Monday, July 19, 2021

 

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 19, 22 व 23 जुलै 2021 या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत पुढीलप्रमाणे आवाहन. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

00000

 

 

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 11 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 924 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 124 एवढी झाली असून यातील 87 हजार 395 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 71 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, हिंगोली 1, मुंबई 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 8 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 11 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 10, खाजगी रुग्णालयातील 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 आज 71 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 11, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 47 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 138 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 40 हजार 536

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 38 हजार 542

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 124

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 395

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-58

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-71

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या

717 कुटूंबाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- कोरोनामूळे जिल्ह्यातील जे व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटूंबातील लहान मुलांची हेळसांड होवू नये या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गंत आजवर जिल्ह्यातील 717 व्यक्तींना विविध योजनाचा लाभ दिला. राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्समार्फत डॉ. इटनकर यांनी  कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पिडीत कुटूंबासाठी महसूल विभाग, महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांचा त्या-त्या कुटूंबाच्या पात्रतेनुसार लाभ देण्याचे निश्चित केले. यादृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची माहिती पडताळून घेऊन त्याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सद्यस्थितीत 659 कुटूंबाची नोंदणी झाली. 

नोंदणी झालेल्या कुटूंबापैकी योजनानिहाय गोषवारा पुढीलप्रमाणे आहे. महसूल विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 127, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत 40, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत 19, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत 17, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती वेतन योजनेत 7, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेत 32 कुटूंबाची नोंदणी झाली. तर महिला व बाल विकास विभागाच्या योजनेंतर्गंत बाल संगोपन योजना 201 जणांना लाभ दिला. शिशुगृह योजना, बालगृह योजना व शुभमंगल सामुहिक विवाह योजनेसाठी सद्यस्थितीत पात्र लाभार्थी मिळाले नाहीत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजना 58, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना 99, एपीएल केशरी शेतकरी योजनेत 64 कुटुंबियांची नोंद झाली आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत शालेय विद्यार्थी इयत्ता 6 ते 10 साठी निवासी शाळा योजनेत 27 तर माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजनेत 26 व्यक्तींच्या कुटूंबियांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

0000



 

 

 पाटबंधारे मंडळातील सघन वृक्षलागवडीस 

सचिव अजय कोहीरकर यांची भेट व वृक्षारोपन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  नांदेड पाटबंधारे मंडळातील भगीरथनगर व जंगमवाडी वसाहतीमध्ये मागील वर्षी 15 हजार वृक्षांची सघन पद्धतीने मियावाकी लागवड करण्यात आली होती. या पद्धतीने वृक्षलागवड करण्याची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन मंडळातील अभियंत्यांनी शासनाच्या विविध वसाहतीत वृक्षलागवड केली. आता ही झाडे एकावर्षाची झाली असून घनदाट वनासारखी दिसत आहेत. या वृक्षलागवडीच्या उपक्रमास जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहीरकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांचे हस्ते नवीन जागेवर वृक्षारोपन करण्यात आले.  

नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी मंडळांतर्गत विष्णुपूरी, जानापूरी, किवळा, घुंगराळा, बारुळ, लहान, भोकर, तामसा, इसापूर, येलदरी, मालेगाव, वसमत अशा विविध ठिकाणी  सुमारे 1 लाख वृक्षांची लागवड करुन त्याची जोपासना केली असल्याची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी भगिरथनगर व जंगमवाडी पाटबंधारे वसाहतीतील वृक्षलागवडीचे प्रत्यक्ष काम व संगोपन करणारे अकुशल कामगार गणेश रत्नपारखे, लिपीक सर्जेराव म्हस्के, विजय वानखेडे तसेच संबधीत कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.

0000





 सुधारित वृत्त _

जिल्ह्यातील 74 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण


नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 74 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 20 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर(विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली या 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना तरोडा, विनायकनगर येथे प्रत्येकी 80 डोस उपलब्ध आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, मुदखेड, बारड, उमरी एकुण 8 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय कंधार, माहूर येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 11 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय लोहा, नायगाव या केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 26 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर 14 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्ह्यात 18 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 34 हजार 985 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 19 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
0000

 

जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी लसीकरणासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून योगदान द्यावे

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) 19 :- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. तथापि सद्यस्थितीत कोरोनावरील प्रभावी उपचार म्हणून अवघे जग लसीकरणावर भर देत आहे. जिल्ह्यातील 102 शासकिय लसीकरण केंद्रामार्फत आजवर आपण लसीकरण करीत आलो आहोत. याची व्याप्ती अधिकाधिक प्रमाणात वाढविण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. याचबरोबर आजच्या घडीला ज्या शासकिय यंत्रणा आहेत त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील खाजगी दवाखाण्यांनी लसीकरणासाठी स्वत:ची केंद्रे सुरु करुन जितक्या लवकर लसीकरण करता येईल ते सर्वांच्या आरोग्याच्यादृष्टिने अधिक महत्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आज जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य सुरक्षितता, संभाव्य तिसरी लाट, मुलांच्या आरोग्याचे व्यवस्थापन आणि लसीकरणासाठी खाजगी दवाखाण्यांचा सहभाग या विषयावर व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय कदम, डॉ. देवेंदसिंघ पालीवाल, इंडियन पेडियाट्रीक असोशिएसनचे डॉ. श्रीरामे, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. शितल लव्हेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, मनपा उपायुक्त अजितपाल संधू, औद्योगिक असोशिएसनचे प्रतिनिधी, गिरीष देशपांडे, आदी उपस्थित होते.

 ज्या वर्गाला लसीकरणासाठी लागणारा जो काही खर्च असेल तो उचलण्याची तयारी ठेऊन हे लसीकरण खाजगी दवाखाण्यातील केंद्रामार्फत घेतल्यास ती एक प्रकारची देशसेवाच आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. यासाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. त्यानुसार कोविडशील्डसाठी 780 रुपये तर कोव्हॅक्सीनसाठी 1 हजार 410 रुपये निर्धारीत केले आहेत. खाजगी दवाखाण्यांना आपली मागणी cowin.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदवावी लागेल. हे योगदान ज्या नागरिकांना देणे शक्य आहे त्यांनी आवर्जून दिल्यास शासनाला दुर्लक्षीत वर्गावर अधिक लक्ष केंद्रित करुन त्यांना लसीकरण करता येईल. लसीकरणासाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था यांनी पुढे येऊन आपल्या फॅक्ट्रीतील सहकाऱ्यांचे लसीकरण करुन घेतल्यास त्यांना त्यांचे उद्योग भविष्यात सुरळीत चालू ठेवता येऊ शकतील. याचबरोबर नांदेड महानगरातील जेवढे दुकानदार आहेत त्यांनीही आवर्जून या लसीकरणात सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेत नेमकी काय स्थिती असू शकेल हे जर अस्पष्ट असले तरी लसीकरण ज्या व्यावसायिकांचे झाले आहे त्यांच्यासाठी ही अधिकची सुरक्षा असेल हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे, असे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेतील संभाव्य धोका लहान मुलांवर असून त्याबाबत योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  



*****

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...