Wednesday, December 17, 2025

वृत्त क्रमांक 1308

वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करू नये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज 

नांदेड दि. 17 डिसेंबर :- वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खननवापर व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पहिल्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणेदुसऱ्या गुन्ह्यासाठी 60 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणेतिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करण्यात येऊ नयेअसे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. 

 

राज्यात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खननवापर व अवैध वाहतूक होत असल्याने अशा वाहनांवर आळा घालण्यासाठी व अशी अवैध वाहतूक होऊ नये यासाठी कठारे कारवाई करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य मुंबई यांची 18 ऑगस्ट 2025 रोजी बैठक पार पडली आहे.

 

त्यात दोषी वाहनावर पहिल्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणेदुसऱ्या गुन्ह्यासाठी 60 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणेतिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.

 

त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नांदेड यांच्या 16 डिसेंबर 2025 रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार 26 डिसेंबर 2025 पासून राज्य परिवहन प्राधिकरण यांनी पारित केलेल्या ठरावाप्रमाणेच ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 1307

जलताराला तंत्रज्ञानाची जोड ; जिओ-फेन्सिंगद्वारे पारदर्शक अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा ॲपचे उद्धघाटन

लोकसहभाग व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलतारा चळवळ अधिक प्रभावीपणे राबविणार

नांदेड, दि. 17 डिसेंबर :  उपक्रम अधिक परिणामकारक, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जलतारा उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक कामाची जिओ-फेन्सिंगद्वारे नोंद, छायाचित्रण तसेच प्रत्यक्ष प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या जलतारा अॅपचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे कामांमध्ये पारदर्शकता वाढून वेळेत व दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘जलतारा ॲप’ अंमलबजावणी विषयावर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार जयशंकर इटकापल्ले, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व बीडीओ, नोडल अधिकारी चेतन जाधव, एमआयएस समन्वयक रूपेश झंवर, राज्य उपजीविका तज्ज्ञ श्रीमती चेतना लाटकर, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, सर्व एपीओ, पीटीओ, सीडीईओ तसेच एचआयएमडब्ल्यूपी सीएसओ टीमचे प्रतिनिधी व संपूर्ण जिल्हा नरेगा टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सर्व अधिकाऱ्यांना ‘जलतारा ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याचा सक्रिय वापर करण्याचे तसेच इतरांना या उपक्रमासाठी प्रेरित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. केवळ प्रशासकीय अंमलबजावणीपुरते मर्यादित न राहता, प्रत्येक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरात जलतारा उभारून समाजास आदर्श घालून द्यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

नांदेड जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करून भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या संकल्पनेतून सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये करण्यात आला असून, केंद्र शासनाच्या “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या जलसंधारण संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जलतारा उपक्रमाचा आढावा घेण्यात येऊन जलताऱ्यांचे जिओ-फेन्सिंग करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅाप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. जलतारा निर्मिती ही केवळ संरचना उभारणी नसून, भविष्यातील पाण्याच्या सुरक्षिततेसाठीची दूरदृष्टी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पावसाचे अतिरिक्त पाणी शेतजमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे, जमिनीची धूप रोखणे, मातीची पोत सुधारणे, उत्पादनक्षमता वाढवणे तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 

कार्यशाळेदरम्यान जलतारा उपक्रमासह अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत प्राप्त प्रस्तावांवर तातडीने प्रक्रिया करून गांभीर्याने दखल घेण्याच्या स्पष्ट सूचना पंचायत समिती व कृषी विभागास देण्यात आल्या. विविध विभागांतील समन्वयातूनच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

सर्व मान्यवरांनी जलतारा उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत लोकसहभाग व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलतारा चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. नांदेड जिल्हा जलसंधारण क्षेत्रात राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘जल आहे तर उद्या आहे’ आणि जलतारा हीच नांदेडच्या जलसुरक्षेची शाश्वत वाटचाल आहे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

00000








 वृत्त क्रमांक 1306

नशेच्या औषध विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई

नांदेड, दि. 17 डिसेंबर :- अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाच्यावतीने नशेच्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. काही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांत नशेच्या औषध विक्रीबाबत अपूर्ण व मोघम स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

या पार्श्वभूमीवर नागरिकांना नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणारी किंवा नियमबाह्य औषध विक्री करणारी कोणतीही औषधी पेढी आढळून आल्यास त्यांनी सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, नांदेड यांच्याशी संपर्क साधून कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करावी. यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या औषधी दुकानांविरोधात प्रभावी कारवाई करणे प्रशासनास शक्य होईल.

