Monday, November 6, 2023

 वृत्त

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग पथकाचा

नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम  

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे पथक नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील राहील.

 

मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथून नागपूर विमानतळ येथे सायंकाळी 6.10 वा. आगमन  व 6.15 वा. माहूरकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. माहूर विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

 

बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा. वाईबाजार येथे आगमन व पिडीत कुटुंबियांची भेट व नंतर किनवटकडे प्रयाण व किनवट येथे मुक्काम.  

 

गुरूवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा.  बोधडी खुर्द येथे पिडीत कुटुंबियांची भेट. दुपारी 2.30 वा. उपविभागीय अधिकारी किनवट येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तपास अधिकारी यांच्यासमवेत बैठक. त्यानंतर किनवट येथे मुक्काम.  

 

शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा. किनवट येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

रब्बी हंगामासाठी पाणी पाळयाचे वेळापत्रक जाहीर

 रब्बी हंगामासाठी पाणी पाळयाचे वेळापत्रक जाहीर


·         फेब्रुवारीपर्यंत चार प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाण्याची आवर्तने


नांदेड (जिमाका) दि. 6 :- रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आणि पूर्णा पाटबंधारे विभागाद्वारे फेब्रुवारी 2024 पर्यत पाण्याची आवर्तने जाहीर करुन नांदेड पाटबंधारे मंडळाने मोठा दिलासा दिला आहे.   या नियोजनानुसार सन 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन पाणीपाळयाचे नियोजन जाहीर केले आहे.

 

रब्बी हंगाम 2023-24 साठी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरणातील) उपलब्ध पाणीसाठयानुसार एकूण 4 पाणीपाळया (आर्वतन) देण्याचे निश्चित केले आहे. पहिले आर्वतन उजव्या व डाव्या कालव्यातून 5 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. दुसरे आर्वतन 5 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत तर तीसरे आर्वतन 5 जानेवारी ते  25 जानेवारी 2024 आणि चौथे आर्वतन 5 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. या सर्व आवर्तनाचा कालावधी 20 दिवसांचा राहील.

 

निम्न मानार प्रकल्प ता. कंधार साठी एकूण 3 आवर्तन डावा व उजवा कालव्यासाठी सोडण्यात येणार आहेत. पहिले आर्वतन 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत तर दुसरे आर्वतन 30 डिसेंबर 2023 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत तर तीसरे आर्वतन 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. पहिले आर्वतन 20 दिवसांसाठी तर दुसरे व तीसरे आवर्तन अनुक्रम 15 दिवसांसाठी राहील.

 

रब्बी हंगामात प्रथम पाणीपाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी मा.गो.शा.का.क्र.1 व 2 साठी 12 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 8 दिवस चालू राहील. अशी एकूण 20 दिवसाची पहिली पाणी पाळी राहील. दुसऱ्या व तिसऱ्या पाणीपाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी मा. गो.शा.का.क्रं.1 व 2 साठी 9 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 6 दिवस अशी एकूण 15 दिवसाची दुसरी व तीसरी पाणीपाळी राहील.

 

शंकररावजी चव्हाण विष्णुपरी प्रकल्पासाठी एकूण 2 आर्वतन कार्यक्रम प्रस्तावित आहेत. 10 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 या 25 दिवसात पहिले आर्वतन तर दुसरे आर्वतन 15 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 31 दिवसांच्या कालावधीत सोडण्यात येईल.

 

पूर्णा पाटबंधारे विभाग वसमतनगर या प्रकल्पाअंतर्गत एकूण 2 आर्वतन प्रस्तावित आहेत. पहिले आर्वतन 20 डिसेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 पर्यत सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन 20 जानेवारी 2024 पासून 16 फेब्रुवारी 2024 पर्यत सोडण्यात येईल. दोन्ही आवर्तनाचा कालावधी 28 दिवसांचा आहे. प्रत्येक पाणी पाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी वसमत शाखा व हट्टा शाखा कालवा रब्बी हंगामात 14 दिवस लासिना शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा रब्बी हंगामात 14 दिवस असे एकूण रब्बी हंगामात पाणी पाळी 28 दिवसाची राहील. नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत या चारही प्रकल्पावरील रब्बी सिंचन कार्यक्रमातर्गत पाऊस किंवा आकस्मिक घटनामुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होवू शकतो. या निश्चित कालावधीनुसार प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या कालवाधारक शेतकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे नांदेड पाटबंधारे मंडळावतीने कळविले आहे.

