Saturday, June 6, 2020

वृत्त क्र. 523



इतवारा परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह
कोरोनावर एकुण 129 व्यक्तींनी केली मात
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोरोना बाधितामध्ये नांदेड येथील इतवारा परिसरातील 65 वर्षाचा एका पुरुष व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 129 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित 53 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.
जिल्ह्यात शनिवार 6 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 117 अहवालांपैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 1 व मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून यात 52  65 वर्षांच्या दोन स्त्री तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 53 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 40, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. शनिवार 6 जून रोजी 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 845, घेतलेले स्वॅब 4 हजार 380, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 884, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 1, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 172, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-78, मृत्यू संख्या- 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 129, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 53, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 19 एवढी संख्या आहे.
जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 522


आरोग्यासाठी पर्यावरण मोलाचे
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन टनकर
नांदेड (जिमाका) दि. 5 :-  निसर्गाचे आणि आरोग्याचे खूप जवळचे नाते आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरणही असले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन टनकर यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रजातीच्या झाडाचे रोप लावण्यात आले. यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्याही हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तहसिलदार वैशाली पाट,. बी. बिरादार, विधि अधिकारी आंनद माळाकोळीकर, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, वन विभागातिल वनअधिकारी, जिल्हा एमआयएस समन्वयक रुपेश झंवर, गणेश नरहिरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डुबूकवाड, अदि अधिकारी उपस्थित होते.
000000


वृत्त क्र. 521


न्यायालयीन कामकाज सोमवार पासून दोन सत्रात   
            नांदेड, दि. 5 :- जिल्हा न्यायीक विभागातील निम्या न्यायालयांचे मर्यादित कामकाज सोमवार 8 जून 2020 पासून सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यंत व निम्या न्यायालयात दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत दोन सत्रात सुरु होणार आहे. कोवीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालयात प्रवेशाबाबत विहित केलेले निर्देश विचारात घेऊन नांदेड येथील न्यायालय संकुलात प्रवेश व न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांनी निर्देश दिले आहेत.
            या निर्देशानुसार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड व दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर नांदेड यांच्याकडे दाखल होणारी सर्व प्रकरणे (दोषारोपपत्र वगळून) कामकाजाच्या दिवशी फक्त सकाळी 10.30 ते 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये दाखल करुन घेण्यात येतील. तसेच एक वकील एकावेळी दहापेक्षा जास्त प्रकरणे दाखल करु शकणार नाही. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणातील शपथपत्रांची पडताळणी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये केली जाईल. संबंधीत वकीलांनी आपआपली प्रकरणे निर्दिष्ट जागी उपलब्ध करुन दिलेल्या बॉक्समध्ये टाकावीत. कोणत्याही वकीलास कामकाजावेळी न्यायालयातील संचिका प्रत्यक्ष हाताळता येणार नाही. सर्व वकीलांनी शक्यतोवर आपआपल्या प्रकरणातील युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा.
न्यायालयातील प्रवेश व संचाराबाबतचे निर्देश, न्यायालयातील दैनिक बोर्डवर असणाऱ्या व पक्षकाराच्या अनुपस्थितीत घेता येणाऱ्या फक्त युक्तीवाद व अंतरिम युक्तीवाद असलेल्या प्रकरणात वकिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या समोरच्या कार्यालयामधून न्यायालयातील प्रवेशाबाबतचे प्रवेशपत्र / पास अदा केल्या जातील. ज्या वकिलांकडे प्रवेशपत्र आहे, त्यानांच न्यायालयाच्या मुख्य इमारतीत  प्रवेश दिला जाईल. जेष्ठ वकिलांच्या सोबत त्यांच्या सहकारी कनिष्ठ वकीलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही पक्षकारास न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही.
न्यायालय परिसरात प्रवेश करतांना सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी केली जाईल. 38 अंश से. पेक्षा अधीक तापमान असलेल्या किंवा सर्दी, पडसे इत्यादी कोवीड-19 ची अन्य लक्षणे असलेल्या किंवा घोषित केलेल्या प्रतिबंधक क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
अभिवक्ता संघाची सर्व दालने बंद ठेवण्यात येतील याची नोंद घ्यावी. सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोवीड-19 पासून बचाव करण्याच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन न्यायालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे. 
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...