कोटा (राजस्थान)च्या धर्तीवर नांदेड शहर हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत आहे. राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तव्यास आहेत. काही मेडिकल स्टोअर्समार्फत नशेच्या औषधांची व गोळ्यांची सहज उपलब्धता होत असल्याबाबत निदर्शनास आले होते.  त्या अनुषंगाने नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील औषधी दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. नांदेड कार्यालयासाठी सहायक आयुक्त (औषधे) यांचे एक पद व औषध निरीक्षकांची एकूण चार पदे मंजूर असून, मार्च 2025 पासून औषध निरीक्षकांची सर्व पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत या पदांचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त (औषधे), नांदेड यांच्याकडे आहे. 

तथापि, विभागातील औषध निरीक्षकांच्या सहकार्याने विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

या मोहिमेत नोव्हेंबर 2025 अखेर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री तसेच औषध कायद्याच्या इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 48 औषधी पेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून लेखी स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. प्राप्त स्पष्टीकरण समाधानकारक न आढळल्याने 32 औषधी पेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 13 औषधी पेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित 3 औषधी पेढ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित आहे. कारवाई करण्यात आलेल्या काही औषधी पेढ्यांनी शासनस्तरावरून स्थगिती आदेश प्राप्त केल्यामुळे त्यांच्याविरोधातील प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

000000

लेख

लेख 

माळेगाव यात्रा : ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा !

मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. माळेगाव केवळ धार्मिक स्थळ नाही. ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे मोठे व्यापारी केंद्र आहे. या यात्रेला आजपासून (ता. 18 ते 25 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने या यात्रेवर प्रकाश टाकणारा हा लेख.

माळेगाव यात्रेला जवळपास चार शतकांची परंपरा आहे. मोगल, निजाम काळापासून या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व होते. ऐतिहासिक काळापासून माळेगाव घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. आजही तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील व्यापारी येथे येतात. या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे.

माळेगाव यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नामांकित तमाशा फडांची जुगलबंदी येथे रंगते. तमाशासोबतच 'मौत का कुआँ' सारखे प्रकारही येथे दिसतात.

इतर यात्रांमध्ये प्रामुख्याने फक्त देवदर्शन असते. पण माळेगाव यात्रा वेगळी आहे. येथे कृषी प्रदर्शन आणि कुस्त्यांची दंगल पाहायला मिळते. पशु प्रदर्शन या यात्रेचे हृदय आहे. येथे हजारो जनावरांची खरेदी-विक्री होते. राजस्थानच्या पुष्कर मेळ्यानंतर घोड्यांच्या व्यापारासाठी ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे. यात्रेत सर्वधर्मीय लोक आनंदाने सहभागी होतात. ही यात्रा म्हणजे उत्तम, असे सामाजिक सलोख्याचे प्रतीकच आहे.

माळेगाव यात्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाच ते सात दिवसांतच येथे कोट्यवधींची उलाढाल होते. चेतक, मारवाडी, पंजाबी अशा उच्च जातीचे घोडे विक्रीला येतात. या घोड्यांची खरेदी-विक्री किंमत चकित करणारी असते. यासह येथे गाढवांचीही मोठी बाजारपेठ भरते. वीटभट्टी व्यावसायिक आणि परराज्यातील व्यापारी येथे गाढवे खरेदी करतात. याशिवाय उंट, बैल, गायी आणि शेळ्या-मेंढ्यांचीही विक्री होते. कृषी अवजारे आणि खाद्यपदार्थांचीही मोठी उलाढाल होते.

अडचणीच्या काळात ही यात्रा शेतकऱ्याला आधार देते. पशुधन विकून आलेला पैसा शेतीसाठी वापरला जातो. यात्रेत शेतकऱ्यांना नवीन बियाणे आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तसेच यात्रेतून स्थानिक मजुरांना रोजगार मिळतो. पूर्वी यात्रेत कृषी विषयक वस्तूंची देवाण-घेवाण (Barter System) होत असे. आता रोखीने आणि 'युपीआय'द्वारे (Online) व्यवहार होतात. पूर्वी बैलगाडीतून येणारे भाविक चारचाकी गाड्यांमधून येतात.

 माळेगावची ही यात्रा केवळ उत्सव नाही. ती ग्रामीण संस्कृतीची एक प्रयोगशाळा आहे. आधुनिकीकरणाच्या काळातही यात्रेने आपली ओळख जपली आहे. हजारो हातांना काम देणारी ही यात्रा खऱ्या अर्थाने 'वैभवशाली' अशीच आहे.

- डॉ. श्याम टरके,

सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर








वृत्त क्रमांक 1308 वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक  करू  नये  -  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी   प्रशांत कंकरेज   नांदेड दि. 17 डिसेंबर :-  व...