Thursday, December 19, 2019


वस्त्रोद्योग सहकारी संस्थांना निवडणूक माहितीबाबत आवाहन
नांदेड, दि. 19 :- मराठवाडा विभागातील सर्व वस्त्रोद्योग सहकारी संस्थांच्या (हातमाग, यंत्रमाग, गारमेंट, निटींग, प्रोसेसींग) पदाधिका-यांना कळविण्यात येते की, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची डिसेंबर-2019 अखेर निवडणूकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका माहे 31 जानेवारी 2020 अखेर पुर्ण करण्याबाबत मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म.रा. पुणे यांच्या कडून निर्देश प्राप्त झालेले आहेत.
आपल्या संस्थेची मागील निवडणूक केव्हा झाली या बाबतची माहिती ई-2 मध्ये स्वाक्षरीनीशी आपल्या तालुक्याच्या उप/सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास ई-मेल rddtextiles4aurangabad@rediffmail.com व्दारे सादर करावी. ज्या वस्त्रोद्योग सहकारी संस्थेकडून सदरील माहिती 27 डिसेंबर 2019 पर्यंत प्राप्त होणार नाही, अशी वस्त्रोदयोग सहकारी संस्था कार्यरत नसल्याचे गृहीत धरुन सदर संस्थेविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतूदीनुसार वैधानिक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. संपर्कसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफरगेट, औरंगाबाद येथे 0240-2970058 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांनी केले आहे.
000000


पीक विम्यासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत
नांदेड, दि. 19 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजन (PMFBY) रब्बी हंगाम योजनेअंतर्गत गहु (बा), गहु(जि), ज्वारी(बा), ज्वारी (जि), हरभरा, कांदा उन्हाळी भुईमूग या पीकासाठी  लागू राहणार आहे. विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2019 तसेच उन्हाळी भुईमूग या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 1 एप्रिल 2020 आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्ह मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंक अथवा ग्रामस्तरावर कृषी सहायक यांच्याशी संपर्क धावा. विभागातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
000000


जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्याचे
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 19 :- अनुसूचित जमातीच्या व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहसंचालक तथा उपाध्यक्ष यांनी केले आहे.
या समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी शैक्षणिक वर्ष 2019-2020 या वर्षामध्ये शैक्षणिक संस्थामध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास 31 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करावेत अन्यथा तदनंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक असेल त्याप्रमाणे कार्यवाही करवी.
विहित कालमर्यादेत जमातीचे प्रमाणपत्र तपासणीचा प्रस्ताव सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. त्यामुळे विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालये यांनी विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करावेत असेही सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने कळविले आहे.
00000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
नांदेड दि. 19 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ  नांदेड यांच्या निर्देशानुसार शासकीय अध्यापक महाविद्यालय स्वातंत्र्य सैनिक कॉलनी शोभानगर नांदेड या महाविद्यालयात शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये बी.एड व एम.एड उत्तीर्ण झालेल्या व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 जानेवारी 2020 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.
यासाठी सोमवार 30 डिसेंबर ते गुरुवार 2 जानेवारी 2020 पर्यंत सकाळी 10 वा. नाव नोंदणी करुन पदवी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांने समितीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी कळविले आहे.
सर्वांनी विहित कालमर्यादेत नाव नोंदणी करुन बी.एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुरुमकर व एम. एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. हारुण शेख यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी केले आहे.
0000


श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 19 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 24 ते 28 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे स्वाधीन अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री घाटे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.
श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक घाटे यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.
00000


माळेगाव यात्रेत पशुसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 19 :- लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा 24 ते 27 डिसेंबर 2019 या कालावधीत भरणाऱ्या भव्य खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत मंगळवार 24 डिसेंबर 2019 रोजी पशुसंवर्धन विकास ज्योत कंधार ते माळेगाव यात्रा पशुसंवर्धन विषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन व दुग्धस्पर्धा. बुधवार 25 डिसेंबर 2019 रोजी भव्य पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन. शुक्रवार 27 डिसेंबर 2019 रोजी पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण.
पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना सहभागी होणाऱ्या पशुपालकांसाठी देण्यात येत आहेत. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी 8 ते 11 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगमध्ये प्रवेश दिल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जातील. पशुपालकांनी येतांना आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. निवड समितीचा निकाल अंतीम राहील, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.  
000000


सर्व पक्षीय धरणे आंदोलनामुळे आज
नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल
नांदेड, दि. 19 :-  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधिकाराचा वापर करुन शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सीएए / एनआरसी विरोधात सर्व पक्षीय धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखवी यादृष्टीने नांदेड शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
ही अधिसुचना 20 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वा.पासून ते आंदोलन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पूरत्या स्वरुपात अंमलात राहिल. त्यानंतर सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी, असेही आधिसुचनेत नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरात 20 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर CAA/NRC विरोधात सर्व पक्षीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांकरिता वाहनाच्या वाहतूकीच्या व्यवस्थेत 20 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्री पासून आंदोलन संपेपर्यंत तात्पूरत्या स्वरुपात पुढील पर्यायी मार्गावरील वाहतूकीस वळन देऊन बदल करणे आवश्यक असल्याचे कळवून अधिसूचना प्रसिध्द होण्याबाबत विनंती केली होती.
वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग-  वजिराबाद चौकाकडून पुढे शिवाजी महाराज पुतळ्याकडे,  रेल्वे स्टेशनकडे व पुढे चिखलवाडी कॉर्नरकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशनकडून व न्यायालयाचे पाठीमागून शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. महावीर चौकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. सोनू कॉर्नरकडून महात्मा गांधी पुतळ्याकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- ज्या वाहनधारकांना वजिराबाद चौकाकडून रेल्वे स्टेशन पुढे चिखलवाडी कॉर्नरकडे जाण्याचे असल्यास त्यांनी डॉक्टर लाईन मार्गे बिकानेर स्विट मार्ट जवळून रेल्वे स्टेशन मार्गे हिंगोली गेट ते पुढे पर्यायी मार्गाने जावे. दुपारी 2 वा. ते धरणे आंदोलन संपेपर्यंत वजिराबाद चौक ते महावीर चौक पुढे जुना मोंढा पर्यंत एकतर्फी असलेला वाहतूक मार्ग दुतर्फी वाहतूकीसाठी चालु राहील.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33 नुसार जिल्हादंडाधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रात लोकांच्या सोयीकरीता रहदारीचे विनियमन करण्याचा अधिकार प्रदान आहेत. त्यानुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधिकाराचा वापर करुन नांदेड पोलीस अधीक्षक यांनी विनंती केल्यानूसार शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सीएए / एनआरसी विरोधात सर्व पक्षीय धरणे आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखवी या दृष्टीने वरिलप्रमाणे वाहतूकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्यायबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे. ही अधिसुचना 20 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वा.पासून ते आंदोलन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पूरत्या स्वरुपात अंमलात राहिल त्यानंतर सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी, असेही आधिसुचनेत नमूद केले आहे.
000000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...