबरोबर नाश पावतात. दोन्ही वेळच्या जेवणात एक वाटीभर वरण असावे. वरण किंवा आमटी करतांना एक डाळ वापरण्याऐवजी दोन, तीन डाळी मिसळून करावी. रोजच्या आहारात वेगवेगळया प्रकाराच्या भाकरी घ्याव्यात. कधी ज्वारी, कधी बाजरी कधी नाचणीची भाकरी बनवावी.

-     डॉ. स्वाती घोडमारे,
      प्रभारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी,
      पोषाहार विभाग, नागपूर
००००


लोहा तालुका समन्‍वय समितीची
बैठक 10 सप्‍टेंबर रोजी 
नांदेड, दि. 6 :- लोहा तालुका समन्‍वय समितीची बैठक 10 सप्‍टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता लोहा तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजीत करण्‍यात आली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या उपस्थितीत आयोजीत या बैठकीस लोहा-कंधार तालुक्‍यातील सर्व संबंधीत विभाग प्रमुख यांनी अदयावत माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
लोहा तालुका समन्‍वय समितीची सदर बैठक समितीचे अध्‍यक्ष गणेशराव सावळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणार असून समितीचे सर्व सन्‍माननीय सदस्‍य उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्व संबंधीत विभाग प्रमुख यांनी अदयावत माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश तहसीलदार श्री. परळीकर यांनी केले आहे.
00000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 6 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 सप्टेंबर 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
0000


स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोर जावे
                                 - निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर
नांदेड, दि. 6 :- स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना आत्मविश्वास व सकरात्मक दृष्टीकोण ठेवल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी केले. ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत दरमाह 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या शिबीरास पुणे येथील विषयतज्ज्ञ अमोल दशपूते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. वेणीकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्राची संगत धरावी. स्वत:ला झोकुन देऊन परीक्षेची तयारी करावी. स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्यानंतर ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची नाळ न तोडता समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत विकास पोहचवावा.
श्री. दशपूते यांनी स्पर्धा परीक्षेतील NCERT अभ्यासक्रमाबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतांना केद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधील NCERT चे पुस्तकाचे महत्व व येणाऱ्या प्रश्नाचे स्वरुप याबद्दल मार्गदर्शन केले.    
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोक यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार कु. आरती कोकुलवार यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, बाळू पावडे, संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड व खंडेलोटे यांनी सहाय्य केले.
000000

  वृत्‍त क्र. 344   उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा ,   महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी नांदेड दि....