 

00000

नांदेड येथे 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

 नांदेड येथे 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत

 जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड येथे जिल्हास्तर युवा महोत्सव 2023-24 चे आयोजन 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलइनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात येणार आहे. युवकांचा सर्वांगिण विकाससांस्कृतीक कलेचे जतनयुवकांच्या अंगी असलेल्या सुप्‍त कला गुणांना वाव या उद्देशासाठी हा महोत्सव आयोजित केला जात आहे. युवकांना या माध्यमातून एक खुले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याचबरोबर युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, त्यांना तृणधान्याचे महत्व पटवून देणेयुवकांना शिक्षणउद्योग-व्यवसाय यासोबतच शेती या व्यवसायाची ओळख करुन देणेसामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व पटवूण देण्यासाठी हा युवा महोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली आहे.

 

आयुक्तक्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणेउपसंचालकक्रीडा व युवक सेवालातूर विभागजिल्हा क्रीडा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या युवक व युवतींनी 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपली नावे कार्यालयीन वेळेत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (7517536227), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार (9850189704) यांचेशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

संयुक्त राष्ट्र संघाने  (आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे 2023) असे घोषित केले आहे. युवकांना तृणधान्याचे महत्व कळावे म्हणून विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य उत्पादन वाढ या संकल्पनेवर विविध प्रदर्शनयुवासाठी रोजगार व व्यवसाय संधीयशोगाथा, पर्यावरण संरक्षणभौगोलीक परिस्थितीवर आधारीत उपाययोजनासमस्याचे निराकरण, संशोधणेदेश- विदेशात तृणधान्य आयातनिर्यात बाबत माहितीविविध योजनांची माहिती, पाककला इ. बाबत युवकासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकलावस्त्र उद्योगअग्रो प्रोडक्ट इत्यादी वस्तुचे प्रदर्शन सुध्दा ठेवण्यात येणार आहे.

 

युवा महोत्सवात पुढील कला प्रकार अंतर्भुत आहेत.

 

सांस्कृतीक कला प्रकार :- समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10)वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या 5)लोकगीत (सहभाग संख्या 10)वैयक्तिक सोला लोकगित (सहभाग संख्या 5)

कौशल्य विकास :- कथा लेखन (सहभाग संख्या 3)पोष्टर स्पर्धा (सहभाग संख्या 2)वकृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) सहभाग संख्या 2फोटो ग्राफी (सहभाग संख्या 2),

संकल्पना आधारीत स्पर्धा :- महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या 35)सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या 5).

युवाकृती :- हस्तकला (सहभाग संख्या 7)वस्त्र उद्योग (सहभाग संख्या 7)अग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या 7) इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवामध्ये नांदेड जिल्हयातील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेवू शकतात. त्यांचे वय 1 एप्रिल 2023 रोजीपर्यंत परिगणणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील कृषी महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयमहिला मंडळमहिला बचत गटयुवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानेहरू युवा केंद्रराष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षिस, ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवा-युवती स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसधारकांविरुध्द प्रवाशांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन

                                                जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसधारकांविरुध्द

प्रवाशांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट क्रमांक आदि माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल dycommr.enf2@gmail.com व rto.26-mh@gov.in  वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

 

दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवाशी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. या सणांच्या कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. जादा भाडे आकारणाऱ्या बस धारकाविरुध्द तक्रार नोंदवावी, असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  राज्य महामंडळाच्या भाडे दराच्या तुलनेत कंत्राटी परवाना वाहनांना कि.मी प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...