Tuesday, December 30, 2025

वृत्त क्रमांक 1334

यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

नांदेड, दि. 30 डिसेंबर :-मागील वर्षी 2025 झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता, फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित कोणाचीही गय केली जाणार नाही. आवश्यक असल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिले.

फेब्रुवारी/मार्च 2026 च्या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची संयुक्त पूर्वतयारी आढावा बैठक आज मातोश्री प्रतिष्ठाण इंजिनिअरिंग कॉलेज, खुपसरवाडी ता. जि. नांदेड येथे पार पडली. ही बैठक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव श्रीमती अनुपमा भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार व सचिव श्री. चारी  उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी 2025 च्या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील अव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “परीक्षार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नाहीत, कंपाऊंड वॉल नाही, बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे ही दहावी-बारावीची परीक्षा आहे की जत्रा, असा भास होतो,” अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीवर भाष्य केले.

2026 च्या परीक्षेपूर्वी सर्व परीक्षा केंद्रांनी भौतिक सुविधांची पूर्णता करावी. सर्व परीक्षार्थ्यांना ड्युअल डेस्कची व्यवस्था असावी. सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, पंखे, लाईट, रॅम्प, कंपाऊंड वॉल आदी सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात. या सुविधा आढळून न आल्यास संबंधित केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर गैरप्रकार झाला किंवा त्यास प्रोत्साहन मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कॉपी करून उत्तीर्ण होणे ही अत्यंत खेदजनक बाब असून, गैरप्रकारातून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी भविष्यात चांगला नागरिक होत नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्गत मूल्यांकनाचे 20 गुण असून लेखी परीक्षेत 80 पैकी केवळ 15 गुण आवश्यक आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांना ही तयारी करून परीक्षा देता येत नसेल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 2026 च्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

यावेळी विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांनी मंडळाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. अपार आयडी, खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज, अतिविलंब शुल्काच्या तारखा तसेच कॉपीमुक्त अभियानाची पूर्वतयारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गैरप्रकाराला प्रोत्साहन दिल्यास कोणाचाही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी माधव सलगर व दिलीपकुमार बनसोडे यांनीही कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या कामकाजाची व विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.

या सहविचार सभेस जिल्ह्यातील 11 तालुक्यांतून सुमारे 635 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभागीय मंडळ, लातूर येथील सहायक अधीक्षक श्री. वैद्य यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले यांनी परिश्रम घेतले, तर संस्थेचे प्रतिनिधी श्री. किनेकर यांनी पूर्वनियोजन केले.

यापूर्वी 27 डिसेंबर 2025 रोजी शिवनेरी पोदार लर्न स्कूल, बिजूर (ता. बिलोली) येथे पाच तालुक्यांची बैठक पार पडली होती. त्या बैठकीस 217 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

०००००






वृत्त क्रमांक 1333

विना नंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक कारवाई

हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड; चालक-मालकांना कडक इशारा

रेती, मुरुम, मातीची वाहतूक विना नंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

नांदेड, दि. 30 डिसेंबर :-जिल्ह्यातील बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांवर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरात अचानक धडक कारवाई करत ११ विना नंबर हायवा पकडल्या. लातूर रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंप, विष्णुपुरी परिसरात अवैध वाहतुकीच्या उद्देशाने उभ्या असलेल्या अकरा विना क्रमांकाच्या हायवा त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले.

वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, शासनाचा महसूल बुडविणे तसेच अपघातांना आमंत्रण देणाऱ्या विना नंबर वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या सर्व विना क्रमांकाच्या हायवा पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या पथकाकडे तात्काळ सुपूर्द करण्यात आल्या.

आरटीओ कार्यालयामार्फत या वाहनांवर नियमानुसार एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यापुढेही रेती, मुरुम, माती आदींची वाहतूक विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य पद्धतीने करणाऱ्या हायवा व इतर अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. “वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पकडण्यात आलेल्या हायवा वाहनांचे क्रमांक पुढीलप्रमाणे :

एमएच 46 बीबी 9546,

एमएच 26 सीएच 2721,

एमएच 26 सीटी 7779,

एमएच 26 सीएम 7779,

एमएच 26 सीएच 4909,

एमएच 21 बीएच 0804,

एमएच 26 सीएच 7565,

एमएच 29 बीई 4869,

एमएच 26 सीएच 2909,

एमएच 14 एलएक्स 4892,

एमएच 26 सीएच 2429.

००००००





वृत्त क्रमांक 1332

नियमित लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा; जिल्ह्यात लवकरच 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण सुरू

नांदेड दि. ३० डिसेंबर:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय नियमित लसीकरण समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाच्या विविध निर्देशकांचा (Indicators) सविस्तर आढावा घेण्यात आला आला.या बैठकीत uwin आणि आगामी काळात सुरू होणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेवर विशेष चर्चा करण्यात आली.

ग्रामीण व शहारी भागातील लसीकरणावर भर

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणतः २ हजार लसीकरण सत्रे व शहरी भागात 250 लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. या सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत आणि गरोदर मातांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिले. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

'एचपीव्ही' लसीकरण: ३३ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीची चर्चा झाली आणि मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध होणार हा फार मोठा फायदा होणार आहे . सर्व पात्र लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

लाभार्थी संख्या: जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येनुसार साधारणतः ३३,००० लाभार्थी या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

वयोगट: ही लस १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे (अर्थात मुलीच्या १४ व्या वाढदिवसानंतर ते १५ व्या वाढदिवसापर्यंत).

विविध निर्देशकांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण इंडिकेटरवाईज प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये प्रलंबित राहिलेली बालके (Left-outs) आणि अर्धवट लसीकरण झालेली बालके (Drop-outs) शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी नियमित लसीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला  उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, शिक्षण अधिकारी माधव सलगर, एस एम ओ लातूर डॉ. अमोल गायकवाड, बाळ रोग तज्ञ विभागप्रमुख,.किशोर राठोड, आयएपी नांदेड डॉ सुहास बेंद्रीकर,  जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे जिल्हा सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे, शहरी कार्यक्रमाधिकारी सोनुले सुहास,रोहित जोशी तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी  उपस्थित होते.

००००००



विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...