Friday, December 11, 2020

 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 1 हजार 15 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  जिल्ह्यातील 1 हजार 15 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी 2021 रोजी यासाठी मतदान होईल. 15 डिसेंबर रोजी तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  सांगितले. कोविड-19 अंतर्गत असलेले सर्व निकष ग्रामीण भागातील जनता पार पाडून सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवस म्हणजेच दिनांक 25,26 व 27 डिसेंबर हे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिद्धी केली जाईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना 21 जानेवारी 2021 पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.

 

मुखेड तालुक्यात 109 ग्रामपंचायत, हदगाव 108, कंधार 98, देगलूर 85, लोहा 84, नायगाव 68, नांदेड 65, बिलोली 64, भोकर 63, उमरी 57, हिमायतनगर 50, मुदखेड 45, अर्धापूर 43, धर्माबाद 40,‍ किनवट 26, माहूर 10 अशा एकुण 1 हजार 15 ग्रामपंचायतींसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम आहे.

00000

 

            

 

   जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 12 डिसेंबर 2020 चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.                                    

00000

 

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)-2020 ही परीक्षा रविवार 27 डिसेंबर  2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 21 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 21 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी  8 ते सायं 4 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

0000

 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 ही परीक्षा रविवार 13 डिसेंबर  2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 9 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी  9 ते सायं 5.30 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायं 6.30 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायं 6.30 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

0000

 

नांदेड येथील दुय्यम निबंधक कार्यालय

शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्य शासनाने दस्त नोंदणीमध्ये 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत डिसेंबर 2020 पर्यंत दिली आहे. या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ नागरिकांना जास्तीत जास्त घेता यावा यासाठी नांदेड शहरातील तीन दुय्यम निबंधक कार्यालय शनिवार 12, 19 व 26 डिसेंबर 2020 रोजी सुट्टीच्या दिवशी तीन दिवस सुरु राहणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

दस्तऐवज नोंदणीची सुविधा नांदेड जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय नांदेड क्र. 1,2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3 या कार्यालयात डिसेंबर 2020 या महिन्याच्या पुढील शनिवारी म्हणजेच 12, 19 व 26 डिसेंबर 2020 रोजी सुरु राहणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. बोराळकर यांनी केले आहे.  

00000

 

 

पॉलिटेक्निक केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची

पहिली फेरी आजपासून सुरु 

नांदेड दि. 11 (जिमाका) :- पॉलिटेक्निक अभ्यासक्रम हा खात्रीने रोजगार देणारा तसेच आवडीच्या शाखेत पुढे सहजपणे उच्च शिक्षणाचे संधी देणारा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा महत्वपूर्ण टप्पा आजपासून सुरू होत असून अंतीम गुणवत्ता यादी प्रकाशीत होऊन संस्था व शाखा निवडण्याच्या टप्प्याची सुरुवात आज होत आहे. विविध संस्था व त्यातील शाखा यांचे एकूण तीनशे पर्याय विद्यार्थ्यांना भरता येऊ शकतात. प्रथम क्रमांकाचा पर्याय हा प्रवेशासाठी अनिवार्य असतो याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. या पर्यायाची संस्था मिळाल्यास प्रवेश घेतला नाही तर विद्यार्थी संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडतो शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून ऑप्शन फॉर्म  भरून देणे, प्रवेशासाठीच्या इतर प्रक्रियेची  माहिती देणे यासाठी प्राध्यापकांची समिती कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी व पालकांनी संस्थेतील माहिती तंत्रज्ञान इमारतीत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 12 ते 14 डिसेंबर दरम्यान विनामुल्य सेवेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे नोडल अधिकारी तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे. 

विद्यार्थ्याला पसंतीनुसार कोणत्या संस्थेत प्रवेश मिळाला याची यादी www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर तसेच विद्यार्थ्याचा स्वतः च्या लॉगिन मध्ये दिनांक 16 डिसेंबर रोजी उपलब्ध होणार आहे.  दिनांक 17 ते 18 डिसेंबर दरम्यान विद्यार्थाला स्वतः जागा स्वीकृती करावयाची आहे. तर दिनांक 17 ते 19  डिसेंबर दरम्यान प्रवेश मिळालेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थीत राहून मूळ कागदपत्र दाखवून व फीस भरून प्रवेश घ्यावयाचा आहे . उर्वरीत  जागा साठीचा दूसरा टप्पा दिनांक 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यासंस्थेत पुढील शाखा उपलब्ध आहेत, यंत्र अभियांत्रिकी (सकाळ सत्र ) 60, यंत्र अभियांत्रिकी (दुपार सत्र ) 60, स्थापत्य अभियांत्रिकी (सकाळ सत्र ) 60, स्थापत्य अभियांत्रिकी (दुपार सत्र ) 60 , विद्युत अभियांत्रिकी  60 , उत्पादन अभियांत्रिकी 60 , माहिती तंत्रज्ञान 60,  व वैद्यकीय अणुविद्युत 40 , असे  एकूण 460 प्रवेश क्षमता प्रथम वर्षासाठी आहे. 

संस्थेत यावर्षी  मागेल त्या विद्यार्थ्यास वसतीगृह ही व्यवस्था केली असून 180 -180 प्रवेश क्षमतेचे दोन मुलांचे वसतीगृह तर 120 प्रवेश क्षमतेचे मुलींचे वसतीगृह आहे. ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना याचा लाभ होणार आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...